Market Bulletin :
सोयाबीनमध्ये काहिशी सुधारणा
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातील चढ उतार कायम आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा दिसून आली. वायदे आज दुपारपर्यंत ९.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१८ डाॅलरवर बंद झाले होते. पण देशात मात्र सोयाबीनचा भाव स्थिरावलेला दिसत आहे. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
कापसात काहिशी वाढ
कापसाच्या भावातही चढ उतार सुरुच आहेत. कापसाच्या वायद्यांमध्ये आज शुक्रवारच्या तुलनेत देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही काहिशी सुधारणा दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७१.९३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायद्यांमध्ये कापूस वाढून ५७ हजार ६२० रुपये प्रतिखंडीवर बंद झाला होता. कच्च्या कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांद्यात चढ उतार
कांद्याच्या भावातील चढ उतार कायम आहेत. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी होत आहे. मात्र भाव जास्त कमी झाल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे. कांद्याचा साठा सध्या शेतकऱ्यांकडे कमी आहे. त्यातच नवा कांदा आवक यंदाही काहिशी उशीरा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांद्यांच्या भावात काहिसे चढ उतार सुरु असले तरी सरासरी भावपातळी काय दिसते. आज कांद्याचा भाव महत्वाच्या बाजारांमध्ये काहिसा काहिसा कमी होऊन सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांदा भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
मोसंबीचे भाव नरमले
मोसंबीचा नवा हंगाम आता सुरु झाला. बाजारात नव्या मोसंबीचा माल सुरु झाला आहे. पण नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील मोसंबी पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मोसंबी पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. गुणवत्ताही खालवली. यामुळे मोसंबीच्या भावावर दबाव आला. सध्या मोसंबीला ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मोसंबीची आवक पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने नुकसान झाल्याने गुवत्तापूर्ण मोसंबीला चांगले मार्केट राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
आल्याचा बाजार टिकून
आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.