Pune News : राज्यात सध्या कापूस बियाण्याची टंचाई भीषण टप्प्यावर आली. अकोला येथे तर शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. कापूस बियाण्याची टंचाई या वळणावर कदाचित पहिल्यांदाच पोचली असेल. बर ही परिस्थिती केवळ अकोल्यात नाही. तर राज्यात सगळीकडेच सध्या हे चित्र दिसत आहे. कृषी विभाग आणि सरकार काहीही दावा करत असले तरी दिवस दिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आधीच मागचं वर्ष दुष्काळामुळं वाया गेलं. यंदा बियाण्याचा दुष्काळ मानगुटीवर बसतो की काय, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
खरिपासाठी प्रशासन आणि सरकार तयार असल्याचा दावा अक्षरशः फोल निघाला. यंदा चांगल्या माॅन्सूनच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी खरिपासाठी कंबर कसली. पण कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांना ऐन खरिपाच्या तोंडावर बियाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
कृषी विभागाने राज्यात १५ मे नंतर कापूस बियाणे विक्रीसाठी परवानगी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पसंतीच्या बियाणे खेरदीसाठी लगबग सुरु केली. पण पहिल्याच दिवसापासून काही कंपन्यांच्या विशिष्ट बियाण्याची टंचाई आहे. पहिल्याच शेतकरी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत तरीही हे बियाणे मिळत नाही. तर काही ठिकाणी कापूस बियाण्याची विक्री दाम दुप्पट दराने केली जात आहे. तर काही भागात बियाणेच मिळत नाही.
अकोला जिल्ह्यात कपाशीच्या एका वाणाची मागणी दररोज गंभीर वळण घेत आहे. शेतकरी रोज बियाण्यासाठी दुकानांवर चकरा मारत आहेत. पण बियाणे मिळत नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा बांध फुटला. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे सर्व यंत्रणाही हतबल झाली. आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
कंपनीने बियाण्याचा कमी पुरवठा केल्याने दिवसेंदिवस स्थिती गंभीर वळण घेत अल्याचे विक्रेते सांगत आहेत. दररोज महिला, पुरुष शेतकरी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत. आज अकोल्यातील टिळक मार्गावर शेतकरी रस्त्यावर आले. हजारो शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची समजूत काढायला आलेल्या अधिकाऱ्यांनाही प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्हयात बियाण्यांचा काळाबाजार सुरु असून आम्हाला कपाशीचे बियाणे उपलब्ध करून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला असल्याने जोपर्यंत कायदा व सुव्यवस्था सुरळीत होत नाही तोपर्यंत जिल्हयातील कृषी केंद्र संचालक आपली प्रतिष्ठाने उघडण्यास असमर्थ आहेत, असे विक्रेत्यांनी निवेदन दिले. ही परिस्थिती केवळ अकोला जिल्ह्यात नाही. तर राज्यभरात आहे. कापूस उत्पादक विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि इतरही भागात कापूस बियाण्याची टंचाई भासत आहे. राज्यात सगळीकडेच कापूस बियाण्याची टंचाई असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बियाण्यासोबत इतर बियाण्याचे लिंकींगही केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.