Cotton Rate : पावसामुळं कापूस उशीरा येणार?

सध्या देशात कापासची टंचाई जाणवत आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात जवळपास १२७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. मात्र गुजरात आणि महाराष्ट्र या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस काढणीला उशीरा येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
cotton rate
cotton rate agrowon

मका दर स्थिरावले

1. मका दर मागील काही दिवसांमध्ये स्थिरावले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मक्याचा भाव २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान होता. मात्र दर वाढल्यानं पशुखाद्य उद्योगातून मक्याची मागणी १० ते १५ टक्क्यांनी कमी झाली होती. त्यामुळं दर २४०० रुपयांपर्यंत नरमले होते. आता मक्याची मागणी पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यातच खरिपात मक्याचा पेरा अपेक्षेपेक्षा कमीच झालाय. पिकावर कीड-रोगांचं आक्रमणही वाढलंय. त्यामुळं मक्याचा भाव २४०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावलाय. मक्याला मागणी वाढल्यानंतर दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

cotton rate
Maize : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

ज्वारीचे दर टिकून राहणार

2. राज्यातील बाजारात सध्या ज्वारीला चांगला दर मिळतोय. देशात गहू आणि तांदळाचे दर सध्या तेजीत आहेत. यामुळं सर्वच धान्याच्या दरातही सुधारणा पाहायला मिळतेय. मागणी वाढल्यानं ज्वारीचे दरही काही प्रमाणात सुधारले आहेत. राज्यात सध्या दादरा ज्वारीला प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपये दर मिळतोय. तर हायब्रीडला सरासरी २ हजार रुपये आणि मालदांडी ज्वारीचे व्यवहार ३५०० रुपयाने होत आहेत. शाळूलाही ३ हजार ते ३ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. ज्वारीचा हा दर टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीये.

cotton rate
Jowar Rate : दौंडमध्ये ज्वारीला क्विंटलला १६७५ ते ३००१ रुपये दर

ब्राॅयलर पक्षाचे दर वाढले

3. देशात ब्राॅयलर पक्षांच्या खरेदी दरात म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात सुधारणा झाली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये ब्राॅयलर पक्षांच्या दरात घट झाली होती. लोक श्रावण आणि गणपती उत्सवात मांसाहार टाळतात. त्यामुळं ब्राॅयलर पक्षांच्या खरेदी दरात मोठी घसरण झाली होती. पक्षाचे दर किलोला ६० ते ७० रुपयांपर्यंत कमी झाले होते. मात्र चिकनचा किरकोळ विक्री दर २०० ते २३० रुपयांपर्यंत कायम होता. आता चिकनला मागणी वाढली. त्यामुळं ब्राॅयलर पक्षाचे दरही १३० रुपयांपर्यंत पोचले. हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

cotton rate
का महागतं उन्हाळ्यात चिकन ?

कारल्याचे दर तेजीतच

4. बाजारात कारली भाव खात आहेत. बाजारात सध्या कारल्याची आवक घटली आहे. मुंबई आणि पुणे वगळता राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कारल्याची आवक ५० क्विंटलपेक्षा जास्त दिसत नाही. त्यामुळं मागील काही दिवसांपासून कारल्याच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या कारल्याला उठाव चांगला मिळतोय. त्यामुळं सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयाने कारल्याचे व्यवहार होत आहेत. कारल्याचा पुरवठा लगेच वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं कारल्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

पावसामुळं कापूस उशीरा येणार?

5. देशातील बाजारात सध्या कापसाचे दर (Cotton Rate) तेजीत आहेत. देशात कापूस उत्पादनात (Cotton Production) गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन महत्वाची राज्ये आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात जवळपास १२७ लाख हेक्टरवर कापूस लागवड (Cotton Cultivation) पोचली. महाराष्ट्रात अंदाजे ४५ लाख हेक्टर तर गुजरातमध्ये २६ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाल्याचा अंदाज आहे. म्हणजेच गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा देशातील एकूण लागवडीतील वाटा हा जवळपास ५६ टक्के आहे. तर एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन या दोन्ही राज्यांमध्ये होतं.

गुजरात आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादन आणि आवकेनुसार बाजार फिरत असतो, असं जाणकारांनी सांगितलं. मात्र मागील चार ते पाच दिवस या दोन्ही राज्यांतील अनेक भागांत पाऊस झाला. पावसाचा ताण बसल्यानंतर पाऊस झाल्यानं पिकाला दिलासाच मिळाला. देशात साधारणपणे १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा संपतो. पण हवामान विभागानं सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचा अंदाज जाहीर केलाय. पाऊस लांबल्यास बाजारातील कापूस आवकही उशीरा होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या देशात कापसाची टंचाई असल्यानं दर तेजीत आहेत. त्यातच नव्या हंगामातील कापूस उशीरा दाखल झाल्यास दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. सध्या देशात कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळतोय. हा दर लक्षात ठेऊन शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com