Pulses : कडधान्यांमधील तेजी कितपत टिकाऊ ?

कडधान्यांमधील सध्याच्या तेजीकडे आपल्याकडील साठे कमी करण्याची संधी म्हणून पाहता येईल. बाजार सूत्रांनी तुरीचे भाव प्रति क्विंटल ८४०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे; तर हरभरा एकदा हमीभाव पातळी म्हणजे ५२३० रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढू शकेल, असेही म्हटले आहे. मात्र प्रत्येकाने आपापल्या भागातील परिस्थिती पाहून वेळीच निर्णय घेणे उचित राहील. अन्यथा १३,००० रुपयांना कापूस विकायला नकार देऊन नंतर तो ९५०० रुपयांना विकावा लागण्याची वेळ अनेकांवर ओढवली. तशी परिस्थिती तुरीच्या बाबतीत उद्भवू शकेल. याला अपवाद उडदाचा. उडीद आपल्याला फक्त म्यानमारकडूनच मिळू शकतो. त्यामुळे तो बाजार ‘टाईट’ राहू शकेल.
Pulses
PulsesAgrowon

जून महिन्याच्या अखेरीस जसजशी खरिपातील पेरण्यांची (Data Of Kharif Sowing Corp) साप्ताहिक सरकारी आकडेवारी प्रसारित होऊ लागली तसतशी कडधान्यांच्या किमतींमध्ये वाढ (Pulses Rate) होऊ लागली. सुरवातीला साधारण वाटणारी या घटनेने अल्पावधीतच मोठ्या तेजीचे रूप धारण केले आहे. बघता बघता कडधान्यांच्या किमती (Pulses Price) १५-२५ टक्के वाढल्या देखील. खास करून तुरीच्या किंमती प्रति क्विंटल ६,३०० रुपयांवरून ७,८००-८,००० रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्या अनुषंगाने मूग (Green Gram) आणि उडीद देखील चांगलेच वधारले. यामुळे अनेक महिन्यांपासून कडधान्य मंदीने ग्रासलेल्या व्यापाऱ्यांना आणि स्टॉकिस्ट्सना तसेच थोड्याफार शेतकऱ्यांना थोडे चांगले दिवस आले असे म्हणता येईल. अर्थात या तेजीच्या सुरवातीच्या काळातच अनेक जणांनी, खास करून शेतकरी वर्गाने आपल्याजवळील साठे विकून टाकल्यामुळे त्यांना फार फायदा झाला असे म्हणता येणार नाही. या अचानक आलेल्या तेजीने अनेकांना चक्रावून टाकले आहे. त्यामुळे आता या तेजीचे मूळ कारण काय, ही तेजी कितपत टिकाऊ आहे आणि यापुढे काय असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

Pulses
Pulses Processing : डाळ प्रक्रिया उद्योग झाला उत्पन्नाचा मुख्य स्रोत

पेरण्यांचे चित्र

या महिन्याच्या ५ तारखेपर्यंतची प्रसिद्ध झालेली आकडेवारी असे दर्शवते की कडधान्यांचे पेरणीक्षेत्र अजूनही अडीच टक्के पिछाडीवर आहे. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १० % पिछाडी तुरीमध्ये आहे, तर उडीद पेरणी देखील ६ % मागेच आहे. यावर्षी मोसमी पावसाच्या विलंबामुळे पेरण्या सुमारे महिनाभर तरी पुढे गेल्या आहेत. जुलैच्या सुरवातीला तुरीच्या क्षेत्रामध्ये २५ टक्क्यांहून अधिक पिछाडी होती. उडीद आणि मूग देखील पिछाडीवरच होते. तर एकंदर कडधान्य पेरण्या २०-२५ % मागे असल्यामुळे बाजाराला तेजीचे कारण मिळाले, असे म्हणता येईल. मात्र जुलैमध्ये पावसाने चांगलीच वेगवान मुसंडी मारल्यामुळे पेरण्या वाढल्या असल्या तरी अजूनही मागील वर्षांपेक्षा तूर १० % कमी आहे तर उडीद पेरण्या देखील थोड्या कमीच आहेत. मुगाचे क्षेत्र मात्र थोडे वाढले आहे.

राज्यनिहाय पेरण्यांची आकडेवारी बघितली तर राजस्थानवर यंदा पाऊस मेहरबान झालेला दिसत आहे. तेथे कडधान्य पेरण्या चांगल्याच वाढल्या आहेत. विशेषतः मुगाखालील क्षेत्रामध्ये २५ % वाढ असून मटकी क्षेत्र ५५ % वाढले आहे. मात्र उडीद १५ % मागे आहे. गुजरातमध्ये मात्र मूग २० % मागे आहे उडीद पेरणी जवळपास निम्म्यावर आलेली दिसत आहे. तरी देखील उडदाचे क्षेत्र मागील वर्षीच्या आकडेवारीजवळ आलेले आहे, ते प्रामुख्याने दक्षिण भारतात जास्त पेरण्या झाल्यामुळे.

खरीप हंगाम पेरण्या जवळ जवळ संपल्यात जमा असून देशस्तरावर अजूनही अंतिम आकडेवारी आलेली नाही. तसेच पेरण्यांची आकडेवारी संकलित करण्याच्या प्रक्रियेचा विचार करता अंतिम आकडेवारीत ५ % मागे-पुढे तफावत संभवते. सध्याच्या तेजीमुळे तुरीचे क्षेत्र अजूनही वाढू शकेल.

Pulses
Pulses Rate: तूर, उडदाचे दर चढे राहणार ?

पीकपाण्याबद्दल अपेक्षा

पीकपेऱ्याची वरील आकडेवारी पाहता कडधान्यांचे उत्पादन मागील खरीप हंगामापेक्षा कमी असेलच असे नाही. कारण मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये काढणीच्या वेळी पावसाने झालेले नुकसान यावर्षी होईलच असे नाही. किंबहुना मुगाची आवक सोलापूरमध्ये सुरूदेखील झाली आहे. तर कर्नाटकमधील गदग आणि इतर सीमाभागातील मुगाचे उत्पादन चांगले झाले असल्याचे बोलले जात

आहे. मोसमी पावसाचा उत्तरार्ध चांगला राहिला आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मागील वर्षीप्रमाणे पाऊस झाला नाही तर कदाचित तुरीचे उत्पादन देखील मागील वर्षीच्या जवळपास राहील. मात्र खरिपातील उडदाचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. याचे कारण दक्षिण भारतात अलीकडे झालेल्या पावसाने या पिकाचे नुकसान झाले असल्याचे समजते. म्हणजेच खरीप कडधान्य हंगाम मागील वर्षीच्या तुलनेत फारसा मागे राहील असे नाही.

Pulses
Pulses: छत्तीसगडमध्ये कडधान्यांच्या सरकारी खरेदीची हमी

तेजीचे टिकाऊपण

मुळात तेजी सुरू झाली ती तुरीच्या क्षेत्रातील मोठ्या पिछाडीमुळे. त्याच दरम्यान गहू आणि तांदूळ निर्यातीबाबतचे सरकारी पातळीवरील वादविवाद सुरू होते. आणि त्यानंतर पावसाच्या विलंबामुळे एकंदरीतच खरीप हंगामाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तेजीला खतपाणी मिळाले. पाठोपाठ पावसाने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान आणि भडकलेल्या किमती तसेच सणासुदीच्या हंगामाची सुरवात यामुळे देखील कडधान्यांची, विशेषकरून हरभऱ्याची, मागणी वाढली. परंतु एकंदर पीकपाण्याच्या अपेक्षेचा विचार करता मूग आणि तूर यांच्या देशांतर्गत पुरवठ्यामध्ये मोठी घट येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. तसेच आफ्रिकेमधील तुरीचा पुरवठा चांगला असून भारताव्यतिरिक्त त्याला मोठी बाजारपेठ नाही. तुरीची आयात म्यानमारमधून देखील मोठ्या प्रमाणात होईल. यापैकी बरीच आयात या महिन्याअखेरपासून भारतात होणार आहे. उद्या मूग वाया गेला तरी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथून आयात शक्य होईल. मुळात सरकारने कडधान्यांची आयात सूट ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविलेली असल्याने योग्य वेळी सरकारी हस्तक्षेप देखील होऊ शकेल. कडधान्यांवर साठे नियंत्रण आणण्याचा विचार नसल्याचे सरकारने लोकसभेमध्ये सांगितले असले तरी गहू, आणि खाद्यतेलाच्या बाबतीत काय झाले, यावरून सरकारच्या कथनी आणि करणीतला फरक समजणे अवघड नाही.

वरील गोष्टींचा विचार करता असे लक्षात येईल की सध्याच्या तेजीकडे आपल्याकडील साठे कमी करण्याची संधी म्हणून पाहता येईल. बाजार सूत्रांनी तुरीचे भाव प्रति क्विंटल ८४०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे; तर हरभरा एकदा हमीभाव पातळी म्हणजे ५२३० रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढू शकेल, असेही म्हटले आहे. मात्र प्रत्येकाने आपापल्या भागातील परिस्थिती पाहून वेळीच निर्णय घेणे उचित राहील. अन्यथा १३,००० रुपयांना कापूस विकायला नकार देऊन नंतर तो ९५०० रुपयांना विकावा लागण्याची वेळ अनेकांवर ओढवली. तशी परिस्थिती तुरीच्या बाबतीत उद्भवू शकेल. याला अपवाद उडदाचा. उडीद आपल्याला फक्त म्यानमारकडूनच मिळू शकतो. त्यामुळे तो बाजार ‘टाईट’ राहू शकेल. ज्यांच्या दुबार सोयाबीन पेरण्या वाहून गेल्या, त्यांनी लगेचच ६५-७० दिवसांचे उडदाचे पीक घेतल्यास ऑक्टोबरमध्ये पीक हाती येण्याची चांगली संधी आहे. शिवाय नोव्हेंबरपूर्वी रब्बी पिकासाठी क्षेत्रदेखील मोकळे होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com