
Solapur News: उसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या माळशिरस तालुक्यात अलीकडच्या काही वर्षांत केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असून, सध्या हा संपूर्ण पट्टा केळी उत्पादनाचा म्हणून ओळख मिळवत आहे. स्थानिक बाजारपेठेसह सध्या माळशिरस तालुक्यातून दररोज दहा टनांपर्यंत केळीची निर्यात होत आहे.
सध्या शेती करणे म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय समजला जातो. भुसार पिके मजुरांअभावी कोणी करताना दिसत नाही. बहुतेक बागायतदार हे घरी शेती असूनसुद्धा दररोज खाण्यासाठी गहू, ज्वारी, बाजरी बाजारपेठेतून खरेदी करत आहेत, याला कारण म्हणजे, वाढती मजुरी. उत्पादन खर्चही निघत नाही, याला पर्याय म्हणून या भागात ऊस उत्पादन सुरू झाले. परंतु एकरी उत्पादन कमी निघत असल्यामुळे नगदी पीक ही उसाची ओळखही पुसून गेली.
त्यानंतर डाळिंब पिकात अनेकांनी लाखो रुपये कमावले; परंतु बदलत्या हवामानामुळे डाळिंब फळावर तेल्या रोगाने आणि मर रोगानेही संकट आणले. त्यानंतर अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने केळी लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. जी-९ ही केळी या भागात दर्जेदार पिकू लागली आहे.
ते आता चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळवू लागले आहेत. सध्या सोलापूर जिल्हा केळी उत्पादनात आघाडी मिळवत आहे. त्यातही माळशिरस, पंढरपूर, माढा आणि करमाळा तालुक्यात केळीचे क्षेत्र वाढते आहे. सध्या माळशिरस तालुक्यातील केळी सौदी अरेबिया, दुबई, इराण, इराक, ओमान आदी देशांत निर्यात होत आहे. तसेच कमी प्रतीचा माल बांगलादेश, नेपाळ, उत्तर भारतात जात आहे.
सोलापूरच्या केळीची गुणवत्ता
खानदेश, जळगाव, रावेर, वसमत, नांदेड, मुक्ताईनगर येथील केळीपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील केळी उच्च प्रतीची व दर्जेदार उत्पादित होत असल्याने निर्यातदार कंपन्या सोलापूर जिल्ह्यातील केळीला पसंती देत आहेत. जळगाव भागापेक्षा या भागातील केळीला दोन ते चार रुपये जादा दर मिळत आहेत. नवरात्रीत नवीन केळीची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. तोपर्यंत यापेक्षाही अधिक दर वाढण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.