Cotton Market : कापूस बाजाराला मागणीचा आधार

Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मागील काही आठवड्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाली. देशातील बाजारातही कापूस भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मागील काही आठवड्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाली. देशातील बाजारातही कापूस भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीला ठोस असे घटक कारणीभूत नसून हेजर्स आणि सट्टेबाजांच्या व्यवहारांमुळे भाव कमी झाले. त्यामुळे भाव पुन्हा सुधारू शकतात. तर देशातील बाजारात कापसाला मागणी चांगली असून तात्पुरते चढ उतार सोडले तर सुधारणेला वाव आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव कमी झाल्याने आपल्याकडील कापूस बाजारात विकत आहेत, अशाही बातम्या येत आहेत. पण भारतात या कंपन्यांकडे १७ ते १८ लाख गाठी कापूस असू शकतो. तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराएवढी पडझड देशातील बाजारात झली नाही. शिवाय सर्वाधिक कापूस सीसीआयकडे आहे. सीसीआयने आपल्या विक्रीचे भाव कमी केले तर त्याचा थेट परिणाम कापसाचा भावावर होत असतो. सीसीआयने पहिल्यांदा खंडीमागे ५०० रुपये आणि आता ३०० रुपयाने भाव कमी केले. त्यामुळे कापसाच्या तेजीला काहीसा अडथळा येताना दिसतो. पण सीसीआयडचा साठाही म्हणावा तेवढा नाही. 

Cotton
Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवडीसह यांत्रिकीकरण गरजेचे

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी होण्याला ऑस्ट्रेलियाचा बाजारात येत असलेला कापूस आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय  बाजारात कापसाचा वाढेलला पुरवठा, त्यासोबतच चीनची कमी झालेली मागणी हे घटक कारणीभूत आहेत, असे सांगितले जाते. पण ऑस्ट्रेलियाचे उत्पादन यंदा घटलेले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादन १३ लाख गाठींनी कमी होऊन ६१ लाख गाठींवर स्थिरावणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियातील उत्पादन बाजारावर एवढा परिणाम करेल, अशी परिस्थिती नाही. त्यातच ब्राझीलचा कापूस जुलैनंतर बाजारात येईल. त्यामुळे आतातरी त्याची भीती नाही. 

खरे तर जागतिक बाजारात कापूस स्टाॅक करणाऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या निर्णयामुळे ही पडझड दिसून येत असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. या हेजर्स कंपन्या आणि सट्टेबाज यांच्यामुळे बाजारातील भावपातळी दबावात आल्याचे सांगितले जाते. कंपन्या आपल्या फायद्यासाठी तेजी मंदी करतात. त्याचाच प्रत्यय बाजारात येत असल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले. इतरही काही घटक आहेत. पण या घटकांनी बाजार येवढा कमी होण्याचे कारण नाही. हेजर्स आणि सट्टेबाजांच्या व्यवहारामुळेच सध्याची पडझड दिसून येत आहे, असे काही अभ्यासकांनी सांगितले. 

निर्यातसौदे मंदावले

- आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाले त्या प्रमाणात देशात कमी झाले नाही
- भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारातील दरपातळीवर पोचला
- भाव सारखे झाल्याने सध्या निर्यातसौदे मंदावल्याचे निर्यातदारांनी सांगितले
- आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा सुधारणेची अपेक्षा
- आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पुन्हा भारतातील भावापेक्षा सुधारल्यास निर्यात सुरु होईल
- कमी साठा केल्याने देशातील उद्योगांची खरेदी सुरुच

भाव पुन्हा वाढतील का?

जगातील महत्वाच्या तीन देशांमधील कापसाची स्थिती स्पष्ट झाली आहे. भारत, चीन आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले. चीनची खरेदी कमी झाली असली तरी सुरुच आहे. अमेरिकेतील स्टाॅक कमी झाला. भारतातही कमी कापूस शिल्लक आहे. त्यामुळे उद्योग आयातीची भाषा करत आहेत. या सर्व कारणाने आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले तरी पुन्हा वाढू शकतात, अशी परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पुन्हा वाढतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Cotton
Cotton Market : कापसाला घटती आवक, वाढत्या निर्यातीचा फायदा

देशातील भाव

देशातील बाजारातही कापसाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दिसत असली तरी कमाल म्हणजेच जास्तीत जास्त भाव काहीसा कमी झालेला दिसतो. दुसरीकडे बाजारातील आवक कमी होत आहे. काल देशभरातील बाजारात ५३ हजार ६०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. पुढच्या काळात ही आवक आणखी कमी होत जाणार आहे. कारण आता शेतकऱ्यांकडे केवळ ५ ते १० टक्केच कापूस शिल्लक आहे, असे शेतकरी सांगत आहेत. 

कापूस आवकेची स्थिती (१७० किलोच्या गाठींमध्ये)
११ एप्रिल…४६,२००
१० एप्रिल…५३,६००
९ एप्रिल…४६,०००
८ एप्रिल…५९,५००
७ एप्रिल…३७,७००
६ एप्रिल…५८,०००
५ एप्रिल…६१,४००

देशातील उद्योगांना कापसाची गरज लागणार आहे. तसेच २० ते २२ लाख गाठी कापूस निर्यात झाल्यात जमा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा देशातील बाजार फारसा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक
कापूस बाजाराला आधार देणारे घटक कायम आहेत. कापसाच्या भावात चढ उतार अपेक्षित होते. पण भारतातून झालेली निर्यात, देशातील उद्योगांची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता भावपातळी काही दिवस एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे. 
दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्लेषक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com