चीनकडून खरेदी वाढल्याने पोटॅश खत महागणार
जागतिक पातळीवर पोटॅश खतांचा वापर गेल्या काही वर्षांत वाढतोय. चीन पोटॅश उत्पादनात चौथ्या क्रमांवर असला तरी वापरात मात्र अव्वल आहे. जगातील एकूण पोटॅश वापरात एकट्या चीनचा वाटा तब्बल २० टक्के आहे. चीनला दरवर्षी साधारणपणे १३० लाख टन पोटॅशची गरज असते. परंतु उत्पादन मात्र कमी होते. त्यामुळे आयात करुन गरज भागवली जाते. चीन यंदा जवळपास ७० लाख टन पोटॅश आयात करण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक बाजारात आधीच पोटॅशचा पुरवठा कमी आहे. आता चीन ७० लाख टन आयात करणार म्हणजेच पोटॅशला मागणी वाढेल. परिणामी दरात आणखी वाढ होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.
पामतेल दर नरमल्याचा सोयाबीनवर परिणाम
मागील वर्षात पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर होते. त्यामुळे देशात सोयाबीनचेही दर तेजीत आले. कारण खाद्यतेल टंचाईमुळे उद्योगाकडून सोयाबीनला मागणी वाढली होती. पण आता पामतेलाचे दर नरमले. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचेही दर उतरले आहेत. सीबाॅटवर बुधवारी सोयाबीनचे वायदे १४.६३ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. देशातही त्याचा परिणाम जाणवला. बुधवारी देशात हजर बाजारात सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार २०० रुपये क्विंटल दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. पण देशात त्या प्रमाणात किमती कमी झालेल्या नाहीत.
रशियाची गहू निर्यात यंदा वाढण्याचा अंदाज
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे अमेरिका, युरोपियन युनियन आणि इतर देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे रशियातून धान्य निर्यात ठप्प झाली होती. पण रशियाने निर्बंध लावण्यापूर्वी २०२१-२२ च्या हंगामात एकूण ४०३ लाख टन धान्य निर्यात केले. त्यात ३१५ लाख टन गव्हाचा समावेश होता. रशियाचा सर्वात मोठा ग्राहक टर्की ठरला. त्यानंतर इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया देशांना गहू पुरवठा केला. रशियाने निर्बंधातून मार्ग काढत पुन्हा एकदा निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निर्बंध न घातलेल्या देशांच्या माध्यमातून निर्यात करणे, डॉलरच्या ऐवजी त्या-त्या देशांच्या चलनामध्ये व्यवहार करणे असे उपाय त्यासाठी केले जात आहेत. सध्या जागतिक बाजारात धान्याचा तुटवडा आहे. त्यामुळे यंदा रशियाने ४२५ लाख टन धान्य निर्यातीचं उद्दीष्ट ठेवलंय. तसेच गेल्या वर्षीपेक्षा अधिक गहू निर्यात करण्याचं ठरवलंय. रशियाचा गहू बाजारात आल्यास पुरवठा वाढेल. परिणामी दरावर दबाव येईल, असं जाणकारांनी सांगितलं.
जागतिक सूर्यफुल उत्पादन घटण्याचा अंदाज
जगात खाद्यतेल वापरात पामतेल, सोयातेल आणि मोहरी तेलानंतर सूर्यफुल तेलाचा क्रमांक लागतो. मागील हंगामात जगात ३०८ लाख हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड झाली होती. तर उत्पादन ५९० लाख टन झालं होतं. मात्र यंदा लागवड ३०५ लाख हेक्टर आणि उत्पादन ५६५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. सूर्यफुल उत्पादनात युक्रेन पहिल्या आणि रशिया दुसऱ्या क्रमांकावर असतो. मात्र युध्दामुळे युक्रेनमधील उत्पादन ४३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये १७५ लाख टन उत्पादन झालं होतं, तर यंदा १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तर रशियातील उत्पादन १६० लाख टनांवरून १६५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. इतर देशांतील सूर्यफुल उत्पादनात वाढ दिसतेय. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सूर्यफुलाचे जागतिक उत्पादन ३५ लाख टन कमी राहण्याची चिन्हे आहेत.
हरभरा दरवाढीसाठी स्थिती अनुकूल ?
यंदा जगातील हरभरा उत्पादन (Global Chana Production) घटण्याची चिन्हे आहेत. प्रमुख हरभरा उत्पादक (Chana Producer Country) देशांमध्ये पिकाला प्रतिकूल वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन हरभरा पुरवठ्यात (Chana Supply From Russia Ukraine) आघाडीवर आहेत. मात्र युद्धामुळे या दोन्ही देशांतील लागवड आणि निर्यातीवर परिणाम झालाय. युक्रेनमध्ये तर पेरणीही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे चालू हंगामात जागतिक हरभरा उत्पादन २० टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक देशांत वातावरणीय बदलांमुळे हरभऱ्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झालाय. तसेच पुरवठा साखळीही काही प्रमाणात विस्कळीत झाली. युक्रेनवर हल्ला करण्याआधी रशियाने मोठ्या प्रमाणावर हरभरा निर्यात केली होती.
जागतिक हरभरा निर्यातीत रशियाचा वाटा २५ टक्के होता. ऑस्ट्रेलिया हरभरा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे पिकांना दुष्काळी स्थितीचा फटका बसतोय. तसेच निर्यातदारांना मालवाहतुकीसाठी झगडावं लागतंय. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हरभरा निर्यातदार असलेल्या टर्कीमध्ये यंदा स्थिती नाजूक आहे. अन्नधान्याची वाढती टंचाई आणि भाववाढ यामुळे तिथं अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे टर्कीने हरभरा निर्यातीवर बंदी घातलीय. अमेरिकेत काही भागात दुष्काळ आणि काही भागांत पूरस्थिती असल्याने हरभरा उत्पादनावर परिणाम झालाय. इंधनाचे दर वाढल्यामुळे जहाजे आणि रस्तेमार्गे होणाऱ्या वाहतुकीचा खर्च वाढलाय. परिणामी हरभरा महाग होतोय. अमेरिकेत गेल्या वर्षीपेक्षा हरभऱ्याचे दर १२ टक्क्यांनी वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही मागील काही दिवसांत दर सुधारलेत. जागतिक हरभरा उत्पादन घटीचा अंदाज खरा ठरल्यास दर आणखी सुधारतील, असं जाणकारांनी सांगितलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.