
Soybean Market : देशातून यंदा सोयापेंड निर्यात (Soyameal Export) चांगलीच वाढली आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन दर टिकून आहेत. मागील तीन दिवसांमध्ये सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दरपातळी अद्यापही झाली नाही.
पुढील काळातही दरवाढीसाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
यंदा सोयाबीन बाजारात अर्जेंटिनातील उत्पादन घटीमुळे मोठ्या घडामोडी घडल्या. सोयापेंडच्या दरात यामुळे तेजी आली. जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर असला तरी सोयापेंड निर्यात आणि उत्पादनात अर्जेंटिना आघाडीवर आहे.
अर्जेंटिनात मागील हंगामात ३४९ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदा २५० लाख टनांवर स्थिरावू शकते. त्यामुळे अर्जेंटिनातून होणारी सोयापेंड निर्यात कमी राहणार आहे. तसेच अर्जेंटिनाला जवळपास १०० लाख टन सोयाबीन आयात करावी लागेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत होते.
बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळे सोयाबीन आणि सोयापेंड घसरले होते. पण चालू आठवड्यात दरात सुधारणा होत आहे. ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पण ब्राझील सोयाबीनचे गाळप कमी करते. ब्राझीलमधून थेट सोयाबीनची निर्यात होत असते. त्यामुळं सोयापेंडचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.
तसेच बांगलादेशह भारताच्या शेजारील देशांना ब्राझीलमधून सोयापेंड आयात करण्यात अडचणी असतात. डिलिव्हरी पोहोच होण्यास विलंब होतो. त्यामुळे बांगलादेश, जपान, व्हिएतनाम आदी देश भारताकडूनच सोयापेंड घेत असतात.
भारताचं सोयापेंड महाग असलं तरी त्यांची मागणी असते. अर्जेंटिनातील सोयापेंड उत्पादन घटल्याचा भारताला फायदा मिळत आहे. भारताने चालू हंगामात महिन्याला सरासरी २ लाख टन सोयापेंड निर्यात केल्याचं उद्योगांकडून सांगण्यात आलं.
चालू हंगामात शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोयाबीनची मर्यादित विक्री केली. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारातील आवक वाढली. मार्च महिन्यातील आवक जास्त होती.
त्यामुळे सोयाबीनचे भाव दबावात येऊन हंगामातील निचांकी पातळीवर पोहोचले. तसेच यंदा बाजारातील आवक गेल्या वर्षीपेक्षा जास्तच राहिली. त्यामुळे दरावर दबाव आहे. खाद्यतेल दरातील घटीचाही दबाव सोयाबीनवर आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
तसेच देशातून सोयापेंड निर्यातीला मागणी कायम आहे. उद्योगांना सौदे पूर्ण करण्यासाठी सोयाबीन खरेदी करावी लागेल. तसेच शेतकऱ्यांकडील बऱ्यापैकी स्टाॅक बाजारात आला. त्यामुळे शिल्लक मालाचे प्रमाणं कमी झालं. सोयाबीनची आवक पुढील काही दिवस जास्त दिसू शकते. पण त्यानंतर आवक कमी होईल.
सोयाबीनला कशाचा आधार?
- शेतकऱ्यांकडील साठा कमी झाला
- सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली
- एप्रिलमध्ये निर्यात विक्रमी होण्याची शक्यता
- बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज
- सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्क वाढीचा अंदाज
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर पूर्वपातळीकडे
- सोयापेंड दरही मंदीतून सावरले
- शेजारील देशांची सोयापेंडसाठी भारताला पसंती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.