
Cotton Arrival Update : शेतकरी सध्या कापसाचे पॅनिक सेलिंग करत आहेत. यामुळे बाजारात आवकेचा दबाव वाढला. सध्याची आवक सरासरीपेक्षा तब्बल सहा पटींनी अधिक आहे. तर भावपातळी मे महिन्यात १ हजार ५०० रुपयांनी कमी झाली.
भाव पडल्याने शेतकरी अडचणीत असतानाच उद्योगांकडून शेतकऱ्यांनी कापूस विकावा, असं आवाहन केलं जातं आहे. पावसाळ्यात कापसाची गुणवत्ता कमी होते, तसेच प्रक्रियेच अडचणी येतात. परिणामी दर कमी मिळू शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या आधी कापूस विकावा असे आवाहन द साऊथर्न इंडिया मिल्स् असोसिएशनचे अध्यक्ष रवी सॅम यांनी केले.
सध्या देशातील बाजारात कापसाची रोज सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. तर आजची दरपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर काही बाजारांमध्ये किंचित सुधारणाही दिसली. म्हणजेच बाजारात आवकेचा दरावर दबाव दिसतो. शेतकऱ्यांना खरिपासाठी कापूस विकणे गरजेचे आहे.
तर काही शेतकऱ्यांकडे साठवण्याची व्यवस्था नसल्याने कापूस विकत आहेत. पण अनेक शेतकरी कमी झालेल्या भावात कापूस विक्री करणार नाहीत. ज्यांची थांबण्याची क्षमता आहे आणि साठवण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी कापूस विकताना दिसत नाही. हे शेतकरी कापूस दरवाढीची वाट पाहत आहेत.
पण शेतकऱ्यांनी पावसाच्या आधी कापूस विकावा, असं उद्योगांना वाटतं. पावसाच्या आधी कापूस विकल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, असेही उद्योगांनी सांगितले. पावसाळ्यात कापसावर प्रक्रिया करणे अवघड जाते.
पावसामुळे कापसाची गुणवत्ता कमी होऊन कमी भाव मिळू शकतो, असे द साऊथर्न इंडिया मिल्स् असोसिएशनचे अध्यक्ष रवी सॅम यांनी सांगितले. सध्याचे भाव जून महिन्यातही टिकून राहू शकतात, असाही अंदाज सॅम यांनी व्यक्त केला.
सॅम यांच्या मते, कापूस उत्पादन आणि वापर समितीच्या अंदाजानुसार देशात ३३७ लाख टन उत्पादन झाले. तर देशात २७२ लाख गाठी कापूस बाजारात आला. तमिळनाडू आणि काही राज्यांमध्ये १० लाख गाठी उन्हाळी कापसाचे उत्पादन झाले.
त्यामुळे आणखी काही महीने कापसाची आवक सुरु राहील. एरवी ३१ मार्चपर्यंत ९० टक्के कापूस बाजारात येत होता. पण यंदा केवळ ६० टक्के कापूस आला. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता.
चालू हंगामात रोज १ लाख १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली. तसेच हंगामाच्या शेवटी उद्योगांना कापसाची टंचाई भासू शकते. त्यामुळे अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीवरील शुल्क काढावे, अशी मागणीही सॅम यांनी केली.
अंदाजात विसंगती
पण एकीकेड सॅम निर्यातीला मागणी नसल्याचे सांगतात. तर दुसरीकडे देशात कापूस कमी आहे, म्हणजेच उद्योगांना पुरणार त्यामुळे हंगामाच्या शेवटी टंचाई होऊ शकते म्हणून आयातशुल्क काढण्याची मागणी करतात.
यावरूनच देशातील उत्पादन कमी असल्याचं समोर येतं. जाणकारांच्या मते, यंदा निर्यात कमी झाली तरी स्थानिक बाजार मोठा आहे. सध्या कापसाचे भाव आवकेचा दबाव असल्याने नरमले आहेत.
काय आहे अंदाज?
शेतकरी आणखी काही दिवस कापूस विक्रीचा दबाव कायम ठेऊ शकतात. पण त्यानंतर मात्र आवक कमी होऊ शकते. त्यातच यंदा देशातील पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे. तर काही भागात कमी पावसाचा अंदाज आहे.
याचा परिणाम देशातील कापूस उत्पादनावर होऊ शकतो. लागवडीच्या गतीचाही बाजारावर परिणाम दिसू शकतो, असा अंदात कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.