Grape Harvesting : उशिरा खरड छाटणीमुळे उद्‍भविणाऱ्या समस्या

Grape Cultivation : द्राक्ष काढणीनंतर सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खरड छाटणी केली जाते. परंतु द्राक्ष हंगाम उशिराने संपल्यास खरड छाटणीला उशीर होतो.
Grape Harvesting
Grape HarvestingAgrowon

डॉ. स. द. रामटेके, आप्पासो गवळी

Grape Farming : द्राक्ष काढणीनंतर सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खरड छाटणी केली जाते. परंतु द्राक्ष हंगाम उशिराने संपल्यास खरड छाटणीला उशीर होतो. द्राक्ष तोडणीस काही समस्यांमुळे उशीर होतो. यामध्ये प्रामुख्याने साखर उतरण्याच्या काळात पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने तोडणीचा कालावधी वाढतो.

त्यामुळे काही बागायतदार उशिराच्या छाटणीवर भर देतात. याशिवाय जाणीवपूर्वक बाजारपेठेमध्ये द्राक्षाला चांगला दर मिळण्याच्या हेतूने उशिराची गोडी छाटणी केली जाते. त्यामुळे फळे तयार होण्यास तेवढाच जास्त कालावधी (१३५ दिवस) लागतो.

उशिरा खरड छाटणी करण्याचे कारण म्हणजे घडांची संख्या जास्त असणे, संजीवकांचा बेसुमार वापर. वेलींवर प्रमाणापेक्षा जास्त घड असल्याने अपुऱ्या विस्तारामध्ये मण्यांची गोडी वाढविण्यासाठी शर्करा निर्मिती अपुरी पडते.

मण्यांना फुगवणीसाठी सीपीपीयू व विविध संजीवकांचा अमर्यादित वापर केला जातो. त्यामुळे अन्न साठवण क्षमता कमी पडते. परिणामी, अशा घडांमध्ये पक्वता येण्यासाठी वेळ लागतो. त्याचा परिणाम खरड छाटणीवर होतो.

Grape Harvesting
Grape Farmer : व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांची सव्वा कोटींची फसवणूक

उद्‍भविणाऱ्या समस्या

१) छाटणीपूर्वी बागेस विश्रांती न मिळणे

- द्राक्ष काढणीनंतर खरड छाटणीपूर्वी वेलीस विश्रांती मिळणे आवश्यक असते. माल काढणीनंतर वार्षिक खतांच्या मात्रेपैकी उरलेली १० टक्के खतांची मात्रा देऊन पाणी सुरू ठेवावे. त्यामुळे नवीन मुळ्यांची जोमदार वाढ होते तसेच पाने सक्रिय होतात. त्याचा फायदा छाटणीनंतर निघणाऱ्या फुटीस होतो.

- बागेला विश्रांती देणे व ताण देणे या दोन्हींमध्ये थोडी संभ्रमता आहे. विश्रांती देणे म्हणजे खते व पाणी देऊन वेलीस पुनरुज्जीवित करणे होय. विश्रांतीच्या काळामध्ये वेलीच्या अन्नसाठ्यामध्ये उत्पादक काळात झालेला व्यय भरून काढण्यास काही अंशी मदत होते. या अन्नसाठ्याचा उपयोग छाटणीनंतर वेलीअंतर्गत होणाऱ्या चयापचय क्रियांसाठी होत असतो.

छाटणीनंतरच्या या क्रिया फूट निघण्यासाठी आवश्यक असतात. परंतु माल काढणीनंतर योग्य विश्रांती न मिळाल्यामुळे अप्रत्यक्षपणे वेलीला ताण बसतो. तसेच चयापचय क्रियांसाठी आवश्यक ऊर्जा मिळत नाही. पर्यायाने फूट निघण्यामध्ये समस्या निर्माण होते.

२) छाटणीपूर्वी मशागतीची कामे करण्यास वेळ न मिळणे

- खरड छाटणी ही वेलींचा वार्षिक वाढीचा पाया समजला जातो. छाटणीपूर्वी योग्य मशागत करून मुळांच्या वाढीस चालना देणे आवश्यक असते. खरड छाटणी अगोदर साधारणपणे १५ ते २० टक्के मुळांची नवनिर्मिती होण्यासाठी मशागत करणे गरजेचे आहे. परंतु लांबलेल्या काढणीमुळे छाटणीस उशीर होत असल्यास मशागत करण्याची घाई करू नये.

कारण अशावेळी बागेला पुरेशी विश्रांती मिळालेली नसते. खोल मशागत केल्यास, नवीन मुळांच्या वाढीस विलंब लागतो. त्यामुळे मशागतीची कामे छाटणीनंतर, परंतु हलक्या स्वरूपात करावीत. मशागतीवेळी जास्त प्रमाणात मुळ्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

३) छाटणीपूर्वी खतांची मात्रा न मिळणे

- खरड छाटणीपूर्वी मशागतीबरोबरच शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेटचे बेसल डोस दिले जातात. तसेच सुरुवातीस नत्र व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. परंतु बऱ्याच वेळा छाटणीच्या कामांमधील गडबडीमध्ये ही मात्रा द्यायचे राहून जाते. अशा परिस्थितीमध्ये विद्राव्य खतांचा वापर करणे संयुक्तिक ठरते.

त्यासाठी छाटणीनंतर १ ते ४० दिवस नत्र (युरिया २ किलो प्रति एकर प्रति दिवस) द्यावे. त्यानंतर ४१ ते ७० दिवसांमध्ये स्फुरद (फॉस्फोरिक आम्ल २ ते ३ लिटर प्रति एकर प्रति दिवस) किंवा इतर स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा.

Grape Harvesting
Grape Harvesting : द्राक्ष बागेत एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना

छाटणीनंतर फुटी निघण्याच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्ष वेलींवर आधीच्या हंगामातील उत्पादनाचा ताण असतानाच खरड छाटणी केल्यास फूट निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तसेच या काळात तापमानही वाढलेले असते. त्यामुळे वेलीअंतर्गत चयापचय क्रियांचा वेग मंदावतो. जास्त तापमान आणि पाण्याची कमतरता या दोन्ही घटकांमुळे नवीन फुटी जळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

- एकसारख्या फुटी निघण्यासाठी हायड्रोजन सायनामाइड २० ते ३० मिलि प्रतिलिटर या प्रमाणात पेस्टिंग करावे. हे पेस्टिंग तापमान कमी झाल्यानंतरच करावे. अन्यथा द्राक्ष डोळ्यास इजा होण्याची शक्यता असते. यापेक्षा जास्त प्रमाणात पेस्टिंगची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवावे.

- बागेचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा कापडाचा वापरले असल्यास, ते काढण्याची घाई करू नये. कारण शेडनेटमधील वेलींना एकसारख्या आणि लवकर फुटी निघतात. साधारणपणे ७ ते ८ दिवस लवकर फुटी फुटतात.

- मुळांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण वाफसा राहील याची काळजी घ्यावी. बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये. छाटणीनंतर ७ ते ८ दिवसांपासून रोज २ ते ३ वेळा पाण्याची फवारणी करावी. त्यामुळे ओलांड्यावर आर्द्रता निर्माण होईल. एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल.

- मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये साचलेले क्षार काढून टाकण्यासाठी गंधक पावडर ५० किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी. काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचरा करून घ्यावा. त्याचा पांढऱ्या मुळांच्या वाढीसह फुटीवर देखील चांगला परिणाम होतो.

संपर्क - डॉ. स. द. रामटेके, ९४२२३१३१६६, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com