Pulses Processing : डाळ प्रक्रिया उद्योग झाला उत्पन्नाचा मुख्य स्रोत

पुणे शहरातील खासगी कंपनीची नोकरी सोडून शेती करण्याच्या उद्देशाने अशोक भगुरे यांनी गेवराई (बार्शी) (जि.. औरंगाबाद) या आपल्या गावी धाव घेतली. शोधक व जिज्ञासावृत्ती, धडपडीतून त्यांना शेतकरी गटांमार्फत थेट विक्री, मिनी डाळ मिल, क्लिनिंग- ग्रेडिंग युनिट असे पर्याय मिळाले. बिडकीन येथे भाडेतत्वावरील जागेत उभारलेला हा उद्योग चार वर्षांपासून कुटुंबाच्या अर्थार्जनाचा मुख्य स्रोत झाला आहे.
Processing Industry
Processing IndustryAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील गेवराई (बार्शी) येथील अशोक बालचंद भगुरे यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. सन २०१५ पासून अशोकराव शेतीकडे वळले. त्यापूर्वी ते पुणे येथील खासगी कंपनीत नोकरी करायचे. नोकरीतही शेतीची आवड जपलेली होती. तिथे ॲग्रोवन व शेतीविषयक साहित्याच्या वाचनातून शेतीतच काही करण्याची इच्छा निर्माण झाली. मग राजीनामा देत गावची वाट धरली. परंतु अल्प शेती, सिंचनाची मर्यादा, त्यातील अल्प अर्थार्जन यातून अनेक प्रश्न उभे ठाकले. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा औरंगाबाद शहरात चार-सहा महिने खासगी नोकरी पत्करली. परंतु त्यात मन रमेना. मग शेतीशी निगडित उद्योग करण्याचे ठरवून पर्यायांचा शोध सुरू ठेवला. वडिलोपार्जित चार एकरांत भगुरे कुटुंब कपाशी, तूर आदी पिके घेत आले. अलीकडील दोन वर्षांपासून कपाशी तसेच प्रत्येकी पाच ते १० गुंठ्यात टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, गवार, दोडकी आदी भाजीपाला पिके ते घेतात. दहा गुंठे शेडनेट आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र कमी- जास्त होते. (Pulses Processing Industry Became The Main Source Of Income)

Processing Industry
डाळी खा आणि आजारांना दूर पळवा

स्थापला शेतकरी गट

अशोकराव पुणे येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेले असता ‘आत्मा’ च्या माध्यमातून गट स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच गावातील समविचारी १५ शेतकऱ्यांना सोबत घेऊन 'जय किसान' शेतकरी गटाची स्थापना केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) मदत घेतली. तेथील तज्ज्ञांमार्फत गटाद्वारे शेतमालाची थेट विक्री करण्याबाबत मार्गदर्शन मिळाले. ‘आत्मा’ ची जोड मिळाली.

थेट विक्रीने दिली दिशा

सन २०१५ पासून गटाद्वारे भाजीपाला, फळे, धान्य आदींची थेट विक्री कृषी विभागाच्या योजनेंतर्गत ‘मोबाईल व्हॅन’ च्या माध्यमातून सुरू केली. दरम्यान औरंगाबाद शहरातील विविध निवासी सोसायट्यांमधील ग्राहक जोडले. आजच्या घडीला सुमारे सात सोसायट्यांमधील ग्राहक गटाकडून शेतमाल खरेदी करतात. शहरांतील सुमारे हजारांवर ग्राहक गटाला थेट जोडले आहेत. या व्यवसायामुळेच शेतमालावर प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिकचे उत्पन्न मिळू शकेल याची दिशा मिळाली.

Processing Industry
हरियानामध्ये बाजरीऐवजी डाळी, तेलबियांना प्रोत्साहन

प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल

ॲग्रोवनच्या वाचनातून मिनी डाळ मिल, क्लिनिंग- ग्रेडिंग’ या पर्यायाचा शोध लागला. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही ‘केव्हीके’च्या माध्यमातून पूर्ण केले. बिडकीन (ता. पैठण) येथील भाडेतत्वावरील जागेत सन २०१८ मध्ये प्रकल्प सुरू केला. तीन लाख रुपयांच्या ‘क्लिनिंग-ग्रेडिंग’ यंत्रासाठी कृषी विभागाच्या योजनेतून ५० टक्के अर्थसाह्य तर ५० टक्के रक्कम बँक कर्जरूपातून उभी केली. यंत्राची क्षमता ताशी तीन क्विंटलची आहे.

तूर, हरभरा डाळींपासून सुरवात

शेतकरी ग्राहकांना डाळ तयार करून देणे तसेच आपल्या गटातील शेतकऱ्यांकडील तूर व हरभऱ्याची डाळ विकण्याचे धोरण भगुरे यांनी अवलंबिले. सन २०१८ ते २०२१ दरम्यान ते प्रति किलो ८ रुपये दराने डाळ तयार करून देत. सन २०२२ मध्ये दोन रुपयांची वाढ केली. आपल्याकडील डाळींची २०१८ मध्ये ९० रुपये तर २०१९ मध्ये शंभर रुपये प्रति किलो दराने विक्री केली. सध्या ११० ते १२० रुपये प्रति किलो दराने जोडलेल्या ग्राहकांना विक्री सुरू आहे. सन २०१८ मध्ये १५० क्विंटल, तर २०२१ मध्ये १०० क्विंटल डाळ तयार करून दिली. यंदा तयार करून दिलेली डाळ १२० क्विंटल असून, आपल्याकडील डाळीची २० क्विंटलपर्यंत विक्री केली आहे. आठ ते दहा क्विंटल तूर, हरभरा डाळ विक्रीसाठी बाकी आहे. शिवाय दरवर्षी सुमारे १०० क्विंटल गव्हावर प्रक्रिया करून देण्यात येते. त्यासाठी प्रति क्विंटल १०० रुपये दर आकारण्यात येतो.

प्रशिक्षणांतून कौशल्यवृद्धी

शेती व प्रक्रिया उद्योगाशी नाळ जोडताना भगुरे यांनी विविध प्रशिक्षणे घेतली आहेत. यात मधुमक्षिकापालन, ‘ग्रीन हाउस’ व्यवस्थापन, शेतमालाची सुरक्षित साठवणूक, ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रासाठी शेतीमाल पुरवठा- एक उद्योग, डाळ प्रक्रिया युनिट प्रात्यक्षिक आदींचा समावेश आहे. खादी ग्रामोद्योगाची मदतही त्यासाठी झाली आहे.

कुटुंबाला स्थैर्य

जानेवारी ते जून हा डाळ प्रक्रियेचा मुख्य कालावधी असतो. त्यातून कुटुंबातील तिघांच्या हाताला कायम तर किमान दोन मजुरांना प्रसंगानुरूप रोजगार मिळाला आहे. मुंबई, पुणे येतील ग्राहकांना वर्षाला दोन ते तीन क्विंटल डाळींचा पुरवठा होतो. उद्योगातून वार्षिक दोन ते अडीच लाख रुपयांचे तर भाजीपाला उत्पादन व थेट विक्रीतूनही साधारण तेवढेच उत्पन्न मिळते. त्यातून आर्थिक व कौटुंबिक स्थैर्य आणले आहे. सिंचनासाठी विहीर व संपूर्ण क्षेत्र ठिबकवर आहे. दरवर्षी दोन ते तीन एकरांत सीताफळ, आंबा व चिकू उत्पादकांच्या बागा घेऊन ग्राहकांना फळपुरवठा केला जातो.

संपर्क ः अशोक भगुरे, ९६६५२३०७५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com