Agrowon Podcast : सरकारच्या प्रयत्नांतरही तूर तेजीतच

Market Bulletin : केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. आता आफ्रिकेतून तूर आयात वाढत आहे.
Market Bulletin
Market BulletinAgrowon
Published on
Updated on


1. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनची भावपातळी देशातील बाजारात आजही काहिशी कमी झाली. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या बाजारात येणाऱ्या मालामध्ये ओलावा आणि गुणवत्तेचा प्रश्न आहे. तसेच खाद्यतेल आयातीचाही दबाव आहे. पण सोयाबीनची भावपातळी जास्त दिवस दबावात राहणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. 

   
2. देशात आज कापसाचे भाव स्थिर होते. वायद्यांमध्ये मात्र आजही नरमाई दिसून आली. वायद्यांमध्ये कापूस ५९ हजार १०० रुपयांवर आला होता. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसामध्येही सध्या ओलावा जास्त येत आहे. त्यामुळे कापसातील ओलावा कमी करूनच विक्री करणं फायदेशीर ठरेल, असे जाणकारांनी सांगितले.

Market Bulletin
Agrowon Podcast : कांदा व्यवहार पूर्ववत होऊनही दर दबावातच

3. कांद्याचा बाजार सध्या दबावातच आहेत. कांद्याचे बाजार सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यापासून दबावात आहेत. बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असूनही कांद्याला केवळ १ हजार ५०० ते २ हजारांचा भाव मिळत आहे. पण पुढील काही आठवड्यांमध्ये कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

4. राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. डाळिंबाला सध्या गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. गुणवत्तेच्या मालाला प्रतिक्विंटल ९ हजार ते ११ हजारांचा भाव मिळत आहे. तर सरासरी मालाला ६ हजार ते ८ हजारांचा भाव मिळत आहे. डाळिंबाचे उत्पादन कमी असल्याने पुढील काळातही डाळिंब चांगलाच भाव खाऊ शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Market Bulletin
Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम

5. केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुरीचा कमी झालेला पुरवठा. मागील हंगामातील तूर हाती आली तेव्हा बाजारभाव हमीभावाच्याही खाली होती. पण जसजस पावसाचं चित्र स्पष्ट होत गेलं आणि लागवड कमी होत गेली. तसेच उत्पादनाविषयीची चिंता वाढत गेली, तसे तुरीचे भाव सुधारत गेले. जून महिन्यापासून तुरीच्या दरात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यापासून तेजी वाढली. सरकारने तुरीची आयात खुली केली. स्टाॅक लिमिट लावले. आफ्रिकेतील देशांना जास्तीत जास्त तूर द्यावी, यासाठी प्रोत्साहन दिले. बंदरांवरील माल लवकर बाजारात यावा यासाठी धोरणही राबवले.

आफ्रिकेतील तूर आयात होत आहे. पण आयातीचे प्रमाण कमी आहे. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी दिसतो. त्यामुळे भाव कमी होताना दिसत नाहीत. तुरीचे भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान कायम आहेत. तूर डाळीचे भाव बाजारात सरासरी १५० रुपयांच्या दरम्यान आहेत. भाव वाढले तरी तूर डाळीचा उठाव कायम आहे. याचा आधार दराला मिळत आहे. यंदाही देशातील तूर लागवड कमी आहे. कमी पाऊस आणि उष्णतेचा तूर पिकाला फटका बसत आहे. यामुळे पुढील काळातही तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com