
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गावांचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू व म्हैसाळ आणि ताकारी योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू केले. या योजनेच्या मुख्य आणि पोटकालव्यांतूनच पाणी पुढे वाहत जात आहे. कवठे मंहाकाळ तालुक्यातील कोकळे गावाच्या लगत म्हैसाळचा पोटकालवा आहे. पोट कालव्याला मातीचा बांध घालून हे पाणी रस्त्यावर वाहत आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पुढे पाणी कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तिन्हीही योजना सुरू आहेत.
पुरातून वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात देण्याचे व त्यातून या भागातील तलाव भरण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या. परंतु मुख्य आणि पोटकालव्यातूनच पाणी जात आहे. याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. हे पाणी या तिन्हीही योजनांच्या लाभ क्षेत्रातील तलावात भरून दिले तर, भविष्यातील पाण्याची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु जलसंपदा विभागाकडून तलाव भरून देण्याकडे गांभीर्य नाही. या योजनेतून दुष्काळी पट्ट्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तलाव भरण्याचे आदेश शासनाने दिले. ही आवर्तने सुरूही आहेत, मात्र या योजनांतून लाभ क्षेत्रातील तलावच भरले नाहीत. त्यामुळे योजनेचे सुरू असलेले पाणी नक्की कोठे मुरत आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांच्या पूर्व भागातील वाढीच्या अवस्थेतील पिके पावसाअभावी संकटात आली आहेत. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, विहिरींनी तळ गाठला. जिरायती आणि बागायती भागांतील शेतकऱ्यांनी उसनवारी करून खरिपाची पेरणी केली होती; मात्र पदरी नुकसान आले. यामुळे आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोयाबीनचे पीकदेखील संकटात आले असून, पूर्व भागात जनावरांच्या खाद्याचा प्रश्नदेखील आता भेडसावू लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मोठे संकट ओढावलं. काही दिवसांपूर्वी झालेला प्रंचड पाऊस अन् अचानक उन्हाचा तडाखा बसल्याने सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला. याचा सर्वात मोठा फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याला बसला. यामुळे विमा कंपन्यांना याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी जात शेतीची पाहणी केली. किडीचा प्रभाव पाहून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
यंदा राज्यात १४ लाख ३७ हजार २१ हेक्टर ऊस गाळपास उपलब्ध आहे. पण पावसाने दिलेला दगा, त्यामुळे उसाची खुंटलेली वाढ, पाण्याअभावी वाळलेले उसाचे मळे, जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा झालेला वापर या कारणाने उसाच्या क्षेत्रात ५१ हजार हेक्टरने घट संभवते. पण सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी सर्वाधिक दोन लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा त्यामध्ये सुमारे १० हजार हेक्टरने वाढ झाली. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्याची झळ ऊस पिकाला चांगलीच बसली आहे. परिणामी, उसाचे एकरी टनेज घटण्याची शक्यता आहे.
जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला. पुणे विभागात आतापर्यंत दहा लाख ५९ हजार हेक्टर म्हणजेच ९९ टक्के पेरण्या झाल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली, तरी सोलापूर, नगर जिल्ह्यात क्षेत्र वाढले. पण आता पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भात पिकाची १३ हजार ८६४ हेक्टरवर पुनर्लागवड झाली. बाजरी पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर आणि कापूस वाढीच्या अवस्थेत तर मूग आणि उडीद शेंगा लागण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पण पावसाच्या खंडामुळे संकट निर्माण झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.