Soybean Rate Maharashtra: सोयाबीन १५० ते २०० रूपयांनी वाढणार?

Soybean Market : सोयाबीनचे दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला होता. पण हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा धीर सुटला.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Rate सोयाबीनचे दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला होता. पण हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा धीर सुटला. त्यांनी पाच हजार रूपये क्विंटलला माल विकून टाकला. पण अनेक शेतकऱ्यांनी मात्र संयम ठेवला. त्यांना त्याचं फळ मिळताना दिसतंय.

गेल्या काही दिवसांत बाजाराने कात टाकलीय. सोयाबीनच्या दरात सुधारणा झालीय. परंतु हा कल कायम राहील का, की दर पुन्हा उलटे फिरतील, असे प्रश्न आजही अनेक शेतकरी विचारत आहेत.

या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात काय घडामोडी सुरू आहेत, त्याचा सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होईल, हे जरा समजून घेतलं पाहिजे.

यूएसडीएच्या अहवालामुळे सोयाबीनला बळ

अमेरिकेच्या कृषी खात्याचा म्हणजे यूएसडीएचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. आगामी वर्षात म्हणजे २०२३ मध्ये अमेरिकेत सोयाबीनची लागवड ८७.५ दशलक्ष हेक्टरवर होईल, असा अंदाज त्यात दिलाय.

म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा पेरा किंचित वाढणार आहे. आधीच्या अंदाजानुसार सोयाबीनच्या लागवडक्षेत्रात मोठी वाढ होण्याची अपेक्षा होती. परंतु ताज्या अंदाजामुळे त्याला खो बसलाय.

दुसरं म्हणजे अमेरिकेची सोयाबीन निर्यात अपेक्षेहून जास्त झालीय, तर आठवड्याचे शिल्लक साठे अपेक्षेपेक्षा खूपच कमी दिसतायत.

Soybean Market
Soybean Market : परभणीत सोयाबीनचे दर वाढून पोचले पाच हजारांवर

ब्राझील, अर्जेन्टिनातील स्थिती निर्णायक

ब्राझील आणि अर्जेन्टिना हे देश सोयाबीन उत्पादनात जगात आघाडीवर आहेत. अर्जेन्टिनात दुष्काळ पडलाय. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार आहे. आधीच्या अंदाजापेक्षा उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तिथं पिकाचं उत्पादन तर कमी होईलच, परंतु गुणवत्ताही मार खाईल, असं चित्र आहे.

तर ब्राझीलमध्ये जैवइंधन मिश्रणाचं प्रमाण १० टक्क्यावरून १२ टक्क्यावर नेण्यात आलं आहे. तिथे जैवइंधन उत्पादनासाठी ७० टक्के सोयातेलाचा वापर केला जातो. आता वाढीव उद्दीष्टामुळे जैवइंधन निर्मितीसाठी अतिरिक्त ८ लाख टन सोयातेलाचा वापर होईल, असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे दुष्काळामुळे अडचणीत आलेला अर्जेंटिना ब्राझिलमधून ३०-५० लाख टन सोयाबीन आयात करण्याची शक्यता आहे. अमेरिकेत नवीन हंगामातलं सोयाबीन बाजारात यायला अजून निदान पाच महिने आहेत. या सगळ्यावरून येत्या काही महिन्यांमध्ये सोयाबीनचा पुरवठा ‘टाईट' राहणार हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे सोयाबीनच्या दरवाढीला बळ मिळेल, असं जाणकार सांगतायत.

खाद्यतेलाच्या वाढत्या किंमती

दुसरा मोठा फॅक्टर आहे तेलाच्या वाढत्या किंमतींचा. सध्या कच्चे खनिजतेल म्हणजे क्रुड ऑईल तेजीत आहे. मागील पाच-सहा दिवसांत क्रुड ऑईल १० टक्क्यांहून अधिक वाढलंय. त्यामुळे सगळ्याच वनस्पतिजन्य खाद्यतेलाच्या किंमती वधारल्यात. पामतेल ७ टक्के वाढलंय. पामतेल स्पर्धा करतं सोयातेलाशी. त्यामुळे सोयातेलही त्याच प्रमाणात वाढलंय.

यंदा भारतात सोयाबीनच्या किंमती दबावात राहण्याचं मुख्य कारण होतं खाद्यतेलाच्या घटलेल्या किंमती. केंद्र सरकारने बेसुमार आयात करून खाद्यतेलाचे दर पाडले. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे हे चित्र बदलणार आहे. त्याचा थेट फायदा सोयाबीनला होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Soybean Market
Soybean Rate : देशातील बाजारात सोयाबीन दरात किती वाढ झाली?

प्रक्रियादारांकडून मोठी खरेदी?

सोयाबीन क्रश केल्यानंतर सोयातेल आणि सोयापेंड म्हणजे डीओसी ही दोन उत्पादनं मिळतात. त्यांना किती मागणी आहे, त्यांचे दर तेजीत आहेत की मंदीत यावर सोयाबीनचे दर ठरतात. सोयातेल वधारलंय हे आपण वर बघितलंच. सोयापेंड बाजाराची स्थिती काय आहे, ते आता बघू.

यंदा सोयापेंड निर्यातीला मोठी मागणी राहिली. त्यामुळे सध्या देशातील सोयापेंड साठे संपत आलेत. आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत आहे.

भारतातील सोयाबीन प्रक्रियादारांनी एप्रिल महिन्याचे निर्यातीचे करार केले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आता बाजारातून सोयाबीन मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्यावर प्रक्रिया करणं भाग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मोठी खरेदी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

थोडक्यात यूएसडीएचा अहवाल, सोयातेलाची किंमतवाढ आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडून अपेक्षित मोठी खरेदी या तिन्ही घडामोडींमुळे सोयाबीन उसळी घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

येत्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रूपयांची वाढ होईल आणि सोयाबीनचे दर टिकून राहतील, असं अभ्यासकांनी सांगितलंय. सोयाबीन ५५०० रूपयांची किंमतपातळी ओलांडेल आणि वाढीव किंमतीवर बाजार टिकून राहील, असं त्यांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com