
Pulses Rate : डाळी, धान्य आणि कांद्यामुळे महागाईचा टक्का वाढलेलाच आहे, असा निष्कर्ष सध्या काढला जात आहे. यंदा देशात कडधान्याचे उत्पादन कमी आहे. गहू आणि तांदूळाचा पुरवठाही मर्यादीत आहे. तर टंचाईमुळे कांद्याचे भाव काहीसे वाढले आहेत. त्यातही सरकारने या पिकांचे भाव पाडण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पुरवठाच कमी असल्याने भाव काहीसे जास्त आहेत. तरीही भाववाढीच्या नावाने ओरड सुरु आगहे.
किरकोळ महागाई निर्देशांक काढण्यासाठी डाळींना १५.३० टक्के आणि धान्य पिकांना ३.४६ टक्के भारांकन देण्यात आले आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या आकडेवरीनुसार डाळींचा महागाईदर १९.४ टक्के आहे. हा दर सप्टेंबर महिन्यात १७.७ टक्के होता. यासोबतच धान्य, कांदा आणि टोमॅटोच्या भावातही वाढ झाल्याची चर्चा आहे. या शेतीमालाचे भाव सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत किंवा त्यांच्या किमान पातळीवरून किती वाढले, याची तुलना केली जात आहे. पण ज्या महिन्यातील दराशी ही तुलना केली जात आहे त्या महिन्यात या पिकांचे उत्पादन खर्चापेक्षा किती कमी किंवा जास्त होते? किंबहुना सध्या दराची स्थिती काय आहे? याचा विचार कुणी करत नाही.
शेतीमालाचे भाव वाढीमागे प्रामुख्याने दुष्काळ आहे. कारण दुष्काळामुळे खरिप आणि रब्बी हंगामातील उत्पादनावर परिणाम दिसतो. यंदा देशातील कडधान्य, धान्य पिके, कांदा उत्पादन कमीच राहील असा अंदाज आहे. त्यात यंदा रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि तांदळाचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. कारण सध्या रब्बी हंगामातील पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी वेगाने सुरु आहे. पुढील काळात रब्बीच्या पेरणीचा वेग वाढेल, असा अंदाज सराकरला आहे. पण जाणकारांच्या मते, यंदा दुष्काळी स्थिती असल्याने रब्बीची पेरणी कमीच राहील. रब्बीविषयीच्या अनिश्चिततेमुळेच बाजारात शेतीमालाचे भाव वाढत आहेत, असा दावा अभ्यासकांनी केला.
सध्या काही शेतीमालाचे भाव वाढलेले असले तरी तेलबियांचे भाव दबावातच आहेत. खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात झाल्यामुळे खाद्यतेलाचे भाव दबावात आहेत. तसेच उत्पादन घटल्याने पुढील काळात शेतीमालाचे भाव तेजीतच राहू शकतात. मात्र काही अभ्यासकांच्या मते दरात काही शेतीमालाच्या भावात काहीसे चढ उतारही दिसू शकतात.
शेतकऱ्यांच्या बाजुने विचार केला तर उत्पादन घटल्याने आधीच फटका बसला आहे. त्यातच महागाईच्या नावाखाली सरकार शेतीमालाचे भाव पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. यामुळे हाती आलेल्या कमी उत्पादनालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.