खरीप पिकांची काढणी (Kharif Crop Harvesting) संपल्यामुळे मागील काही लेखांमध्ये आपण राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कापूस (Cotton) आणि सोयाबीन (Soybean) या पिकांबाबत माहिती घेतली. प्राप्त परिस्थितीमध्ये नजीकच्या काळामध्ये या पिकांमध्ये कसा कल राहू शकेल, याबाबत बाजारातील सेंटिमेंटवर चर्चा केली होती. सुरुवातीच्या जोरदार घसरगुंडीनंतर सोयाबीनने जोरदार कामगिरी केल्याचेही आपण अनुभवले. परंतु कापसाच्या किमतीमध्ये (Cotton Rate) मोठे चढ-उतार होताना दिसत असल्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून कापसाच्या आवकीमध्ये देखील त्याच प्रमाणात चढ-उतार होत आहेत.
वास्तविक पाहता सोयाबीनमधील मजबुती मागणीमध्ये झालेल्या वाढीशी सुसंगत आहे. त्यामुळेच आवक मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा भावपातळीसुद्धा आकर्षक आहे. परंतु सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध आकडेवारी आणि बाजारातील घडामोडी पाहता कापसाच्या किमतीमधील वाढ ही मागणीतील वाढीमुळे नसून आवक नियंत्रित केल्यामुळे होताना दिसत आहे. उदाहरणच द्यायचे तर कापूस पिकवणाऱ्या चार आघाडीच्या राज्यांमधील १५ नोव्हेंबर पर्यंतच्या आवकीचे देता येईल.
कापूस उत्पादनात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरातमध्ये या हंगामातील आतापर्यंत झालेली कापसाची आवक साधारणपणे साडेसहा लाख गाठी आहे. म्हणजे आवक मागील वर्षापेक्षा ५३ टक्क्यांनी कमी आहे. कापूस लागवडीत गुजरातनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये केवळ २५ हजार गाठी कापूस आवक झाली आहे. तेलंगणामधील सव्वातीन लाख गाठी ही आवक मागील वर्षापेक्षा ७२ टक्के कमी आहे. केवळ राजस्थानमध्ये आवक सर्वांत जास्त म्हणजे १० लाख गाठींजवळ पोहोचली असून, ती मागील वर्षापेक्षा ५ टक्के अधिक आहे.
अर्थात, राजस्थानमध्ये या वर्षी महिनाभर आधीच आलेल्या मोसमी पावसामुळे तिथे सर्वच पिकांचा काढणी हंगाम लवकर सुरू झाला आहे. थोडक्यात, देशातील प्रमुख बाजारपेठांतील आवकीचे आकडे पाहता मागील हंगामात १२ हजार रुपयांची पातळी पाहणारे शेतकरी यंदा कापूस १० हजार रुपयांच्या खाली विकायला मानसिकदृष्ट्या तयार नाहीत. या परिस्थितीत वर्षअखेरपर्यंत तरी फारसा बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
अर्थात, आजचा विषय हा कापूस आणि सोयाबीनचा नसून नुकत्याच चालू झालेल्या रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याचा आहे. यंदा हरभऱ्याची स्थिती काय राहील, याचा धांडोळा घेऊया. मागील दोन वर्षांमध्ये कृषिमाल बाजारपेठेमध्ये बहुतेक प्रमुख कमोडिटीजमध्ये अनेकदा मोठी तेजी आलेली असली तरी हरभरा मात्र त्याला अपवाद राहिले. या एका कडधान्याने मात्र उत्पादकांपासून ते स्टॉकिस्ट आणि व्यापारी या सर्वांचीच घोर निराशा केली आहे.
केवळ निराशाच नव्हे तर प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. अलीकडे व्यापारी वर्गातील नेटकऱ्यांमध्ये तर हरभरा हा थट्टेचा विषय बनल्याचे आपण पाहिले आहे. दिवार चित्रपटातील अमिताभच्या तोंडी असलेला संवाद थोडा बदलून “चण्याचा स्टॉक आणि व्यापार करण्यासाठी धैर्य लागते” अशा आशयाची पोस्ट या वर्गात खूप गाजली. मागील वर्षभर हरभरा प्रति क्विंटल ४२०० ते ४८०० या कक्षेच्या बाहेर गेलेला नाही. म्हणजेच हमीभावापेक्षा १० ते २५ टक्के कमी किमतीमध्ये व्यापार होणाऱ्या हरभऱ्याच्या कारभारातील निराशा लक्षात यावी.
त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये या रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक घेण्यात उत्साह दिसून येत नाही. मागील शुक्रवारपर्यंतची पेरणीची आकडेवारी असे दर्शवते, की एकंदर कडधान्य क्षेत्र मागील वर्षापेक्षा काकणभर कमीच आहे. वाटाण्याखालील क्षेत्र जवळ जवळ १० टक्क्यांनी घटले आहे. हरभरा लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खरिपातील कापसाच्या एक-दोन वेचण्या जास्त केल्या तर अधिक फायदा होईल. असा हिशेब करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा हरभऱ्याकडे पाठ फिरवली असल्याचे समजते.
तर मोहरीला वर्षभर मिळणारा मजबूत भाव, वाढीव हमीभाव आणि खाद्यतेल किमतीमधील तेजी निदान पुढील सहा महिने तरी टिकण्याचे संकेत यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे क्षेत्र मोहरीकडे वळवले आहे. मागील दोन वर्षांत हरभरा आणि सोयाबीनकडे वळलेले गुजरात आता परत मोहरीकडे जात आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुजरातमधील मोहरीक्षेत्र १६१ टक्के वाढले आहे, तर पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ही वाढ अनुक्रमे ८४ टक्के, ३३ टक्के आणि ११ टक्के एवढी आहे. पुढील काळात हे प्रमाण अधिक वाढल्यास पेरण्या संपताना हरभऱ्याखालील एकूण क्षेत्र १० टक्के कमी राहिल्यास आश्चर्य वाटू नये.
याचंच प्रतिबिंब हरभऱ्याच्या सध्या वाढलेल्या भावामध्ये दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये हरभऱ्याचे भाव सतत वाढत आहेत. दिल्लीमध्ये हरभरा अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच ५,००० रुपयांपर्यंत पोहोचला. पुढील तीन महिने हरभऱ्याची मागणी किमान १५ लाख टन एवढी राहील. तर सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार व्यापाऱ्यांकडील हरभऱ्याचे स्टॉक खूपच कमी शिल्लक राहिले आहेत.
त्यामुळे मागील हंगामाच्या अखेरच्या तीन महिन्यांत हरभऱ्याच्या किमती अजून सुधारून हमीभावाच्या जवळ जातील. मात्र पेरण्या कमी होतील त्या प्रमाणात हरभऱ्याचे भाव अधिक वाढणेदेखील शक्य आहे. परंतु पुढील पत्ते सुमारे २५ लाख टन हरभरा बाळगून असलेल्या नाफेडच्याच हातात राहतील असेही म्हटले जात आहे. म्हणजे पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये हरभऱ्यात तेजी आली, तरी किमती हमीभावापेक्षा फार वर जाणार नाहीत. पण त्या ४,७००-४,७५० च्या खालीदेखील घसरण्याची शक्यता नाही.
या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात हरभऱ्याऐवजी इतर नगदी पिके किंवा भाजीपाला पिके घेण्यावर भर देणे योग्य ठरेल. निदान पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळातील अनिश्चिततेपासून तरी सुटका मिळेल. मागील हंगामातील हरभरा हमीभाव पातळीजवळ दर पोहोचल्यास विकून टाकावा. तोपर्यंत पुढील हंगामातील पीक परिस्थिती स्पष्ट झालेली असेल.
जर पुरवठ्यामध्ये मोठी घट दिसली तर पीक टाळलेल्या शेतकऱ्यांना काढणीच्या काळात येणाऱ्या मंदीमध्ये योग्य वेळी हरभरा खरेदी करून साठवणूक करणे अधिक फायदेशीर राहील. हरभरा वायदे बाजार सुरू होण्याचे संकेत मिळत असले तरी त्यामध्ये निदान एक महिना निघून जाईल. तसेच वायदे बाजार सुरू झाल्यास तेथेही हजर बाजारातील परिस्थितीप्रमाणेच मंदीचा कल राहील. म्हणजे पेरणी ते काढणी या काळातील मंदी झेलण्यापेक्षा याच काळात योग्य त्या क्षणी पुढील हंगामातील वायदे खरेदी करून हरभऱ्याचा साठा करणे अधिक सुटसुटीत आणि किफायतशीर राहील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.