
देशातील बाजारात कांद्याचे भाव मागील एक महिन्यापासून वाढताना दिसत आहेत. जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही कमी झालेली दिसते. कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. पण महाराष्ट्रातील बाजारांमधील कांदा आवक तीन आठवड्यांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे कांद्याचे भाव १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांवर पोचले. बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारात टोमॅटोचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाले. ऑगस्टच्या सुरुवातीला भाव प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर होते. पण सध्या भावपातळी ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी झाले. बाजारातील वाढत असलेल्या आवकेमुळे बाजारावर दबाव आला, असे व्यापारी सांगत आहेत. आवकेचा दबाव जास्त दिवस राहणार नाही. त्यामुळे काही दिवसांमध्ये भाव कमी झाले तरी पुन्हा या पातळीवर येतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. देशात आज काही बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारांमध्येही सोयाबीनचे भाव ५० रुपयांनी वाढून ४ हजार ४०० ते ४ हजार ८५० रुपये भाव मिळत आहे. खाद्यतेल बाजार आणि ब्राझीलमधून होणारी निर्यात पाहता सोयाबीन दरात लगेच मोठ्या भाववाढीची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात लसणाच्या दराला चांगलाच तडका मिळाला. सध्या बाजारातील आवक कमी झाली. तर नव्या लागवडीही घटलेल्या दिसतात. पावसाच्या खंडाचाही लसूण पिकावर परिणाम होऊ होत असल्याचे शेतकरी सांगतात. आवक कमी आसताना मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळे सध्या लसणाला १० हजार ते १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. लसणाचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
देशात कापूस लागवड १२१ लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. पण कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये पाऊस रुसून बसला. यापैकी एकट्या महाराष्ट्रातच देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल ३४ टक्के क्षेत्र आहे. त्यातच खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात कापूस लागवड होते. या तीन विभागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पिकाला फटका बसला. तर गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकातही पाऊस कमी आहे. तसेच अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते यंदा जागतिक कापूस उत्पादनात घट होणार आहे.
चीन, भारत, अमेरिका आणि ब्राझील या चारही महत्वाच्या देशांमधील उत्पादन कमी राहणार आहे. तर जागतिक कापूस वापर वाढणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव वाढलेले दिसतात. देशातील बाजारात कापसाचा कमाल भाव ८ हजार ४०० रुपयांवर पोचला. गुजरातमध्ये हा भाव मिळाला. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कमाल भाव ८ हजारांवर होता. सरासरी दरपातळी आज ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. पण वायदे ६० हजार रुपयांपेक्षा अधिक आहेत. पुढील काळात कापूस दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.