
Chana Rate : देशातील मागील दोन वर्षे तूर (Tur), हरभरा (Chana), मूग आणि उडदाचे दर दबावात होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावही मिळाला नव्हता. यंदा उत्पादन घटल्यानं तूर आणि उडदाचे दर (Urad Rate) तेजीत आहेत.
हरभरा दर मात्र आजही हमीभावापेक्षा कमी आहेत. पण यंदा देशातून हरभऱ्यासह इतर कडधान्याची निर्यात वाढली. त्यामुळे हरभरा दराला आधार मिळू शकतो, तर तुरीतील तेजी टिकून राहील, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत.
भारत जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक आणि वारकर्ता आहे. केंद्राच्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार देशात चालू वर्षात विक्रमी २७८ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. देशात यंदा तूर आणि उडदाच्या उत्पादनाला बदलत्या वातावरणाचा फटका बसला.
तर यंदाची उत्पादनातील वाढ हरभरा आणि मुगातील वाढीमुळे झाल्याचे सरकारनं स्पष्ट केलं. सरकारने यंदा देशातील हरभरा उत्पादन १३६ लाख हेक्टरवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला.
तसेच मागील हंगामातील शिल्लक साठाही आहे. त्यामुळं हरभरा दर दबावात आहेत. पण निर्यात वाढल्यानं बाजाराला आधार मिळू शकतो.
कडधान्य निर्यात ८० टक्क्यांनी वाढली
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या काळात देशाची कडधान्य निर्यात ८० टक्क्यांनी वाढली. या काळात देशातून ५ लाख ३९ हजार टनांची निर्यात झाली.
मागीलवर्षी याच काळात देशातून ३ लाख टनांची निर्यात झाली होती. तर २०२१-२२ च्या पूर्ण आर्थिक वर्षातील निर्यात ४ लाख टन होती. म्हणजेच यंदा १० महिन्यांमध्येच गेल्यावर्षीपेक्षा निर्यात अधिक आहे.
या देशांना होतेय निर्यात
भारतीय कडधान्याला बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांकडून मोठी मागणी आहे. हरभरा, काबुली हरभरा आणि मसुरची या देशांना निर्यात होत आहे. तसेच अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडमलाही निर्यात सुरु असल्याचं निर्यातदार सांगतात.
बांगलादेश आणि नेपाळला हरभऱ्याची निर्यात वाढली. तर आखाती देशांना तुरीची निर्यात सुरु झाली. यंदा ऑस्ट्रेलियात मसुरचे उत्पादन घटले. त्यामुळे बांगलादेश भारतीय मसूरची वचल करत आहेत.
मसूरचीही निर्यात वाढली
देशातून यंदा मसूरची निर्यात दुप्पट होऊन एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांमध्ये ४४ हजार टनांपर्यंत पोचली. तर काबुली हरभऱ्याची निर्यातही दुप्पट झाली. यंदा ८६ हजार टन काबुली हरभरा या देशांना निर्यात झाला. तर देशी हरभऱ्याची निर्यात ६९ हजार टनांवर पोचली.
भारताच्या कडधान्याला मागणी
जगभरात शाकाहारी आणि व्हेगन खाद्यपध्दतीचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळं कडधान्याला मागणी वाढली. भारतात अनेक प्रकारच्या कडधान्यांचे उत्पादन होत असते. त्यामुळे भारतीय कडधान्याला उठाव मिळतोय.
देशातून यंदा देशी हरभरा निर्यातही वाढली. त्यातच हरभऱ्याचे नुकसानही होत आहे. त्यामुळे हरभरा दरात सुधारणा होऊ शकते. तर तुरीच्या दरातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.