1. देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी नरमली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या मालामध्ये गुणवत्तेचा प्रश्न आहे. त्यामुळे सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. बाजारातील स्थिती पाहता आणखी काही दिवस सोयाबीनची ही भावपातळी कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. कापूस दरावर सध्या दबाव आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव नरमले आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात नरमाई दिसून आली. देशात यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते. पण आणखी काही दिवस दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. राज्यातील बाजारात सध्या काकडीला चांगला भाव मिळत आहे. काकडीची बाजारातील आवक कमी असून उठाव जास्त आहे. यामुळे काकडीचे भाव १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला उठाव वाढलेला दिसत आहे. यंदा पाऊसमान कमी असल्याने काकडीची बाजारातील आवकही स्थिर राहण्याचा अंदाज आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
4. बाजारातील कारली आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. मागणीच्या तुलनेत कारलीचा पुरवठा कमी असल्याने दरही टिकून आहेत. सध्या कारल्याला बाजारात २ हजार ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. कारली पिकाचे राज्यातील अनेक भागांमध्ये नुकताच झालेला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे कारल्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
5. हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशात मागील काही महिन्यांपासून तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. याचा आधार हरभरा दरालाही मिळत आहे. तूर, मूग आणि उडदाच्या भावात तेजी आल्याने हरभराही तेजीत आला. दसरा आणि दिवाळीच्या सणाची मागणी आहे. त्यामुळे हरभऱ्याचे भाव टिकून आहेत. देशभरात सध्या हरभऱ्याचे भाव ५ हजार ५०० ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभऱ्याच्या दरातील तेजी पाहून नाफेडनेही स्टाॅकमधील माल विकण्यास सुरुवात केली. मात्र हरभरा भाव कमी होण्याचे नाव घेईना. देशातील भाववाढू पाहून हरभऱ्याची आयातही वाढली. हरभऱ्याची आयात यापुढील काळातही जास्तच राहण्याचा अंदाज आहे.
देशात यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला. याचा परिणाम हरभरा पिकाच्या उत्पादनावर होऊ शकतो. खरिपातील कडधान्य उत्पादन कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता रब्बीतील उत्पादनही कमीच राहील, असाही अंदाज शेतकरी आणि उद्योगांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे हरभरा भावातील वाढ टिकून राहू शकते. यामुळे आयातही वाढू शकते. पण आयातीचा देशातील भावावर जास्त परिणाम दिसून येणार नाही, भावपातळी टिकून राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.