आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावाताली नरमाई कायम आहे. ब्राझीलमध्ये पावसाचा अंदाज आहे. पाऊस झाल्यानंतर ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात वाढ होऊ शकते, असा अंदाज गृहीत धरून बाजारात नफावसुली सुरु आहे. त्यामुळे विक्री वाढली. याचा दबाव बाजारावर येत आहे.
तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक कायम आहे. सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान दिसते. त्यामुळे बाजारात सोयाबीनचा भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात कापसाची आवक चांगली सुरु आहे. कापूस बाजारातील आवक १ लाख ८० हजार ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान झाली होती. महाराष्ट्रातील आवक त्यातही जास्त आहे. त्यानंतर तेलंगणा आणि गुजरातमध्ये कापूस विक्रीसाठी येत आहे. कापसाचे भाव दबावात असातनाही बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त असल्याने भावावरील दबाव कायम आहे.
सध्या कापसाचा भाव ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम आहे. देशातील कापूस बाजार कापूस आवकेवर जास्त अवलंबून आहे. यंदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवड्यापासून थांबली आहे. बाजारातील लाल कांद्याची आक वाढत असली तरी सरासरीपेक्षा बाजारातील आवक कमीच आहे. देशातील बहुतांशी भागात कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसते. याचा आधार कांदा बाजाराला मिळत आहे.
यामुळे कांद्याच्या भावातील नरमाई थांबली असून भाव स्थिरावले आहेत. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. लेट खरिपातील माल बाजारात सुरु होईल. त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो. त्यामुळे या काळात कांद्याचे भाव आणखी काही आठवडे कायम दिसू शकतात, असे अभ्यासकांनी सांगितले.
देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावले आहेत. हळदीचा नवा माल काही आठवड्यांमध्ये सुरु होणार आहे. तर फेब्रुवारीनंतर हळदीची बाजारातील आवक वाढेल. हळद पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका आताही बदत आहे.
पाऊस कमी असला तरी काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडला. यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला बाजारात १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे.
बाजारात सध्या वांगीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी झाली मात्र वांगीला उठाव चांगला आहे. त्यामुळे वांगी भाव तेजीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वांगी पिकाला फटका बसला होता.
तसेच कमी पाण्यामुळे लागवडीही कमी होत्या. याचा परिणाम आता बाजारातील आवकेवर होत आहे. सध्या वांग्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.