

Pune News : तुरीचे भाव सध्या दबावात आहेत. त्यामुळे तुरीची आवक वाढल्यानंतर बाजारावर काही काळ दबाव राहू शकतो. मार्चपासून दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. पण जे शेतकरी तूर विक्रीसाठी थांबू शकत नाहीत त्यांनी हमीभावाने तूर विकल्यास किमान हमीभाव मिळेल. मात्र हमीभावापेक्षा कमी दरात तूर विक्री टाळावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र आवकेचा दबाव अद्यापही कमीच आहे. तरीही तुरीचा बाजार महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये हमीभावाच्या खाली गेला. यंदा तुरीला सरकारने ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र बाजारात सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बिल्टी रेट ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा भाव नोव्हेंबर महिन्यात १० हजारांच्या दरम्यान होता. म्हणजेच भावपातळी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयाने कमी झाले.
देशातील केवळ लागवड वाढली आणि नवी तूर बाजारात येणार, यामुळेच बाजारात मोठी पडझड झाली. आयातीचा दबाव बाजारावर आहेच. पण आयात किती येणार हेदेखील स्पष्ट आहे. त्यामुळे भावपातळी खूपच पडावी अशी परिस्थिती नाही. म्हणजेच नव्या मालाची आवक हाच महत्वाचा घटक बाजारावर परिणाम करत आहे. पण सध्या तुरीची आवक खूपच कमी आहे. असे असताना बाजार एवढा पडला मग जेव्हा तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येईळ तेव्हा काय होईल? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सरकारने तूर खरेदीही जाहीर केली आहे. मग हमीभावानेच तूर विकावी की थांबावे, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. देशात यंदा उत्पादन वाढीचा अंदाज असला तरी उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. तुरीच्या भावात तेजी येईल. पण जेव्हा नवा माल बाजारात येईल तेव्हा भाव पातळी दबावातच राहील, हेही खरे आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारभावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
आवकेच्या हंगामात म्हणजेच काढणी झाल्यानंतर जे शेतकरी तूर विकणार आहेत त्यांनी हमीभावाने सरकारला तूर द्यावी. खुल्या बाजारात कमी भावात तूर विक्री करण्याचे टाळावे. हमीभावाने तूर देण्यासाठी नोंदणी करून ठेवावी. आवकेचा दबाव असताना हमीभावाने तूर विक्रीचा चांगला पर्याय असेल. म्हणजेच जे शेतकरी थांबू शकत नाहीत त्यांनी हमीभावाने तूर द्यावी.
तसेच जे शेतकरी काढणी झाल्यानंतर तीन महीन्यांपेक्षा जास्त थांबू शकत असतील त्यांनी तेजीमंदीचा विचार करावा. बाजारातील तूर आवक कमी झाल्यानंतर बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करतील. तूर बाजार ८ हजारांचा टप्पा पार करू शकतो. तसेच मार्चनंतर दरात सुधारणा होत जाऊन नंतरच्या टप्प्यात मार्केट ९ हजार ते ९ हजार ३०० रुपयांचीही पातळी दाखवू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.