
ॲग्रोवन वृत्तसेवा
Vidarbh Rain : अकोला ः पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांत सध्या पावसाची चातकासारखी प्रतीक्षा लागली आहे. सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांसह इतर दुय्यम पिकांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या तीन-चार दिवसांत पाऊस न आल्यास या पिकांचे उत्पादन घटीची शक्यता वाढत चालली आहे.
खरीप हंगामातील पेरण्या आटोपलेल्या असून विविध पिकांची वाढीसह फळधारणेची अवस्था सुरू झालेली आहे. यंदा या तीनही जिल्हे मिळून सुमारे साडे नऊ लाख हेक्टरवर सोयाबीन हे प्रमुख पीक लागवड झाले आहे. त्यानंतर कपाशीची साडेतीन लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली. सोबतच तुरीच्या पिकाचीही दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.
सध्या सोयाबीन लागवडीला दीड महिन्यांचा काळ लोटल्याने बहुतांश ठिकाणी फुलोऱ्याची स्थिती सुरू झालेली आहे. कमी दिवसात येणाऱ्या वाणांच्या सोयाबीनला कुठे बारीक शेंगाही दिसू लागल्या आहेत. पीक उत्पादनाच्या दृष्टीने ही सर्वाधिक महत्त्वाची अवस्था आहे. या काळात पावसाअभावी फुलोर गळती होऊ शकते. त्यामुळे थेट उत्पादनावरच परिणामाची शक्यता वाढू लागली.
पावसाचा अनेक भागात २० दिवसांपेक्षा अधिक खंड झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. परिणामी आता दुपारच्या वेळी पीक माना टाकलेले दिसून येते. कपाशीच्या पिकालाही सध्याच्या काळात पावसाची गरज आहे. मूग, उडदाच्या पिकातही फुलोर, शेंगांची अवस्था असल्याने ओलावा हवा आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी दिवसरात्र मेहनत करून पिकाला भिजवत आहेत. खरी अडचण कोरडवाहू पट्ट्यात आहे. आता पाऊस यावा, अशी याचना शेतकरी करू लागले आहेत.
जोरदार पाऊस हवा
या हंगामात असमतोल स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. बुलडाण्यात घाटावरील तालुक्यांमध्ये कमी पाऊस आहे. बुलडाणा तालुक्यात अडीच महिन्यात केवळ २५० मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या केवळ ४८.३ टक्के हा पाऊस आहे. घाटाखालील तालुक्यात अधिक प्रमाणात नोंद झालेली आहे. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात केवळ २४१ (५२ टक्के) मिलिमीटर पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यात वाशीम तालुक्यात ३८४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ६२.१टक्के पाऊस झालेला आहे.
आमच्या चिखली तालुक्यात यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच पाऊस कमी झालेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक चांगला पाऊस पडल्यानंतर पेरणी केली. त्यानंतर अधूनमधून रिमझिम पाऊसच झाला. त्यावरच पिके तग धरून आहेत. गेल्या रविवारी (ता.६) थोडाफार पाऊस झाला. त्यानंतर आता ओढ दिली आहे. सध्या सोयाबीनची फुलोरावस्था असून या काळात पाऊस हवा आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास उत्पादनाला फटका बसू शकतो. पीक आता माना टाकत आहे.
- विजय अंभोरो, सोयाबीन उत्पादक, मंगरुळ, ता. चिखली, जि. बुलडाणा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.