मरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farmer Loan Waive Scheme) पूर्णतः कर्जफेड करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील २३ हजार ३३८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ (Incentive Grant) देण्यात येणार आहे. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ तसेच २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात येईल. (Farmer Loan Waive In Maharashtra)
पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करून घेत कर्जमुक्त केले होते. मात्र नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांच्यामध्ये कर्ज फेडून चूक केली का, अशी भावना निर्माण झाली होती. त्यावर मार्ग काढत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानुसार २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज ३० जून २०१८ व ३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास आणि २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीककर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील तीन वर्षांतील २३ हजार ३३८ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांनी तीन वर्षात ६ कोटी ८० लाख २८ हजार ४५५ रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. मात्र, २०१९-२० या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
वर्ष : शेतकरी संख्या : कर्जाची रक्कम
२०१७-१८ : ५९९३ : १,५१,९२,९९९
२०१८-१९ : १२,६१५ : १,८८,३९,४८१
१०१९-२० : ४७३० : ३,३९,९५ ९७५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.