
Market Bulletin:
तुरीचा भाव नरमला
वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती. तुरीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे. मात्र आयातीचा दरावर काहीसा दबाव राहील. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात. सरासरी दरपातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज तूर बाजारातली अभ्यासकांनी व्यक्त केला.
बटाटा दर टिकून
देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढले आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांतील उत्पादन वाढले आहे. मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावला. बटाट्याला पुढे मागणीही चांगली आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हळदीचे दर स्थिर
हळदीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. वाढलेल्या भावात उठाव कमी झाल्याने दरातही काहीशी नरमाई पाहायला मिळाली. बाजारातील हळदीची आवकही कायम आहे. सध्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. तसेच लग्नसराई आणि पुढे सण समारंभामुळे हळदीला चांगला उठाव राहील. त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येईल, असे हळद बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
कोबीचे दर दबावात
बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादीत दिसत आहे. याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे. कोबीचे दर मागील काही आठवड्यापासून दबावातच दिसत आहेत. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
सोयाबीनमध्ये चढ उतार
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसी सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे १०.५१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंड २९४ डाॅलरवर होते. देशातही प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ५० रुपयांनी वाढवले होते. मात्र बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.