Tur : तुरीच्या साठ्याची माहिती द्या

यंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्याने पुरवठा घटला आहे. त्यामुळे देशात जुलै महिन्यापासून तुरीच्या दरात मोठी वाढ झाली. सध्या तुरीचे दर प्रति क्विंटल ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणे ः यंदा तुरीचे उत्पादन (Tur Production) कमी झाल्याने पुरवठा (Tur Supply) घटला आहे. त्यामुळे देशात जुलै महिन्यापासून तुरीच्या दरात (Tur Rate) मोठी वाढ झाली. सध्या तुरीचे दर प्रति क्विंटल ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. परिणामी बाजारात तुरीच्या डाळीचेही (Tur Dal) दर वाढले आहेत. तुरीची साठेबाजी (Tur Stock Hording) होत असल्यामुळे दर भडकल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता अत्यावश्यक कायद्याचे हत्यार उपसले आहे. सर्व स्टॉकिस्ट आणि व्यापाऱ्यांकडील तुरीच्या साठ्याची माहिती देण्याचे आदेश केंद्राने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

बाजारात तूर डाळीच्या दरात तेजी आल्याने केंद्र सरकारने राज्यांना स्टॉकिस्ट आणि व्यापाऱ्यांकडील साठ्याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना पाठवलेल्या पत्रात देशातील काही स्टॉकिस्ट आणि व्यापारी तुरीचा साठा मागे ठेवत असल्याचे नमूद केले आहे. बाजारात पुरवठा कमी करून हे स्टॉकिस्ट आणि व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. तुरीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दर वाढवले जात आहेत. देशात तुरीची लागवड कमी झाली. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रात पावसामुळे पिकात पाणी साचले. यामुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून तूर डाळीच्या दरात सुधारणा होत असल्याचेही केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Tur Rate
Tur Rate : तुरीच्या दराने गाठला आठ हजार रुपयांचा पल्ला

केंद्राने सर्व राज्यांना पत्र पाठवून तुरीच्या साठ्यावर नजर ठेवण्याची सूचना केली आहे. तुरीच्या दरातील वाढ लक्षात घेऊन सर्व राज्यांनी स्टॉकिस्ट आणि व्यापारी यांच्याकडील साठ्याची माहिती द्यावी, तसेच राज्यांनी सर्व स्टॉकिस्ट आणि व्यापाऱ्यांना केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाच्या पोर्टलवर साठ्याची माहिती भरण्याचे निर्देश द्यावेत, असेही केंद्राने या पत्रात म्हटले आहे.

Tur Rate
Tur Rate : तुरीच्या दराला आणखी फोडणी मिळणार?

यंदा देशातील व्यापाऱ्यांना तुरीचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. देशाला दरवर्षी किमान ४० लाख टन तुरीची आवश्यकता असते; मात्र देशातील उत्पादन यंदाही ३० ते ३५ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे. मागील हंगामातही देशातील तुरीचे उत्पादन याच पातळीला होते. तसेच मागील वर्षी देशात विक्रमी ८ लाख ४० हजार टन तुरीची आयात झाली होती. असे असतानाही यंदा तुरीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तुरीचे दर वाढलेत.

मागील हंगामात तुरीचे उत्पादन कमी राहिले. तसेच यंदाही लागवड जवळपास १२ टक्क्यांनी कमी राहिली. पावसामुळेही पिकाचे नुकसान होत आहे. तसेच आयात तुरीचेही दर अधिक आहेत. म्यानमारमधील तूर जवळपास ८ हजार रुपयांच्या दरम्यान आयात होतेय. त्यामुळे दर वाढलेले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून आफ्रिकेतील तूर बाजारात येईल; मात्र देशातील उत्पादनाची स्थिती पाहता दर जास्त नरमतील, असे वाटत नाही. तसेच सरकारने साठ्याची माहिती मागितल्याचाही परिणाम बाजारावर फार थोड्या काळासाठी होईल, असे जाणकारांनी सांगितले.

देशात सध्या तुरीचा साठा कमी आहे. तसेच बाजारात तुरीच्या डाळीचा पुरवठा कमी होत आहे; मात्र मागणी वाढली आहे. त्यामुळे दर वाढलेत. देशात तुरीचा मोठा साठा नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा केवळ तात्पुरता परिणाम होईल. पुरवठा वाढल्याशिवाय दर कमी होण्याची शक्यता नाही.
प्रेम कोगटा, अध्यक्ष, खानदेश दाल मिल्स ओनर्स असोसिएशन.
देशात सध्या तुरीचा तुटवडा असून मागील दीड महिन्यात तूर डाळीचे दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले. आम्ही उद्योग म्हणून तूर डाळीचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका ठेवली आहे; मात्र सरकारने देशातील कडधान्य उत्पादन वाढवावे. पुरवठा वाढला तरच तूर डाळीचे दर कमी होतील.
बिमल कोठारी, अध्यक्ष, इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com