Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात पावसाचा खंड, यानंतर झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) लाखो हेक्टरवरील पिकांचा घास घेतला (Crop Damage). यानंतर शिल्लक राहिलेल्या सोयाबीन पिकांची कापणी (Soybean Harvesting) सुरु असताना मागील तीन दिवसापासून पाऊस होत आहे.

या पावसामुळे संकटाची मालिका सुरु असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कापलेले सोयाबीन भिजू नये यासाठी ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.

जिल्ह्यात जूनमध्ये खरिपांच्या पेरण्या झाल्यानंतर जुलैमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सखल तसेच नाल्याकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यात पाच लाख १८ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले.

या नैसर्गिक आपत्तीचा फटका सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बसला. यंदा शेतकऱ्यांना सतत संकटाचा सामना करावा लागला.

या आपत्तीतून शिल्लक राहिलेले सोयाबीनचे पीक सध्या काढणीला आले असताना मागील तीन दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.

या पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कापणी केलेले सोयाबीन अनेक ठिकाणी पावसाने भिजले आहे.

परिणामी धान्याला मोड फुटून नुकसान होत असल्याने ते पीक झाकण्यासाठी शेतकरी धावाधाव करीत आहेत. परंतु या कामालाही मर्यादा येत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.क्लिक

cta image
क्लिक करा