Jalgaon News : खानदेशात नंदुरबारमध्ये केळी लागवड रखडली आहे. शहादा, तळोदा भागांत अतिपावसाने वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे लागवड करणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर अन्य भागांत उष्णतेमुळे केळी लागवड रखडली आहे.
मे व जूनमध्ये अनेक भागांत केळी लागवड झाली. जून व जुलैमध्येही केळी लागवड खानदेशात केली जाते. जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, जळगाव, रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागांत केळीची लागवड अधिक असते. रावेर, यावल भागात मे व जूनमध्ये अधिकची केळी लागवड शेतकरी करतात.
या लागवडीसाठी कमाल शेतकरी केळीचे कंद उपयोगात आणतात. दर्जेदार केळीचे वाण लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. तसेच उतिसंवर्धित रोपांनाही मागणी आहे. त्यासाठी ‘आंबेमोहोर’, ‘श्रीमंती’, ‘महालक्ष्मी’, ‘सातमासी’ व ‘ग्रॅण्ड नैन’ या वाणांच्या कंदांना शेतकरी पसंती देतात. केळी कंद छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड, सोयगाव, जळगावमधील जामनेर, रावेर, यावल, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
हलक्या, मध्यम जमिनीत काळ्या कसदार क्षेत्रातील कंद लागवडीला पसंती दिली जाते. परंतु गेले काही दिवस उष्णता आहे. यातच मागील आठवड्यात नंदुरबारात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांमध्ये पाणी साचले. वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे केळी बागांमधून कंद काढणे, त्यांची लागवड, वाहतूक यावर परिणाम झाला आहे. परिणामी, केळी लागवडदेखील रखडली आहे.
५६ हजार हेक्टरवर लागवडीची अपेक्षा
यंदा मृग बहर केळीची सुमारे ५४ ते ५६ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. तापी, वाघूर, अनेर नदीच्या भागांत जलसाठे मुबलक आहेत. यामुळे केळी लागवड काहीशी वाढूदेखील शकते, असाही अंदाज आहे.
थंड व कोरडे वातावरण राहिल्यास केळी लागवडीला पुढील काही दिवसांत वेग येईल. अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी क्षेत्र तयार केले आहे. त्यात सऱ्या पाडून ठेवल्या असून, तण वाढल्याने तणनाशकेदेखील फवारली आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.