राज्यातील पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी आणि कडधान्य लागवडीस चालना देण्यासाठी छत्तीसगड सरकारने या खरीपातील कडधान्याची हमीभावाने (MSP) खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील तूर, उडीद आणि मुगाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.
राज्य सरकार २०२२-२०२३ या खरीप हंगामातील कडधान्याला हमीभावाचा लाभ देणार असून छत्तीसगड सरकारकडून प्रथमच असा निर्णय घेण्यात आला. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या तुर आणि उडदासाठी प्रति क्विंटल ६६०० रुपयांचा हमीभाव (MSP) मिळणार आहे. मुगासाठी ७७५५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळणार आहे.
छत्तीसगड राज्य सहकारी पणन महासंघाकडून (Markfed) कडधान्य खरेदी केली जाणार असून राज्यातील २५ बाजार समित्यांत ही खरेदी प्रक्रिया चालणार आहे. १७ ऑक्टोबर २०२२ ते १६ डिसेंबर २०२२ दरम्यान राज्यातील मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. तर शेतकरी आपली तूर १३ मार्च २०२३ ते १२ मे २०२३ दरम्यान विकू शकणार आहेत.
कडधान्याच्या खरेदी प्रक्रियेसंदर्भातील सूचना राज्याच्या कृषी विभागाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, बाजार समित्या आणि मार्कफेडच्या विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत.मागच्या काही वर्षांत राज्यातील कडधान्य लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने घट होताना दिसत आहे. पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांना भातपिकाऐवजी अन्य पिकांच्या लागवडीस प्रवृत्त करण्यासाठी कडधान्याला हमीभावाचा (MSP) लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे छत्तीसगडचे कृषीमंत्री रवींद्र चौबे (Ravindra Choubey) यांनी सांगितले.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers' Income) वाढ होईल, याखेरीज राज्यातील कडधान्य लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचा विश्वासही चौबे यांनी नमूद केले.
मागच्या वर्षी २,७७,३३० हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली होती. २०२२-२०२३ या खरिपात ४,४८,१८० हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड करण्यात आली. २०२१-२०२२ च्या खरिपात राज्याने १ लाख ३९०४० टन कडधान्याची खरेदी केली होती. या खरिपात सरकारने २ लाख ३२ हजार टन कडधान्य खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारला या खरिपात हेक्टरी ५२० किलो उत्पादनाची अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.