Jalgaon News : खानदेशात मका आवकेत या आठवड्यात आणखी वाढ झाली आहे. प्रमुख बाजारांत सध्या रोज साडेपाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक वाढल्याने दरात किंचित घट झाली आहे. पुढील १० ते १२ दिवस आवक कायम राहू शकते, असाही अंदाज आहे. सध्या १६२५ ते २३५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत.
मक्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. परंतु शेतकऱ्यांनी चांगले व्यवस्थापन करून एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी यापेक्षा अधिक उत्पादन साध्य केले आहे. मक्याची आवक मार्चच्या मध्यात खानदेशात सुरू झाली. ही आवक दर आठवड्याला वाढली आहे.
जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर या बाजार समित्या मक्यासाठी प्रसिद्ध आहेत. या बाजार समित्यांत मार्च महिन्यात प्रतिदिन सरासरी तीन हजार क्विंटल मका आवक झाली. ही आवक मार्चमधील दुसऱ्या पंधरवड्यात वाढली होती. या महिन्यातील आवक प्रतिदिन सरासरी साडेपाच हजार क्विंटलपर्यंत आहे.
जळगाव बाजार समितीत रोज दोन हजार क्विंटल मका आवक होत आहे. चोपडा येथील बाजारातही रोज ८०० ते ८५० क्विंटल मका आवक होत आहे. मक्याची लागवड जळगाव, चोपडा, रावेर, यावल, शिरपूर याच भागात अधिक झाली होती. या भागातील बाजार समित्यांत मक्याची चांगली आवक आहे. तसेच चाळीसगाव, भडगाव-पाचोरा बाजारातही आवक होत आहे.
मक्याचे दर सध्या विविध बाजारांत किमान १६२५ व कमाल २३५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तर सरासरी दर १९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मका दरात मोठी घसरण झालेली नाही. परंतु या आठवड्यात किंचीत किंवा क्विंटलमागे ३० ते ४० रुपये घसरण झाल्याची माहिती मिळाली. मक्याची पाठवणूक खानदेशातून गुजरात, मध्य प्रदेशात केली जात आहे. मक्यास उठाव आहे. तसेच स्थानिक स्टार्च व अन्य कारखान्यांतही मागणी आहे. शिरपुरातील कारखान्यात थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदी केली जात आहे. जळगावातही काही कारखाने थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदी करीत आहेत.
शिवार खरेदी अधिक
मक्याची बाजारात जेवढी आवक आहे, त्यापेक्षा अधिकची खरेदी थेट शिवारात केली जात आहे. थेट किंवा शिवार खरेदीत क्विंटलमागे ५० ते ६० रुपये कमी दर दिला जात आहे. पण वाहतूक, बारदाना या कटकटी लक्षात घेऊन अनेक शेतकरी शिवार खरेदीत मक्याची विक्री करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.