आख्खा देशच सेंद्रिय!

भूतानच्या पंतप्रधानांनी २०२० पर्यंत जगातील पहिला सेंद्रिय देश बनण्याचे ध्येय २०१४ मध्ये जाहीर केलं. भूतानच्या सकल राष्ट्रीय आनंद योजनेच्या चार स्तंभांपैकी एक असलेल्या पर्यावरण संवर्धनमध्ये सेंद्रिय शेतीचा समावेश झाला. अन् सुरू झाला सेंद्रियच्या दिशेने खरा प्रवास.
आख्खा देशच सेंद्रिय!
आख्खा देशच सेंद्रिय!
Published on
Updated on

हिमालयाला गोंजारून येणारा थंडगार वारा अंगावर घेत भूतानच्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही बुलेट पळवत होतो. वाऱ्याच्या जोडीने आजूबाजूच्या शेतातील पिके जणू पानांच्या टाळ्या वाजवत परदेशी पाहुण्यांचं स्वागत करत होते. ‘‘भूक लागलीय यार, थांबूयात की जेवायला’’ असं म्हणत रस्त्याच्या बाजूच्या लहानशा हॉटेलकडे गाडी दाबली. किचनमधील भूतानी अन्नाच्या घमघमाटाने पोटातील कावळ्यांना चेव सुटला होता. झो शुंगो, इमा दात्सी आणि थुपका या भूतानी पक्वान्नावर हात मारला. ‘‘अरे! कीटकनाशक फवारलेली भाजी तर नाही ना वापरली याने?’’ या शंकेच्या रासायनिक पालीने मनात चुकचुकण्याची चूक केली. पण इथं समदं सेंद्रियच असतं, असं कळल्यावर जीव सेंद्रिय पक्वान्नाच्या भांड्यात पडला. भूतानच्या सेंद्रिय शेतीची कहाणी फारच रोचक आहे. खरं सांगायचं तर या देशातील पारंपरिक शेती बऱ्याच अंशी सेंद्रिय बाण्याची होती. तिची तऱ्हा सेंद्रियच होती, फक्त तिला आंतरराष्ट्रीय मान्यता नव्हती. तिला गोऱ्यांनी सर्टिफिकेट देऊन प्रमाणित केलं नव्हतं. सेंद्रिय शेती हा विषय पर्यावरण संवर्धन अंतर्गत येत असल्याने तो भूतानच्या सकल राष्ट्रीय आनंद योजनेच्या चार स्तंभांपैकी एक आहे. त्यामुळे २०१४ मध्ये भूतानच्या पंतप्रधानांनी २०२० पर्यंत जगातील पहिला सेंद्रिय देश बनण्याचे ध्येय जाहीर केलं. हे शिवधनुष्य पेलवायचं ठरवलं. मुळातच सेंद्रिय असलेल्या शेतीला अजून सेंद्रिय करायचं भूत भूतानी सरकारच्या मानगुटीवर बसलं. सर्व देशानं झपाटून या कामात झोकून दिलं. फूटपट्टी घेऊन माप काढण्यात पटाईत पाश्‍चिमात्य संशोधकांनी हा प्रकल्प सुरू झाल्यावर दोन वर्षांनंतर म्हणजे २०१६ मध्ये, ६२०० भूतानी शेतकऱ्यांचा सर्व्हे करून एक संशोधन केलं आणि अमेरिकेतील ‘ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्फरन्स’ मध्ये शोधनिबंध प्रकाशित करून त्यांची निरीक्षणं नोंदवली. ती भूतानी सेंद्रिय प्रकल्पाचं काही खरं नाही अशीच होती. त्यांच्या मते, या दोन वर्षांत पारंपरिक शेतीपेक्षा १९.१ टक्के उत्पादन कमी झालं, अन्नधान्याची आयात वाढली आणि त्यांचं स्वावलंबित्व ९.४ टक्क्यांनी कमी झाले, जमिनीतील नत्राची जमिनीतील उपलब्धता २२.२ टक्क्यांनी घटली आणि त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार १.३ टक्क्याने उणावला. या संशोधनाचा दाखल देत काहींनी भूतानवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. एकदम मोठ्या प्रमाणात सेंद्रियवर जावंच का, असा सवाल विचारला जाऊ लागला. यावरून भूतानचा सेंद्रिय प्रकल्प नापास झाला असं म्हणायचं का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असंच येईल. कारण गोऱ्या संशोधकांनी या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा जरा अगोदरच घेऊन निकाल लावायचा प्रयत्न केला होता. पारंपरिक शेतीचं सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर होण्यास कमीत कमी तीन वर्षं लागतात. इथं मात्र यांनी दोन वर्षांत निकालाची अपेक्षा केली होती. परिवर्तनाच्या सुरुवातीच्या वर्षात कीड-रोग थोडेफार वाढणारच, रासायनिक खतांच्या सलाइनवरील मातीला सेंद्रिय कस धरायला धीर धरावा लागेलच. गाडी शिकणाऱ्या गाड्यागत सेंद्रिय शेतीतंत्र शिकायला शेतकऱ्याला थोडा वेळ लागणारच. अजून शिकाऊ ड्रायव्हरची, "L" लावून फिरणाऱ्याची फायनल परीक्षा घेऊन काय फायदा? ही शेती पर्यावरणपूरक आहे. जमीन, वातावरण, पक्षी प्राणी, माणूस या सगळ्यांना ध्यानात ठेवून करायची शेती आहे. जसा आदर्श शिक्षक शाळेतील हुशार आणि ‘ढ’ विद्यार्थ्याला जमेत धरून, ‘ढ’ला वरती ओढून शाश्‍वत रीतीने त्याची शाळा करतो. तसंच जमीन, हवा, पाणी, जीवजंतू यांच्यातील कमजोर कडीला आधार देत समतोल साधावा लागतो. त्यासाठी फक्त शेतातील कमजोर विद्यार्थी अचूक शोधणं गरजेचं असतं. भूतानी शेतीचं ‘स्वॉट’ विश्‍लेषण ः इथं अगोदरच सेंद्रियपूरक वातावरण होतं. पाटी अगोदरच कोरी असेल तर लिहिणं सोपं जातं. भूतानच्या सेंद्रिय प्रकल्पाचं क्षमता, कमजोरी यांचं (SWOT) विश्‍लेषण केल्यावर त्यातील संधी आणि बलस्थानं प्रकर्षानं समोर आली. हे SWOT विश्‍लेषण जरा जाणून घेऊया. कदाचित आपण सुद्धा आपल्या शेतीचं असंच SWOT करू शकू. बलस्थान ः भूतानच्या राष्ट्रीय विकास तत्त्वज्ञानाशी जुळणारी ही संकल्पना होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी झाली. ‘राजा बोले दल हाले’ या म्हणीप्रमाणे येथील राजा बोलला आणि संपूर्ण दलाने हालचाली केल्या. मायबाप सरकारचा बळकट राजकीय आणि धोरणात्मक पाठिंबा हे मोठं बलस्थान होतं. देशातलं वातावरण सेंद्रियला पोषक होतं, कारण भूतानच्या पारंपरिक शेती आणि सेंद्रिय शेतीशी मिळतीजुळती होती. त्यामुळे जुनं शेतीचं ज्ञान या प्रकल्पासाठी बऱ्यापैकी सुसंगत होतं. कमजोरी : शेतीतंत्र जरी जुन्यासारखं असलं तरी सेंद्रिय शेतीच्या मॉडर्न फायद्यांबाबत लोक अनभिज्ञ होते, त्यामुळे सुरुवातीला लोकांना प्रोत्साहनाचा अभाव दिसून आला. लोकसंख्येच्या बाबतीत अगोदरच चिमुकला देश असल्यामुळे शेतमजुरांची कमतरता भासत होती. सेंद्रिय शेतीत कीड-रोगनियंत्रणासाठी आवश्यक निविष्ठांची कमतरता होती. जैविक कीटकनाशके आणि खते बनवणारे व्यवसाय देशात उपलब्ध नव्हते. सुरुवातीला धोरणात्मक स्पष्टता कमी होती, त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत होता. संधी :

  • सेंद्रिय मालासाठी असणारी मोठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भूतानी शेतीमालाची वाट पाहत उभी होती.
  • अगोदरच रसायनांना लांब ठेवणाऱ्या लोकांना एक पाऊल पुढे जाऊन निरोगी जीवनशैलीचा पुरस्कार करायची संधी मिळाली होती.
  • निसर्गाशी सुसंवाद ठेवणाऱ्या देशाने नैसर्गिक संसाधनांचा शाश्‍वत उपयोग अजून जास्त डोळसपणे केला होता.
  • अन्नधान्याच्या आणि शेती निविष्ठांच्या परदेशी पुरवठ्यावरील भर कमी होऊन त्यासाठी आत्मनिर्भर होण्याची संधी चालून आली होती.
  • सेंद्रिय खताचे स्थानिक पुरवठादार तयार करणे शक्य होणार होतं.
  • परदेशी बियाणं आयात करून आपल्या मातीत रुजवण्यापेक्षा, स्वदेशी बियाण्यांचे सार्वभौमत्व तयार करणं शक्य होणार होतं.
  • स्थानिक पिकांना प्रोत्साहन मिळणार होतं.
  • देशातल्या मातीची सुपीकता वाढवण्याची सुसंधी आली होती.
  • इतर पारंपरिक पिकांपेक्षा येथील सेंद्रिय मालाला भाव खायचा अधिक संधी होती.
  • स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी तयार होऊन बेरोजगारीची समस्या कमी होतील अशी आशा होती.
  • धोका :

  • रसायनं वजा केल्यानं सुरुवातीला कीड आणि रोगांचा उपद्रव वाढणार होता. त्यासाठीची उपाययोजना समजून घेऊन तिचा अवलंब करणं गरजेचं होतं.
  • देशातील सेंद्रिय खताचे अगोदरच मर्यादित असलेले आणि कमी होत जाणारे स्रोत ही मोठीच चिंतेची बाब होती.
  • अशा रीतीने या पर्यावरणपूरक शेतीच्या दिंडीत सर्व भूतानी वारकरी सामील झाले होते.
  • ‘‘साहेब, बिनधास्त खावा, इथं अन्नात, पाण्यात केमिकल नाही सापडणार’’ असा विश्‍वास मिळाला. मग निःशंक मनानं जेवण आटोपलं. वरून ‘हिमालय की गोद’मधून आलेलं थंडगार निर्मळ पाणी प्यालो. बाहेर आलो तर पानवाला दिसला. चुना न लावलेल्या पानांवर फक्त सुपारीचे २-३ तुकडे ठेवलेले. तोंडात पानाचा तोबरा भरत विचार केला, ‘‘पान रेसिड्यू फ्री आहे का?’’ त्यावर मीच मला झापलं ‘‘गुमान पान खा, मात्र त्याची पिंक टाकून हा देश प्रदूषित करू नकोस. चलता हैं! असं म्हणत पानालाही चुना न लावणाऱ्या भूतानच्या पर्यावरणाला चुना लावण्याची आगळीक करू नकोस ’’

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com