
पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC Bank) खरिपासाठी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे (Crop Loan For Kharif Season) वाटप सुरू केले आहे. यंदा बँकेने खरीप हंगामासाठी (Kharif Season) एक हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी जिल्ह्यातील दोन लाख १८ हजार ९९८ सभासद शेतकऱ्यांना एक हजार ७३० कोटी ३९ लाख ३३ हजार रुपये म्हणजेच ९६ टक्के पीककर्ज (Crop Loan) वाटप करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक शिरूर तालुक्यात वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.
अवकाळी पाऊस, बदलते हवामान, शेतमालाला कमी दर अशा विविध कारणांमुळे शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे. जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दर वर्षी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात येते. खरीप हंगामात भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेत, खरिपाचे नियोजन करून पिके घेतात. त्यानुसार बँकेने शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरिपात तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
गेल्या वर्षी खरिपासाठी एक हजार ७३९ कोटी ९४ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी दोन लाख ८ हजार ६१८ सभासदांना एक हजार ६३३ कोटी ३६ लाख ९१ हजार रुपये म्हणजेच ९३ टक्के वाटप केले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चांगलीच वाढ झाली आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेने तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या शाखांमार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना उपलब्ध करून दिला आहे.
जिल्ह्यात बँकेच्या २९४ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते. जिल्ह्यात बँकेची खातेदार संख्या जवळपास तीन लाख ५ हजार ७९६ पर्यंत आहे. त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले जात आहे. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत हा कर्जपुरवठा सुरू राहणार आहे. त्यानंतर रब्बीसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून शेतीपूरक व्यवसायांनाही कर्जाचे वाटप केले जात आहे.
या पिकांसाठी दिले जाते कर्ज ः
तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची अशी विविध पिके
नवीन १,६५७ सभासदांना कर्जवाटप
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे तीन लाखांहून अधिक सभासद शेतकरी आहेत. त्यामध्ये दर वर्षी वाढ होत असून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात नव्याने झालेल्या १,६५७ सभासद शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले आहे. त्यांना सुमारे ११ कोटी १३ लाख २५ हजार रुपयांचे पिकांचे वाटप केले आहे. यामध्ये दौंड, इंदापूर, शिरूर तालुक्यांत सर्वाधिक वाटप केले आहे. त्यामुळे बँकेने ठेवलेल्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यास काही प्रमाणात मदत होत आहे.
तालुकानिहाय पीककर्जाचे झालेले वाटप, रुपये
तालुका --- वाटप झालेले कर्ज
आंबेगाव --- १२१ कोटी ५१ लाख ३ हजार रुपये,
बारामती --- २०७ कोटी ९३ लाख ३७ हजार
भोर --- ८१ कोटी ३६ लाख ९९ हजार
दौंड --- २०८ कोटी ८५ लाख ७९ हजार
हवेली --- ६४ कोटी ६३ लाख ५९ हजार
इंदापूर --- १५५ कोटी ५९ लाख ३ हजार
जुन्नर --- २३७ कोटी ७१ लाख ६६ हजार
खेड --- १७० कोटी ७६ लाख ७२ हजार
मावळ --- ४१ कोटी ४९ लाख ५३ हजार
मुळशी --- २५ कोटी २० लाख ९४ हजार
पुरंदर --- १५२ कोटी २३ लाख ८१ हजार
शिरूर --- २५० कोटी ६० लाख १७ हजार
वेल्हा --- १२ कोटी ४६ लाख ६० हजार
एकूण -- १७३० कोटी ३९ लाख ३३ हजार रुपये .
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.