Rabi Crops MSP Hike : केंद्र सरकारने हंगाम २०२४-२५ साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. यात राज्याचं महत्वाचं रब्बी पीक असलेल्या हरभऱ्याच्या हमीभावात १०५ रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदाच्या रब्बीत हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये हमीभाव असेल. तर गव्हाचा हमीभाव १५० रुपयांनी वाढवण्यात आला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक ४२५ रुपये वाढ करण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१८) हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीला मान्यता दिला. रब्बी हंगामात हरभरा हे राज्याचे मुख्य पीक आहे. देशात कडधान्याचा पुरवठा कमी असल्याने मागील काही आठवड्यांपासून हरभऱ्याचा भाव वाढला. तसेच देशातील दुष्काळी स्थिती आणि कडधान्याचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात केंद्र सरकार हरभऱ्याच्या हमीभावात किती वाढ करते, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण सरकारने हमीभावात केवळ १०५ रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदा हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ४४० रुपयांवर पोचला. मागील हंगामात हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव होता.
सरकारने गव्हाच्या हमीभातही १५० रुपयांची वाढ केली. गव्हाचा हमीभाव २ हजार २७५ रुपयांवर पोचला. मागील हंगामात गव्हाचा हमीभाव २ हजार १२५ रुपये होता. मोहरीच्या हमीभावात २०० रुपयांची वाढ करून ५ हजार ६५० रुपये करण्यात आला. सूर्यफुलाच्या हमीभावात मात्र केवळ १५० रुपयांची वाढ करण्यात आली. यंदा सूर्यफुलाला ५ हजार ८०० रुपयांचा आधार मिळेल.
केंद्र सरकारने हरभरा उत्पादकांची काहिशी नाराजी केली असली तरी मसूर उत्पादकांना मात्र काहिसा दिलासा दिला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक ४२५ रुपये वाढ केली. मसूरचा हमीभाव आओता ६ हजार ४२५ रुपयांवर पोचला. मसूर हे काही प्रमाणात तुरीला पर्याय समजली जाते. देशात तुरीचा तुटवडा असून भाव वाढलेले आहेत. काही करूनही तुरीचे भाव कमी होत नसल्याने तुरीला पर्याय ठरू शकणाऱ्या मसूरचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा उद्देश आहे. हमीभावात चांगली वाढ झाल्याने शेतकरी पेरा जास्त वाढवू शकतात. सरकारने खरेदीचीही हमी दिली आहे. पण देशात कमी पडलेला पाऊस आणि धरणांमधील कमी पाणीसाठी यामुळे उत्पादनवाढीवर मर्यादा येऊ शकतात.
रब्बी हंगामातील हमीभाव जाहीर करताना पुन्हा एकदा सरकारने उत्पादन खर्चावर नफा दिल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, यंदा गव्हाला उत्पादन खर्चावर १०२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला. कारण गव्हाचा उत्पादन खर्च ११२८ रुपये असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. तर हरभऱ्याचा उत्पादन खर्च ३ हजार ४०० रुपये असून त्यावर ६० टक्के नफा गृहीत धरून ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला. तसेच मोहरीला ९८ टक्के, मसूरला ८९ टक्के, बार्लीला ६० टक्के आणि सूर्यफुलाला ५२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला, असे केंद्राने म्हटले आहे.
पीक…वाढ…हमीभाव
हरभरा…१०५…५४४०
गहू…१५०…२२७५
मसूर…४२५…६४२५
मोहरी…२००…५६५०
सूर्यफुल…१५०…५८००
बार्ली…११५…१८५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.