
Kolhapur News : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजार समितीत गुळाच्या आवकेत घट झाली आहे. आवक कमी झाली असून, गुजरातमधूनही मागणी फारशी नाही. यामुळे दरही फारसे नसल्याचे चित्र आहे. सध्या गुळास क्विंटलला सरासरी ४१०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत एक दिवसाआड तीन ते चार हजार गूळ रव्यांची आवक होत आहे.
गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील गूळ पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे गूळ उत्पादनाला मर्यादा आली. मार्चमध्ये मुख्य गूळ हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यातही काही गुऱ्हाळे सुरू असतात. पण त्याचे प्रमाण कमी असते. साधारणतः संततधार पाऊस सुरू होण्यापूर्वी जूनपर्यंत गुळाची आवक सुरू असते. यंदा मेमध्येच संततधार पावसाने सुरुवात केल्यानंतर गुळाच्या आवकेत तीस ते पस्तीस टक्क्यांनी घट आली.
पाडव्यापासून बाजार समितीत एक दिवसाआड सौदे होत आहेत. एक दिवसाआड सौदै असले तरी मेपर्यंत ४५०० रुपयांपर्यंत दर वधारला होता. गुजरातमधून मेच्या मध्यापर्यंत गुळाची चांगली मागणी राहिली.
मेच्या उत्तरार्धात कोल्हापुरातील गूळ पट्यात संततधार पाऊस सुरू झाल्याने गूळ निर्मिती थांबली. याच बरोबर लग्न सराईमुळे गुजरातमधून गुळाची आवकही कमी झाली. मागणी कमी झाल्याने गुजरातमधील व्यापाऱ्यांनी अगदी मोजकाच गूळ खरेदी केला. परिणामी दर स्थिर राहू शकले नाहीत. सध्या ४००० रुपये प्रति क्विंटलच्या वर दर असले तरी मागणी मात्र मध्यमच असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
गूळ पट्ट्यातील ज्या गुऱ्हाळ मालकांना ऊस वर्षभर उपलब्ध होतो त्यांनी गुऱ्हाळ घरांमध्ये सुधारणा करत जळण सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य दिले. यामुळे पावसातही काही गुऱ्हाळांमध्ये गूळ निर्मिती सुरू राहिली. हा गूळ बाजार समितीत आला. पण सौदे मात्र एक दोन तासांत आवरत असल्याचे गूळ विभागातून सांगण्यात आले.
सध्या पावसाळ्याची सुरुवात असल्याने दरात कितपत वाढ होईल या बाबत साशंकता आहे. कोल्हापूरबरोबर कर्नाटकातही वर्षभर गूळ तयार होत असल्याने यंदाही शीतगृहासाठी गूळ खरेदी करणे अत्यल्प राहिले. सध्या तरी जेवढी मागणी तेवढाच गूळ खरेदी केला जात असल्याचे गूळ उद्योगातून सांगण्यात आले.
गुळाचे दर्जानुसार दर, प्रति क्विंटल रुपये (किमान कमाल)
दर्जा दर
१ ४८२५-४८२५
२ ४२००-४७००
३) ४०००-४१९०
४) ३७००-३९००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.