रसायनांच्या देशातील सेंद्रिय शेती

शेतीमालाच्या निर्यातीमध्ये आघाडीवर असलेल्या थायलंडमध्ये रसायनांचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा रुजवात झाली असली, तरी त्याला अद्याप मोठा पल्ला गाठायचा. शेतीच्या समस्या सर्वत्र सारख्याच आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये म्हातारे राबतानाच शेतातून तरुण गायब झालेत.
रसायनांच्या देशातील सेंद्रिय शेती
रसायनांच्या देशातील सेंद्रिय शेती
Published on: 
Updated on: 

आज जेवणात थाई करी आणि भाताचा बेत आहे. पण जेवणात म्हणावी तशी मजा येत नाहीये. गेल्या काही दिवसांत येथील रासायनिक शेतीची माहिती कळल्यापासून प्रत्येक पदार्थात रसायनं वळवळताना दिसताहेत. एवढा सुंदर देश रसायनांच्या विळख्यात अडकून ‘उडता थायलंड’ झाल्याचा भास होतोय. उत्पादकता आणि निर्यात वाढवायचं शिवधनुष्य उचलायच्या नादात भरमसाट रसायने वापरली गेली. फळे आणि भाजीपाल्यात कीटकनाशकांचे बक्कळ अंश सापडू लागले. हजारो शेतकऱ्यांना दरवर्षी विषबाधा झाल्या. मी विचार करू लागलो, रसायनांचे एवढे दुष्परिणाम दिसत असताना हे लोक काहीच का करत नाहीत? या रासायनिक सापळ्यापासून वाचण्यासाठी हा देश पावलं का उचलत नाही, अशा प्रश्‍नांचा किडा डोक्यात भुणभुण करू लागला. डोक्यातल्या या किड्याला शांत करण्याशिवाय गत्यंतर नव्हती. थायलंडमध्ये शेतीव्यवसाय हा देशाचा कणा आहे. बहुतांश जनता उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. शेतीला वातावरणाची साथ असल्यामुळे शेतीमाल निर्यातदारांमध्ये पहिल्या दहात थायलंड आहे. तशी सेंद्रिय शेती थायलंडला नवीन नाही. १९८० पासून सेंद्रिय शेतीची चळवळ थायलंडमध्ये सुरू झाली. १९८९ मध्येच इथं ‘पर्यायी शेती गट’ स्थापन झाला. त्यानंतर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय, आर्थिक, राजनैतिक संक्रमणातून ही पर्यावरणपूरक शेती गेली. मात्र ही लोकसहभागातून निर्माण झालेली, शेतकरी आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येत चालवलेली मोहीम होती. या संस्थांनीच सेंद्रिय जनजागृतीचा काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला येथील सेंद्रिय शेतीला सरकारचा अजिबात पाठिंबा नव्हता, पण नंतर त्यांना उपरती आली. १९९० मध्ये सरकारने सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था स्थापन करून यात उडी घेतली. पुढे अजून संशोधन करत सेंद्रिय मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन, फळभाज्या, तृणधान्य आणि डाळी यांच्यासाठी नियमावली आणि कायदे बनवले. अजून एक पाऊल पुढे जात १९९७ ते २००८ दरम्यानच्या सातव्या विकास योजनेत सेंद्रिय शेतीला स्थान दिलं. थायलंडमध्ये हळूहळू सेंद्रिय पिकाच्या लागवडीखालील शेती वाढत गेली. २०१३ पर्यंत ९२१८ शेतकऱ्यांनी प्रमाणित सेंद्रिय शेती ८३ हजार एकरांवर नेली. इथं दोन प्रकारचे सेंद्रिय उत्पादक सापडतात. पहिले, ‘‘साहेब आम्ही रासायनिक खताचा एक दाणा बी टाकत नाही शेतात’’, असं म्हणणारे स्वयंघोषित सेंद्रिय शेतकरी. पण या स्वयंघोषित सेंद्रिय मालावर ग्राहक सहजासहजी विश्‍वास ठेवत नाही. स्वतःच अंपायर आणि स्वतःच खेळाडू, अशा डबलरोलवाल्या सामन्याच्या निकालावर कोण विश्‍वास ठेवणार? दुसऱ्या प्रकारात आपल्या पिकाचं व्यवस्थित प्रमाणीकरण करून घेणारे, देशपरदेशात सेंद्रिय माल विकणारे उद्योजक शेतकरी आहेत. ते कायद्याची शिस्त पाळत ‘आमचं प्रॉडक्ट सेंद्रिय आहे’ असं पॅकेटवर छापत उजळ माथ्याने बाजारात विकतात. आता तुम्ही विचाराल ‘इथले सेंद्रिय शेतकरी पिकं तरी कोणती घेतात?’ तर सर्वांत जास्त म्हणजे ४९ हजार एकरांवर भाताचं साम्राज्य आहे. त्यानंतर इतर पिकांचा नंबर लागतो. या व्यवसायात लहान शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. जास्त करून वयस्कर शेतकरी शेतात राबताना दिसतो. डोक्यातल्या शहरी हवेने तरुण पोरांना शहराकडे उडवून नेलंय. सेंद्रिय शेतीला सुवर्णकाळ येण्यासाठी तिचं हवं तसं मार्केटिंग व्हायला हवं. मार्केटिंग आणि अर्थशास्त्र या दोन विषयात शेतकरी कायम कच्चा आहे. हे विषय नेहमी ऑप्शनला टाकलेले असतात. हे हेरून थायलंडमधील काही कंपन्या पुढे आल्या. त्यांनी लहान लहान शेतकऱ्यांना एकत्र आणत गटशेती सुरू केली. शेतकऱ्यांबरोबर करार करून सेंद्रिय मार्केट विकसित करायला सुरुवात केलीय. शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच ग्राहक जागृतीचं कामही ते करताहेत. देशभर सेंद्रिय उत्पादने वितरित करण्यासाठी यंत्रणा उभी केलीय. सेंद्रिय चहा कॉफीचं मार्केटही वाढतंय. सोशल मीडियामुळे सेंद्रिय ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होतेय. त्यांनी घेतलेल्या मेहनतीत रंग भरतोय. पाकीट किंवा बाटलीबंद सेंद्रिय अन्नपदार्थ आणि पेय यांची ८.६ टक्के वाढ २०१९ मध्ये नोंदवली गेली. रुपयात मोजायची झाल्यास ती दीडशे कोटी एवढी भरते. थायलंडच्या लोकांमध्ये सेंद्रिय सजगता वाढलीय, याची ही पावती. खास करून लहान मुले, आजारी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी सेंद्रिय खाद्यपदार्थाची मागणी वाढतेय. कमी झालेला जन्मदर आणि पालकांच्या वेळेच्या मर्यादा, यामुळे मुलांना जास्तीत जास्त सकस आहार देण्याची विचारधारा मूळ धरतेय. हे सेंद्रिय अन्नाच्या पथ्यावर पडलंय. लहान मुलांच्या सेंद्रिय अन्न पदार्थातील वाढ तब्बल १२ टक्के एवढी आहे. म्हणजे आपल्या बाळाला रसायनविरहित अन्न खाऊ घालण्याकडे थाई मातांचा कल वाढतोय तर! इथली सेंद्रिय अन्नपदार्थांची स्थानिक बाजारपेठ २०२४ पर्यंत पूर्णपणे विकसित होईल, असा विश्‍वास आहे. असेंद्रिय पेयात साखर आणि ते टिकवण्यासाठी वापरलेल्या रसायनांमुळे लोकांमध्ये सेंद्रिय ओढ निर्माण झाली खरी, पण त्यात म्हणावी तेवढी वाढ दिसत नाही. सेंद्रिय कॉफीच्या विक्रीत अंमळ एका टक्क्याची वाढ नोंदवली गेली खरी, पण त्याचबरोबर तिच्या किमतीतही घट झाली. सेंद्रिय पदार्थाचा खप वाढवण्यासाठी सध्या काही मर्यादा आहेत. पारंपरिक उत्पादनापेक्षा जास्त किंमत ही सेंद्रिय उत्पादनाची सर्वांत मोठी मर्यादा आहे. त्यावरही इथं काम होतंय. किमती कमी कशा होतील, यासाठी प्रयत्न केले जाताहेत. सेंद्रिय अन्नाची चैन फक्त श्रीमंत लोकांना परवडणारी आहे, ही धारणा बदलण्यासाठी ते झटताहेत. निर्यातविद्येच्या धंद्यात पारंगत असलेल्या थायलंडने सेंद्रिय मालाच्या निर्यातीला देखील सुरुवात केलीय. युरोप आणि अमेरिकेत भात, डाळी, फळभाज्या, कोळंबी, मासे, हर्बल चहा, पामतेल यांसारखे सेंद्रिय पदार्थ निर्यात होतेय. परंपरागत पिकाच्या मानाने ही आकडेवारी अगदीच किरकोळ आहे, पण सुरुवात तर झालीय. सेंद्रिय निर्यातीचं हे बाळ सध्या रांगतंय, पण लवकरच ते दुडक्या चालीने का असेना पळायला सुरुवात होईल अशी आशा करूया. थायलंडमध्ये फक्त रासायनिक शेतीचाच बोलबाला नाहीये हे समजल्यावर बरं वाटलं. रसायनांच्या चिखलात सेंद्रिय कमळ फुलायला सुरुवात झालीय हे पाहून सुखावलो. प्रश्‍नांचे भुंगे अजून शांत झालेले नाहीयेत. सेंद्रिय शेतीच्या दिंडीत लहान शेतकरीच का दिसतात? मोठे शेतकरी कुठायेत? जास्त करून वयस्कर लोकच शेती करताना का दिसतात? शेती व्यवसायातील तरुण कुठे गायब झालाय? अशा अनेक नवीन प्रश्‍नांच्या भुंग्यांची भुणभुण मागे लागली. मी एक्सलरेटर पिळत बाइक पिटाळत भुंग्यांना मागे टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागलो. इतके दिवस या पृथ्वीवरील स्वर्गात बाइकिंगचा आनंद लुटतोय. थायलंडमध्ये मी आणि माझ्या बाइकने बरेच दिवस घालवलेत. इथले सामिष-आमिष पदार्थ चाखलेत. इथल्या सुंदर निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेतलाय. आकाशाचे रंग शोषून घेणाऱ्या निळ्याशार समुद्रापासून ते डोंगरदऱ्यांच्या मायाळू हिरव्या दुलईपर्यंत, निसर्गाविष्कार अनुभवलेत. पण थायलंडमधला प्रवास आता संपत आलाय. या सुंदर देशाचा निरोप घेणं जिवावर आलंय. जड पावलाने या सौंदर्याला निरोप दिला आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या कंबोडियाकडे बाइकचं तोंड वळवलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.