Jalgaon News : खानदेशात केळी दरात मागील १० ते १५ दिवसांपासून सतत चढउतार होत आहे. दर दोन-तीन दिवसाआड दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ होत आहे. लागलीच घटही होत आहे. सध्या केळीदर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील हालचालींवर खानदेशातील केळी बाजारांची चाल सुरू असते. मध्य प्रदेशात केळी दरात सतत घट व लागलीच वाढही होत आहे. परंतु जेव्हा दरात सुधारणा होते, तेव्हा केळीची थेट किंवा शिवार खरेदी व्यापारी टाळतात. दर कमी झाल्यानंतर खरेदी करतात.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह रावेर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बऱ्हाणपूर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आवक किती व दर कमीअधिक कसे होतात, असा मुद्दा उपस्थित करून दरांवर बाजार समिती प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, योगराज पाटील व अन्य संचालक, शेतकऱ्यांनी बऱ्हाणपूर येथील बाजार समितीचे सचिव हितेंद्र शिकरवार यांच्याशी केळी दरांच्या चढउतारासंबंधी चर्चा केली.
खानदेशात एप्रिल व मे महिन्यात केळीची मोठी आवक होती. मे मध्ये प्रदिदिन सरासरी ४०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक खानदेशात झाली. या काळात केळी दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. जूनमध्ये आवक कमी झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात खानदेशात प्रतिदिन सरासरी २८० ट्रक केळीची आवक होती.
या काळात दरात सुधारणा झाली. किमान दर ८०० व कमाल दर १२५० रुपयांवर पोहोचले. यानंतर कमाल दर १५०० ते १७५० रुपये प्रतिक्विंटल झाले. काही शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळीसाठी प्रतिक्विंटल १९५० रुपयांपेक्षा अधिक दरही मिळाले. परंतु दरात सतत चढउतार मागील १५ दिवसांपासून सुरू आहेत. काही दिवस कमाल दर १७०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होता. लागेचच दर १५५० रुपये प्रतिक्विंटल असा झाला. किमान दरही ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल, असा झाला.
सध्या २५० ते २५५ ट्रक आवक
आवक सध्या २५० ते २५५ ट्रक प्रतिदिन आहे. सध्या खानदेशात फक्त रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात केळी आवक सुरू आहे. केळीची आवक जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर भागात कमी आहे. पाचोरा-भडगाव भागातही आवक कमी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.