कापसाचे दर उच्चांकारून नरमले
देशात यंदा कापसाचं उत्पादन २० टक्क्यांनी घटलं. मात्र कापसाचा वापर ३० टक्क्यांनी वाढला. त्यामुळं कापसाच्या दरात तेजी आली होती. मे महिन्यात कापसाचे दर प्रतिखंडी १ लाख ३ हजार रुपयांवर पोचला होता. एक खंडी ३६० किलोची असते. मात्र सध्या कापसाचे दर कमी झाले. सध्या कापूस ८६ हजार ४०० रुपये प्रतिखंडीनं विकला जातोय. तसंच सुताचे दरही किलोमागे ३५ ते ४० रुपयांनी नरमले, अशी माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी लोकसभेत दिली. तसंच कापूस आणि सुताचे दर बाजारावर अवंलबून आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
वाढीव दराने गहू खरेदीची बांगदेशची तयारी
मागील दोन वर्षात भारतानं बांगलादेशची गरज भागवली. मात्र भारतानं निर्यातबंदी केल्यामुळं बांगलादेशची मोठी कोंडी झाली. देशाची गरज भागविण्यासाठी बांगलादेशला इतर देशांकडून आयात करावी लागणार आहे. मात्र ही आयात वाढलेल्या दराने होणार आहे. १४ जुलै रोजी बांगलादेशने ४५० डाॅलर प्रतिटनाने ५० हजार टन गहू पुरवठ्याचे टेंडर रद्द केले. दर जास्त असल्याचं कारण त्यावेळी दिलं होतं. पण आता बांगलादेशनं ४७६.३८ डाॅलर प्रतिटनाने गव्हचं टेंडर मंजूर केलंय. म्हणजेच टनामागे २८ डाॅलर अधिक द्यावे लागणार आहे. जागतिक पातळीवर गव्हाचा पुरवठा कमी असल्यानं अधिक पैसा मोजावा लागतोय.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये पीक काढणीला वेग
युक्रेनमध्ये युध्दामुळे वसंत ऋतुतील पेरणी निम्म्याच क्षेत्रावर होऊ शकली. युक्रेनमधील शेतकऱ्यांनी २८ जुलैपर्यंत २९ टक्के पिकांची काढणी पूर्ण केली. आत्तापर्यंत ११७ लाख टन धान्य उत्पादन मिळालं. त्यामध्ये ७९ लाख टन गव्हाचा समावेश आहे. गव्हाची ४६ टक्के म्हणजेच २२ लाख हेक्टरवरील काढणी झाली. युक्रेनमध्ये गव्हाच्या खालोखाल बार्ली पिकाची लागवड केली जाते. आतापर्यंत बार्लीची ६१ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. चालू आठवड्यात बार्लीची काढणी १५ टक्के वेगाने झाली. एकूण १० लाख हेक्टरमधून ३५ लाख टन बार्लीचं उत्पादन मिळालं. युक्रेनमध्ये गव्हाचं उत्पादन यंदा कमीच राहील. त्यामुळं जागतीक बाजारात पुरवठाही कमी होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
आंतरराष्ट्रीय साखरेच्या वायद्यांत सुधारणा
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या वायद्यानं एक वर्षातील निचांकी दर गाठला होता. कच्च्या साखरेचा दर १७.३४ सेंट प्रतिबुशेल्सपर्यंत खाली आला होता. परंतु शुक्रवारी कच्च्या साखरेच्या वायद्यांत जवळपास २ टक्क्यांनी सुधारणा झाली. ऑक्टोबरचे वायदे १७.७२ सेंट प्रतिबुशेल्सवर पोचले. तर पांढऱ्या साखरेचे वायदे ४.२ टक्क्यांनी कमी होऊन ५३१.६० डाॅलर प्रतिटनाने झाले. जगातील महत्वाच्या साखर उत्पादक ब्राझीलमध्ये दुष्काळी स्थिती वाढल्याचे अहवाल आले. त्यामुळं साखरेच्या दरात सुधारणा झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.
देशात सोयाबीन पेरणी घटली?
मागील खरिपातील सोयाबीनला (Kharif Soybean Rate) चांगला दर मिळाला मिळतोय. खाद्यतेल बाजारात तेजी (Edible Oil Market) असल्याचा फायदा सोयाबीनला (soybean) मिळाला. त्यातच पामतेलाची टंचाई (Palm Oil shortage) होती. त्यामुळं सोयाबीन तेलाला मागणी (Demand For Soybean Oil) वाढली होती. परिणामी देशात ऐन आवकेच्या हंगामात सोयाबीनचे दर वाढलेले होते. विशेष म्हणजे हा दर शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांनी सोयाबीन एकदाच न विकाता टप्प्याटप्यानं विकलं. त्यामुळं बाजारात संतुलीत पुरवठा झाला. त्यामुळं दर टिकून होते. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यामुळं यंदाच्या खरिपात सोयाबीनची लागवड वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस अनेक भागांत झाला नाही. त्यामुळं पेरणीचा निश्चित अंदाज येत नव्हता. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून देशभरात पाऊस झाला.
पेरणीयोग्य पाऊस झाल्यापासून १२ जुलैनंतर परण्यांनी वेग घेतला. त्यात सोयाबीनचे क्षेत्रही वाढले. २२ जुलैपर्यंत देशातील सोयाबीनचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक होता. मात्र २९ जुलैपर्यंत म्हणजेच आजपर्यंत सोयाबीनखालील क्षेत्रवाढीचा वेग कमी झाला. आजपर्यंत देशात सोयाबीनची पेरणी ११५ लाख हेक्टरवर झाली. मागीलवर्षी याच काळात ११२ लाख हेक्टरवर सोयाबीनच पीक होतं. म्हणजेच आजपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा केवळ अडीच टक्क्यांनी पेरणी अधिक झाली. सुरुवातीला सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांची मिळालेली पसंती आता कमी होतेय. पेरणीला उशीर झाल्यानं शेतकरी कमी कालावधीच्या इतर पिकांना प्राधान्य देत आहेत. परिणामी सोयाबीन पेरणीखालील क्षेत्रवाढ कमी होत गेली. त्यामुळं सुरुवातीला सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत होता, त्यात आता बदल होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.