Pune News : कापूस बाजाराचं लक्ष सध्या सीसीआयच्या कापूस विक्रीकडे आहे. सीसीआयने आपला कापूस कमी भावात विकला तर यामुळे भाव कमी होतील, पण सीसीआयने कापूस बाजारभावात विकला तर कापूस बाजाराला आधार मिळेल. कारण सध्या सीसीआयकडेच सर्वाधिक स्टाॅक आहे. नुकतेच सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी सीसीआयची कापूस खरेदी, स्टाॅक, कापूस गाठींची विक्री आणि विक्रीचा भाव याची माहिती दिली.
आजपासून पुढील तीन दिवस कापसाचे व्यवहार अनेक बाजारांमध्ये बंद राहतील. सुट्ट्यांमुळे कापसाचे व्यवहार मंदावले. पण भावपातळी कायम होती. कापूस खेडा खरेदीत ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. गुरुवारी वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस काहीसा नरमाला होता. तर देशातील वायदे सुधारले होते. आठवड्याच्या शेवटी सुट्ट्या लागून आल्या की भावावरही परिणाम होत असतो. त्यामुळे विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा, असं आवाहन अभ्यासकांनी केलं.
सीसीआयचे अध्यक्ष लिलत कुमार गुप्ता यांनी सांगितले की, बाजारातील कापूस आवक ८० हजार ते १ लाख गाठींच्या दरम्यान आहे. तर देशात रोजचा वापर ८५ हजार गाठींच्या दरम्यान होतो. सीसीआयने कस्तुरी काॅटन भारत या ब्रॅन्डखाली कापसाची विक्री सुरु केली. सीसीआयने चांगल्या गुणवत्तेचा कापूस खरेदी केला. त्यामुळे कापसाचे भावही चांगले आहेत. बाजारभावापेक्षा सीसीआयच्या कापूस गाठींना जास्त भाव मिळत असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
सीसीआयच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण उद्योग सीसीआयकडेच कमी भावात कापसाची मागणी करत असतात. पण सीसीआय यंदा कमी भावात कापूस विक्री करण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे उद्योग सोडले तर सीसीआयकडेच जास्त कापूस आहे. पण सीसीआयच्या कापसाचेही भाव जास्त असल्याने बाजारभावाला आधार आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये कापूस बाजाराला सीसीआयकडून आधार मिळू शकतो.
मार्चएन्ड आणि जागतिक बाजारातील काही घटकांमुळे सध्या कापूस बाजारात चढ उतार सुरु आहेत. पण एप्रिलमध्ये कापूस बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल. भारताचा कापूस आजही आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त आहे. त्यामुळे कापसाला मागणी चांगली आहे. सूत आणि कापडाला मागणी असल्याने देशांतर्गत उद्योगांकडून खरेदी सुरु आहे. तसेच उद्योगांकडे कापसाचा स्टाॅक पुरेसा नाही. त्यामुळे कापसाला मागणी कायम राहील. परिणामी एप्रिलमध्ये कापूस भाव पुन्हा ८ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. तर मेपर्यंत कापूस भावात आणखी ५ ते ७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
देशात सध्या सीसीआयकडेच सर्वाधिक कापसाचा स्टाॅक आहे. सीसीआयचे अध्यक्ष लिलत कुमार गुप्ता यांनी सांगितले की, आतापर्यंत सीसीआयने जवळपास ३३ लाख गाठी कापसाची खरेदी केली. त्यापैकी एकट्या तेलंगणातच २४ लाख गाठींची खरेदी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात २.४४ लाख गाठी खरेदी झाली. तर आंध्र प्रदेशात १ लाख ३० हजार गाठी आणि मध्य प्रदेशात १ लाख २७ हजार गाठी कापूस सीसीआयने खेरदी केला.
सीसीआयची कापूस खरेदी फेब्रुवारीपासून कमी झाल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री थांबवली. त्यामुळे सीसीआयला कापूस मिळत नाही. तरीही सीसीआयची केंद्रे सुरु आहेत. सीसीआयची शेवटची खरेदी ४ मार्च रोजी झाली होती. सध्या बाजारातला सरासरी भाव ७ हजार ५०० के ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हा भाव हमीभावापेक्षा ७ ते ८ टक्के जास्त आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.