दिवाळीमुळे बऱ्याच बाजारपेठांमध्ये या सप्ताहात आवक कमी होती. यापुढे खरीप पिकाच्या आवकेला (Kharif Crop Arrival) वेग मिळेल. कापूस (Cotton), मका (Maize) व सोयाबीनच्या आवकेत (Soybean Arrival) लक्षणीय वाढ दिसून येत आहे. हळद, हरभरा, मूग, तूर व टोमॅटो यांची आवक उतरती आहे. आवकेचा परिणाम म्हणून कापूस व मका यांच्या किमतीत ऑक्टोबर महिन्यात उतरता कल दिसून आला. हळद व मूग यांच्या किमती वाढल्या. इतरांच्या किमती स्थिर होत्या.
या सप्ताहात जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती उतरल्या. मक्याच्या किमती ६.७ टक्क्यांनी, तर कापसाच्या किमती ४.८ टक्क्यांनी उतरल्या. कांदा व टोमॅटो यांच्या किमतीसुद्धा उतरल्या. सोयाबीनच्या किमतीत मात्र बदल झाला नाही.
या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) सप्टेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.९ टक्क्यांनी घसरून ३२,९८० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा ४.८ टक्क्यांनी घसरून ३१,४१० वर आले आहेत. नोव्हेंबर डिलिव्हरी भाव ३.७ टक्क्यांनी घसरून रु. २८,८१० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ३.५ टक्क्यांनी घसरून रु १,६९२ वर आले आहेत. नवीन वर्षासाठी कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.
मका
मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती ६.७ टक्क्यांनी घसरून रु. २,१०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (नोव्हेंबर डिलिव्हरी) किमती ६.८ टक्क्यांनी घसरून रु. २,१०८ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स किमती रु. २,१३१ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मात्र या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी म्हणजे २३.१ दशलक्ष टन राहील असा शासनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते २२.६३ दशलक्ष टन होते.
हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ७,२७१ वर स्थिर आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,४४४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. ७,५५४ वर आल्या आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ४,५६० ते रु. ४,७०० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. ४,६४७ वर आल्या आहेत.
मूग
मुगाच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.४ टक्क्याने वाढून रु. ७,२०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.
सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) सप्टेंबर महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती २.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,३०३ वर आली होती; या सप्ताहात किमतीत काही बदल झाला नाही. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात २.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,१५० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
कांदा
कांद्याच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. २,१५८ होती; या सप्ताहात ती रु. १,९०० वर आली आहे.
टोमॅटो
टोमॅटोच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,५०० होती. या सप्ताहात ती रु. २,००० पर्यंत आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
२९ ऑक्टोबर २०२२
ब-६, कलाबसंत सोसायटी, १५वी गल्ली, भांडारकर रस्ता, पुणे ४११००४; फोन: ९४२०१७७३४८ arun.cqr@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.