जाणून घ्या बियाण्यांचे प्रकार

वापरात येणारे सर्व बियाणे हे मागील वर्षी तयार केलेले असते. त्याची साठवणूक योग्य पद्धतीने केलेली नसल्यास बियांची उगवणक्षमताही कमी होते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शुद्ध बियाण्यांचे प्रकार व साठवण्याची पद्धती शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.
 seeds
seeds
Published on
Updated on

वापरात येणारे सर्व बियाणे हे मागील वर्षी तयार केलेले असते. त्याची साठवणूक योग्य पद्धतीने केलेली नसल्यास बियांची उगवणक्षमताही कमी होते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शुद्ध बियाण्यांचे प्रकार व साठवण्याची पद्धती शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.  आपल्याकडे ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे संतवचन आहे. शेतीसाठी शुद्ध बीज अत्यंत महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांची चांगल्या वाणाचे शुद्ध बियाणे मिळवण्याची नेहमीच धडपड असते. हंगामाच्या सुरुवातीला नेहमीच बियाण्यांची मागणी वाढत असल्याने भेसळ, कमी आनुवंशिकता शुद्धता असलेल्या व कमी दर्जाच्या बियाण्यांना पेव फुटते. क्वचित फसवणूकही होते. वापरात येणारे सर्व बियाणे हे मागील वर्षी तयार केलेले असते. त्याची साठवणूक योग्य पद्धतीने केलेली नसल्यास बियांची उगवणक्षमताही कमी होते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शुद्ध बियाण्यांचे प्रकार व साठवण्याची पद्धती शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.  बीज पैदास प्रक्रिया  पैदास प्रक्रियेतून पिकांच्या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जाती विकसित केल्या जातात. अशा सुधारित जातीपासून बीजनिर्मिती करतात व त्याची तपासणी करून गुणन केले जाते. हे बीज पुढे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होते. स्वपरागीत पिकांचे सुधारित बियाणे शेतकरी २ ते ३ वर्षे पुन्हा पुन्हा वापरू शकतो. संश्लेषित व संयुक्त वाणांचे बियाणे २ वर्षे, तर संकरित वाणांचे बियाणे फक्त एकदाच वापरता येते. असे असले तरी कोणतेही धान्य, घरगुती उत्पादन बियाणे वापरता येईलच असे नाही. कारण बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व उत्पादनक्षमता, बियाण्यांची उगवणशक्ती, अन्य गुणधर्म यांची खात्री देता येत नाही.  दर हंगामात सुधारित वाणांच्या शुद्ध बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी प्रमाणित बियाणे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तयार करावे लागते. बियाण्याची ही गरज भागवण्यासाठी देशातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था नवीन वाणांची निर्मिती, त्यांच्या उत्पादनक्षमतेच्या व व्यापारी गुणधर्माच्या चाचण्या दरवर्षी सतत घेत असतात. देशातील राष्ट्रीय बियाणे महामंडळ, राज्यातील बियाणे महामंडळे तसेच अनेक बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्या, सहकारी संस्था व शेतकरी बियाणे निर्मितीच्या कामात सहभागी होतात. राज्यातील बीज प्रमाणीकरण यंत्रणा लागवड, उत्पादन व प्रक्रिया या काळात बियाण्यांच्या शुद्धतेची व दर्जाची देखरेख करून काळजी घेते. बियाणे चाचणी प्रयोगशाळा उगवणशक्ती व शुद्धतेची तपासणी करतात. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर बियाणे विक्रीसाठी योग्य ठरते. अशा बियाण्यांचा दर्जा व गुणवत्ता शेतकरी बियाणे खरेदी करेपर्यंत व नंतरही बियाण्याच्या लेबलवर लिहिल्याप्रमाणे आहे, याची तपासणी राज्यातील बियाणे गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा सातत्याने करते. बियाण्याच्या बॅगवरील खूणचिट्ठी  अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतीच्या कमीत कमी मूल्याच्या दर्जा दाखवणारी माहिती टॅग असणे आवश्यक आहे. बियाणे प्रकारानुसार योग्य त्या रंगाचा प्रमाणित  टॅग असावा. उदा. पायाभूत बियाण्यासाठी पांढरा, प्रमाणित बियाण्यासाठी निळा, मूलभूत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाचा, तर सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. त्यावर खालील माहिती असावी. १) पिकाचे नाव, २) जाती आणि प्रकार, ३) गट क्रमांक, ४) बीज परीक्षणाची तारीख, ५) उगवणशक्ती (टक्के), ६)  शुद्धतेचे प्रमाण, ७) पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन, ८) बियाण्याचा वर्ग, ९) बियाण्याचा सार्थ कालावधी, १०)  विक्रेत्याचे नाव आणि पत्ता, ११) बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची सही आणि हुद्दा इ. याशिवाय बियाण्यास कीड किंवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. कीडनाशकाची नावे ठळक अक्षरात आणि माणसे, जनावरे, पक्षी यांच्या खाण्यास अयोग्य असा खुलासा त्यात असला पाहिजे. बियाण्याचे प्रकार  पीक पैदासकारांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचविण्यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यांत घेतले जाते.  १) मूलभूत बियाणे (न्युक्लिअस सीड), २) पैदासकार बीजोत्पादन, ३) पायाभूत बीजोत्पादन,  ४) प्रमाणित बीजोत्पादन,  ५) सत्यप्रत बीजोत्पादन असे टप्पे आहेत. यालाच बियाण्याचे प्रकार असेही म्हणतात. अ) मूलभूत बियाणे (न्यूक्लिअस सीड)  पैदासकार बियाण्यांची लागवड करून मिळवलेल्या बियाण्यास मूलभूत बियाणे असे म्हणतात. त्याचे उत्पादन संशोधन केंद्रावर व कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर देखरेखीखाली केले जाते. पिकांची पाहणी करून भेसळीची रोपे काढून टाकली जातात. नंतर या पिकाची कापणी करून मिळणारे बियाणे पायाभूत बियाणेनिर्मितीसाठी वापरले जाते. अशा बियाण्यासाठी शक्यतो कुठल्याही प्रकारचे लेबल दिले जात नाहीत. ब) पैदासकार बियाणे (Breeder seed)  पीक पैदासकाराने नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली पैदासकार बीजोत्पादन घेतले जाते, यामुळे बियाण्यात कोणत्याही प्रकारची आनुवंशिक अथवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. पैदासकार बियाण्याची शुद्धता १०० टक्के असते. पैदासकार बीजोत्पादन कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था या ठिकाणीच घेतले जाते. मूलभूत बिजोत्पादन प्रक्षेत्राचे परीक्षण हे त्या पीक पैदासकाराकडूनच केले जाते. पैदासकार बियाणे प्रक्रिया करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खुणचिठ्ठी (टॅग) लावतात.  या टॅगवर बियाण्याची उगवणक्षमता, भौतिक शुद्धता, बियाणे उत्पादनाचा हंगाम / वर्ष याबद्दल माहिती दिलेली असते. तसेच रोप पैदासकाराची सही असते. पैदासकार बियाणे हे पायाभूत बीजोत्पादनासाठी वापरतात. क) पायाभूत बियाणे (Foundation seed)  पायाभूत बियाणे हे पैदासकार बियाण्यापासून तयार केले जाते. पायाभूत बीजोत्पादन करताना बीजोत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिले जाते. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्याने कृषी विद्यापीठ अथवा सहकारी प्रक्षेत्रावर अथवा बियाणे महामंडळातर्फे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर घेतले जाते. पायाभूत बीजोत्पादनाची पाहणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेने गठित केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केली जाते. यामध्ये कृषी विद्यापीठाचे पीक पैदासकार, बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी यांचा समावेश असतो. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात. यावर बियाण्याची उगवणक्षमता, आनुवंशिक शुद्धता, शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते.  ड) प्रमाणित बियाणे (Certified seed) प्रमाणित बियाणे हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार आनुवंशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. या प्रकारचे बिजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणे प्रमाणित करून घ्यावे लागते. यासाठी पेरणीनंतर १५ दिवसाच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करणे आवश्यक असते. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणारे बियाणे, विलगीकरण अंतर, भेसळ काढणे या गोष्टींचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते. प्रक्रिया करून तयार झालेल्या प्रमाणित या बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात. यावर बियाण्याची आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, उगवणक्षमता, तपासणी तारीख इ. माहिती दिलेली असते. यावर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांची सही असते. इ) सत्यप्रत बियाणे (Truthful seed) सत्यप्रत बियाण्याची आनुवंशिक शुद्धता, उगवणक्षमता, भौतिक शुद्धता प्रमाणित बियाण्याइतकीच असते. याचे उत्पादनही प्रमाणित बियाण्यासाठी असलेल्या प्रमाणके, मापदंडाप्रमाणे केले जाते. मात्र त्याची पाहणी ही बीजप्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानेच घ्यावयाची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात. यावरसुद्धा इतर बियाण्याप्रमाणे माहिती दिलेली असते. -  डॉ. मयूर गाडेकर,  ७५८८६१७९६३ (सहाय्यक प्राध्यापक, कर्मयोगी दु. सी. पाटील  कृषी महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com