केळीची नवीन जातः ‘फुले प्राइड’

फुले प्राइड ही जात ग्रॅंडनैन पेक्षा दोन महिने लवकर तयार होते. झाडास आधार देण्याची गरज नसते. केळीचा आकार मोठा आहे. तसेच गराचे प्रमाण चांगले आहे. ही जात विपरीत हवामान स्थितीस प्रतिकारक्षम आहे.
new banana variety- phule pride
new banana variety- phule pride
Published on
Updated on

फुले प्राइड ही जात ग्रॅंडनैन पेक्षा दोन महिने लवकर तयार होते. झाडास आधार देण्याची गरज नसते. केळीचा आकार मोठा आहे. तसेच गराचे प्रमाण चांगले आहे. ही जात विपरीत हवामान स्थितीस प्रतिकारक्षम आहे. महाराष्ट्रात बसराई, वसई, आंबेमोहर, श्रीमंती, हरसाल, अर्धापुरी व महालक्ष्मी तर कोकणात लाल वेलची, राजेळी व सफेद वेलची या जातींची लागवड केली जाते. श्रीमंती, महालक्ष्मी वगळता बहुतेक जातींची उत्पादकता कमी होती. तथापि या जाती प्रमुख रोगांना सहनशील होत्या. सध्याच्या केळी जातींच्या तुलनेत ग्रॅंडनैन ही अधिक उत्पादन देणारी जात आहे. ऊतीसंर्वधन रोपांमुळे या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड वाढली आहे. अलीकडे ही जात जैविक तसेच अजैविक ताणाला बळी पडू लागली. ग्रॅंडनैन जातीची झाडे टोकाकडे निमुळते होत जात असल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने लगेच कोलमडते. ताशी २० किमी पेक्षा अधिकच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या जातीची झाडे उन्मळून पडतात. आभास खोड मधून चिरून झाडे पडतात. संशोधनाचे टप्पे 

  • राज्यातील केळी उत्पादकांची बुटकी, दर्जेदार घड असलेली, लवकर काढणीस तयार होणारी, सोसाट्याच्या वाऱ्याला प्रतिकारक तसेच अधिक तापमान व सिगाटोका, करपा रोगाला सहनशील जातीची मागणी होती. त्यादृष्टीने जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने सन २०१० पासून संशोधनास सुरुवात केली.
  • सन २०१२ साली संशोधन प्रक्षेत्रावर नैसर्गिक वेगळे बुटके, झाड आढळून आले. या वेगळ्या झाडाला बी. आर. एस-२०१३-३ असे नाव देऊन पुढील संशोधनास सुरुवात झाली. या नवीन जातीमध्ये (बी.आर.एस-२०१३-३) ग्रॅंडनैन व अर्धापूरी जातीच्या तुलनेत काही वेगळी वैशिष्ट्ये दिसून आली. ग्रॅंडनैन व अर्धापूरी या जातींच्या तुलनेत या झाडाची उंची (१.५३ मी), घड लवकर काढणीस तयार होणे (निसवण कालावधी २३० दिवस), घड कापणी ३२० दिवस (कंद लागवडीपासून), घड कापणी (१०० टक्के), घड कापणी निर्देशांक (६.६८), खोड मोडणे, घड सटकणे व झाडे उन्मळून पडणे या बाबतीत सरस आढळून आली आहे.
  • बी.आर.एस २०१३-३ या जातीच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे, उद्यानविद्या प्रक्षेत्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी महाविद्यालय, धुळे येथे संशोधनपर चाचण्या घेण्यात आल्या. या तिन्ही ठिकाणी समान निष्कर्ष प्राप्त झाले.
  • या जातीचा उत्पादन खर्च प्रचलित ग्रॅंडनैन जातीपेक्षा कमी आहे. कारण, ही जात ग्रॅंडनैन पेक्षा दोन महिने लवकर तयार होते. झाडास आधार देण्याची गरज नसते, फण्या विरळणीचा मजुरी खर्च व इतर निविष्ठा यांवर होणारा खर्च टाळता येतो.
  • या जातीच्या फण्यांची गुणवत्ता ग्रॅंडनैन व अर्धापूरी पेक्षा सरस ठरल्याने बी.आर.एस. २०१३-३ या जातीला मे २०१८ साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे झालेल्या संयुक्त संशोधन आढावा बैठकीत ‘फुले प्राइड’ या नावाने मान्यता देऊन महाराष्ट्रात प्रसारित करण्याची शिफारस करण्यात आली.
  • ठळक वैशिष्ट्ये  

    खोडाची उंची बुटकी (१.५३ मी)
    घड निसवण्यास लागणारा कालावधी अत्यंत कमी (२३० दिवस)

    काढणीस लागणारा कालावधी

    अत्यंत कमी (३२० दिवस)
    घड दंडगोलाकार, घट्ट, एकसारखा
    घड काढणी (टक्के) १०० टक्के
    काढणी निर्देशांक (टक्के) ५७.५३
    उत्पादन निर्देशांक ६.८९
    केळ फळ मोठा आकार, अधिक गर ५७.०३ टक्के
    विपरीत हवामान स्थितीस प्रतिकारक क्षमता झाडे उन्मळून पडण्यास, खोड मोडण्यास व घड सटकण्यास प्रतिकारक
    रोग सिगाटोका, करपा रोगास सहनशील

    संपर्क - प्रा.एन.बी.शेख, ८३२९४५८१७८ (प्रा. एन. बी. शेख अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (केळी), जळगाव येथे कार्यरत आहेत. डॉ. शरद गडाख हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com