शास्त्रीय बीजोत्पादनासाठी बियाण्यांचे वर्गीकरण

शास्त्रीय पद्धतीने बिजोत्पादन घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय प्रमाणिकरण यंत्रणेशी संपर्क करावा. त्याद्वारे नोंदणीकृत बीजोत्पादनामध्ये सहभाग घेता येतो. अन्यथा स्वतःच्या गरजेपुरते बियाण्याची निर्मिती स्वतः आपल्या शेतात घेता येते.
शास्त्रीय बीजोत्पादनासाठी बियाण्यांचे वर्गीकरण
शास्त्रीय बीजोत्पादनासाठी बियाण्यांचे वर्गीकरण
Published on
Updated on

बिजोत्पादन तंत्रज्ञान म्हणजे काय? शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेले सुधारीत वाणांचे बियाणे उत्तम गुणवत्तेचे, उच्च दर्जाचे वाण, शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेले, वाणांचे मूळ गुणधर्म जसेच्या तसे दाखवणारे, कीड रोगमुक्त, ठरावीक टक्केवारी इतकी उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांची निर्मिती म्हणजे बिजोत्पादन तंत्रज्ञान होय. शास्त्रीय पद्धतीने बिजोत्पादन घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय प्रमाणिकरण यंत्रणेशी संपर्क करावा. त्याद्वारे नोंदणीकृत बीजोत्पादनामध्ये सहभाग घेता येतो. अन्यथा स्वतःच्या गरजेपुरते बियाण्याची निर्मिती स्वतः आपल्या शेतात घेता येते. पिकांचे मुख्य दोन प्रकार असतात. १) स्वपरागित पिके : यामध्ये भात, गहू, भुईमूग, मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन, चवळी व तीळ इ. २) परपरागित पिके : यामध्ये कापूस, तूर, ज्वारी, बाजरी, मका व सूर्यफूल इ. बियाण्यांचे वर्गीकरण : १) मूलभूत/ पैदासकाराचे ( ब्रिडर) बियाणे : पैदासकार बीजोत्पादनासाठी न्यूक्लियस किंवा शुद्ध पायाभूत बी वापरतात. शुद्ध पायाभूत बीजोत्पादनासाठी हा कार्यक्रम प्रत्यक्षात पैदासकाराच्या देखरेखीखाली राबविला जातो. हे बी सामान्य शेतकऱ्याच्या शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसते. पैदासकाराच्या बियाणाचे उत्पादन करण्यासाठी सर्व प्रकारच्या शिफारशीप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने पिकांची काळजी घेतली जाते. पैदासकाराचे (ब्रीडर) बियाण्याच्या पिशवीवर पिवळ्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. २) पायाभूत बियाणे:- पायाभूत बीजोत्पादनासाठी पैदासकाराच्या बियाणाचा वापर करावा लागतो. मात्र, कधीकधी शुद्ध पायाभूत बियाणाचा वापर करूनही असे बिजोत्पादन घेतले जाते. पायाभूत बियाणाची शुद्धता राखण्यासाठी पैदासकाराचे साह्य घ्यावे लागते. बीज प्रमाणीकरण योजनेमार्फत सदरील बियाणांची शुद्धता तपासून बियाणे प्रमाणित व मोहरबंद केले जाते. पायाभूत बियाण्याच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. ३) प्रमाणित बियाणे :- प्रमाणित बियाणे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केले जाते. यासाठी मूलभूत किंवा नोंदणीकृत पायाभूत बियाणाचा वापर करतात. हे बियाणे योग्य प्रमाणिकरण झाल्यानंतर सामान्य शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होते. प्रमाणित बियाण्याच्या पिशवीवर निळ्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. ४) सत्यवर्धक (ट्रूथफूल) बियाणे : सत्यवर्धक बीजोत्पादनासाठी प्रमाणित बियाणाचा वापर करतात. हे बियाणे शेतकरी आपल्या शेतावर तयार करू शकतो. मात्र, या बियाण्यांची शुद्धता व प्रत चांगली असणे गरजेचे आहे. असे बियाणे आनुवंशिक शुद्धता स्थायिक शुद्धतेच्या कसोटींना पात्र असावे लागते. सत्यवर्धक बियाण्याच्या पिशवीवर हिरव्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. शेतकरी आपल्या शेतामध्ये प्रमाणित व सत्यवर्धक बियाणांचे बिजोत्पादन घेऊ शकतो. बियाण्याचे वर्गीकरण पिशवीवरील प्रमाणपत्राच्या रंगावरून करता येते. मातृपितृ बियाण्यांची निवड करताना घ्यावयाची काळजी : मातृपितृ बियाण्याची निवड ही बीजोत्पादनाच्या वर्गीकरणावर अवलंबून आहे.

  • पायाभूत बीजोत्पादनासाठी मूलभूत बियाणे व प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावे.
  • मातृपितृ बियाणे योग्य संस्थेकडून ( विशेषतः कृषी विद्यापीठाकडून) घ्यावे.
  • पिशवीवर लावलेले संबंधित प्रमाणपत्र बिजोत्पादन पीक प्रमाणिकरण होईपर्यंत जपून ठेवावे.
  • बियाणे थंड व कोरड्या जागेत काळजीपूर्वक ठेवावे.
  • निष्काळजीपणे बियाणे हाताळल्यास बियाण्याच्या उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
  • या बियाण्यावर कीडनाशकाची व बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेली नसल्यास ही प्रक्रिया स्वतः बियांना इजा होणार नाही अशा प्रकारे पेरणीच्या एक किंवा दोन दिवस आधी करावी.
  • बीजोत्पादनादरम्यान भेसळ कशी ओळखायची? कोणत्याही पिकांच्या जातीची उत्पादन क्षमता ही त्यातील आनुवंशिक गुणांवर अवलंबून असते. ही गुणवत्ता व उत्पादन क्षमता पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवण्यासाठी व शंभर टक्के शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी बीजोत्पादनादरम्यान भेसळ काढणे महत्त्वाचे आहे. बीजोत्पादनाच्या पिकातील वेगळी दिसणारी झाडे काढून टाकण्यास भेसळ काढणे किंवा रोगिंग असे म्हणतात. पिकाची काढणी करण्यापूर्वी दोन ते तीन वेळा भेसळ काढावी. वाण ओळखण्याचे गुणधर्म : आनुवंशिक शुद्धता राखण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रमात एखाद्या पिकांचा एक वाण त्याच पिकांच्या इतर वाणापेक्षा वेगळा आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. बीजोत्पादनाच्या विविध अवस्थेत बीजोत्पादनासाठी निवडलेल्या वाणांचे काही निश्चित आनुवंशिक गुणधर्म माहीत असल्यास त्यापेक्षा वेगळी रोपे भेसळीची आहेत हे ओळखता येते. भेसळीची रोपांचा नाश करणे शक्य होते. हे गुणधर्म वेगवेगळ्या रोपांवस्थेत असतात. १) रोप अवस्था : बिजदलाचा आकार, खोडाचा रंग, पानावरील, शेंड्यावरील लव व पानांचा रंग. २) विकसित रोप : उंची, रुंदी, फांद्याची संख्या, खोडावरील लव, फांद्याची लांबी इ. ३) पाने : आकार, कळ, रंग, लव, मधुग्रंथी, उपपर्णे इ. ४) फुले : देठ, सहपत्रा, स्त्रीकेसर, पुंकेसरांच्या भागातील रंग, पाकळ्यांचे व परागकणांचे रंग. ५) फळ : रंग व पृष्ठभागातील रंग व आकार. ६) बियाणे : रंग, आकार व पृष्ठभाग इ. या खेरीज रोपांची उंची, फुले येण्याचा कालावधी यासारख्या संख्यात्मक गुणधर्माचा अशुद्ध रोपे ओळखण्यासाठी उपयोग केला जातो. विविध पिकांच्या बीजोत्पादनासाठी बियाणांची मानके :

    अ.क्र.  विविध पिके सोयाबीन कापूस तूर ज्वारी सूर्यफूल मूग मका
      तपशील v  पायाभूत   पायाभूत प्रमाणित पायाभूत प्रमाणित पायाभूत प्रमाणित पायाभूत प्रमाणित पायाभूत प्रमाणित पायाभूत प्रमाणित
    शुद्ध बियाणे (कमीत कमी) १००% ९८%  ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८% ९८%
    २  घाण व काडीकचरा ३% ३% २% २% २% २% २% २% २% २% २% २% २% २%
    ३  इतर पिकाचे बियाणे नाही  नाही  ५ बिया/किलो  १० बिया/किलो ५बिया/किलो १० बिया/किलो  ५ बिया/किलो १० बिया/किलो  नाही नाही ५ बिया/ किलो १० बिया/किलो ५ बिया/ किलो १० बिया/किलो
    तणाचे बियाणे नाही ५ बिया/किलो नाही नाही १० बिया/किलो १० बिया/किलो ५ बिया/किलो १० बिया/किलो नाही नाही ५ बिया/किलो १० बिया/किलो नाही नाही
    इतर जातीचे बियाणे नाही ५ बिया/किलो नाही नाही १० बिया/ किलो २० बिया/किलो १० बिया/ किलो २० बिया/किलो नाही नाही १० बिया/किलो २०बिया/किलो १० बिया/किलो २०बिया/किलो
    उगवण क्षमता ७०% ७०% ६५% ६५% ७५% ७५% ८०%  ८०%  ७०% ७०% ७०% ७०% ९०% ९०%
    ७   बियाण्यातील ओलावा १२ १२ १० १० १२ १२ १२ १२
    विलगीकरण अंतर ३ मी. ३ मी. ५० मी. ३० मी. २०० मी. १०० मी. २०० मी. १०० मी. ४०० मी. २०० मी. २० मी. १० मी. ४०० मी. २०० मी.

    प्रा. संजय तु. राठोड, ८६६८५०९७९६ (साहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, अंबेजोगाई.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com