Agrowon Podcast : स्टाॅक लिमिटनंतरही तुरीचे भाव तेजीतच

Tur Market : देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी चांगलीच चर्चेत आहे. तुरीच्या भावाने यंदा सरकारची झोपच उडवली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on: 
Updated on: 

१) कापूस बाजार स्थिरावला (Cotton Rate)

देशातील बाजारात आज कापूस भाव स्थिरावले होते. अनेक ठिकाणी सध्या कापसाचा किमान भाव ७ हजारांपेक्षा कमी झाला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीचे भाव कमी झाले होते.

एकूणच काय तर आज जागतिक कापूस बाजारातच दबाव दिसला. देशातील कापूस बाजारातील स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये सुधारणा (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा दिसली होती. आज सोयाबीनच्या वायद्यांनी १४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा पार केला होता. तर सोयातेलाच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा झाली. सोयातेलाचे वायदे आज ५६.२४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले.

तर सोयापेंडचे वायदे ३९२ डाॅलरवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन आजही ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. सध्या सोयाबीन बाजारात मोठ्या तेजी मंदीचे संकेत दिसत नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.

३) आल्याचे भाव अद्यापही तेजीतच (Ginger Rate)

आल्याच्या भावातील तेजी अद्याप टिकून आहे. बाजारातील आल्याची आवक कमी असून मागणी मात्र चांगली आहे. यंदा आल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. मागील चार ते पाच वर्षे आल्याला चांगला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे लागवड कमी झाली. परिणामी उत्पादन कमी होऊन दरात सुधारणा झाली.

सध्या आल्याचे भाव सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. आल्याचे हे भाव आणखी काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Tur Market
Ginger Market Rate : आल्याचे विक्रमी दर टिकून

४) कांदा दरावरील दबाव कायम (Onion Rate)

कांद्याचे भाव देशातील बाजारात अद्यापही दबावातच आहेत. बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कमी झाल्याचे दिसते. मात्र दरात त्या तुलनेत सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कांदा भाव आजही उत्पादन खर्चापेक्षा कमीच दिसतात, असे शेतकरी सांगत आहेत.

सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक पुढील काही दिवसांनंतर कमी होत जाईल, असे व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले.

५) सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? (Tur Rate)

देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी चांगलीच चर्चेत आहे. तुरीच्या भावाने यंदा सरकारची झोपच उडवली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी होऊन दरात मोठी तेजी आली. सरकारने तुरीवर मागील आठवड्यात स्टाॅक लिमटही लावले.

पण तुरीच्या दरातील तेजी कमी व्हायचे नावचं घेईना. तुरीचा स्टाॅक आहे पण त्याची माहिती लपवली जात आहे, असा संशय केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना तुरीच्या स्टाॅकवर बारिक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Tur Market
Tur Rate : तुरीच्या दरवाढीचा कल कायम

सध्या आयात तुरीचे भावही ९ हजारांपेक्षा जास्त आहेत. आयात तूर बंदरांवर या दरात मिळते. ही तूर बाजारात आणेपर्यंत भाव आणखी जास्त होतात. यामुळे स्थानिक बाजारालाही आधार मिळतो. सध्या देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये तुरीचे भाव १० हजारांवर पोचले. कमाल भाव १० हजार ५०० ते ११ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

तुरीचे भाव वाढल्याने तूर डाळीच्या भावातही वाढ झाली. डाळीच्या भावाने अनेक बाजारांमध्ये १५० रुपयांचा टप्पा गाठला. बाजारात लगेच तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. सप्टेंबरनंतर आफ्रिकेतील तूर बाजारात येते. सध्याची परिस्थिती पाहता तोपर्यंत देशातील दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.