तंत्र हळद लागवडीचे...

हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
पाटपाणी सिंचनासाठी हळद लागवडीची सरी वरंबा पद्धती फायदेशीर ठरते.
पाटपाणी सिंचनासाठी हळद लागवडीची सरी वरंबा पद्धती फायदेशीर ठरते.
Published on
Updated on

हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व स्वच्छ प्रकाशात पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही काळ सहन करू शकते. मात्र जास्त दिवस पिकांत पाणी साचून राहणे हानिकारक आहे. सरासरी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान पिकांस मानवते. उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस, फुटवे फुटण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस, कंद वाढीसाठी २० ते २५ अंश सेल्सिअस, तर कंद चांगले पोसण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. जमीन 

  • मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते.
  • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. खोली सर्वसाधारणपणे २० ते २५ सेंमी असावी.
  • भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्त जमिनी या पिकांस मानवत नाहीत. अशा जमिनीमध्ये पिकाच्या पाल्याची वाढ जास्त होते. परंतु कंद योग्य प्रमाणात पोसत नाहीत.
  • हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणत: एक फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे लागवडीपूर्वी १ फूट खोलीवरील माती परीक्षण करावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीत हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो. पिकाची वाढ समाधानकारक होत नाही.
  • जाती  फुले स्वरूपा, सेलम, राजापुरी, कृष्णा, टेकुरपेटा, वायगांव, आंबे हळद, सुवर्णा, सुगुणा, सुदर्शना, आयआयएसआर प्रभा, आयआयएसआर प्रतिभा, आयआयएसआर केदारम. बेणेप्रक्रिया  रासायनिक बीजप्रक्रिया  निवडलेले गड्डे बियाणे क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि अधिक कार्बेन्डाझीम (५० टक्के पाण्यात विरघळणारे) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. तयार द्रावणात बेणे १५ ते २० मिनिटे बुडवावेत. जैविक बेणेप्रक्रिया 

  • ही बेणेप्रक्रिया प्रामुख्याने लागवड करतेवेळी करावी.
  • रासायनिक बेणेप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीमध्ये २ ते ३ दिवस सुकवून नंतरच जैविक बेणेप्रक्रिया करावी. रासायनिक बेणेप्रक्रियेआधी जैविक बेणेप्रक्रिया करू नये.
  • ॲझोस्पिरीलियम १० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) १० ग्रॅम अधिक व्हॅम २५ ग्रॅम याची प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे.
  • ( टीप :  ॲग्रेस्को शिफारस आहे.) लागवड पद्धती  सरी-वरंबा पद्धत 

  • पाटाने पाणी द्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते.
  • या पद्धतीत ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सरी पाडून घ्याव्यात. सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत मिसळावे. कारण स्फुरद आणि पालाश खते जमिनीत दिल्यावर पिकांना लगेच उपलब्ध होत नाहीत.
  • जमिनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ही जमिनीची लांबी आणि उताराचा अंदाज घेऊन ५ ते ६ मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
  • रुंद वरंबा पद्धत 

  • आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक, तुषार सिंचन) उपलब्ध असल्यास या पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते.
  • या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात, परिणामी उत्पादनात वाढ होते.
  • रुंद वरंबा तयार करण्यासाठी १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून ६० ते ७५ सेंमी माथा असलेले २० ते ३० सेंमी उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी रुंदीचे वरंबे (गादीवाफे) पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा. त्यानंतर ३० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. एका गादीवाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात.
  • या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते.
  • लागवड हंगाम व बियाणे 

  • लागवड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीस उशीर झाल्यास उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
  • हळदी लागवडीच्या दृष्टीने बियाण्याची निवड ही खूप महत्त्वाची आहे. एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंत वापरता येते.
  • लागवडीसाठी हेक्टरी २५ क्विंटल जेठे गड्डे (मातृकंद) लागतात.
  • लागवडीसाठी सशक्त, निरोगी, जाड मातृकंद (गड्डा) बेणे म्हणून निवडावेत. निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. आकाराने त्रिकोणाकृती असावे.
  • गड्डे ५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे, सशक्त, निरोगी, रसरशीत नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत. गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये.
  • जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील तर बगल गड्डे (४०-५० ग्रॅम वजन) किंवा हळकुंडे (३० ग्रॅमपेक्षा जास्त) बेणे म्हणून वापरावे.
  • निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची (भेसळमुक्त) असावीत.
  • लागवड तंत्र 

  • सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या दोन्ही बाजूंस ३० सेंमी अंतरावर गड्डे कुदळीने आगऱ्या घेऊन लावावेत. किंवा
  • वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सेंमी खोल दाबून घ्यावेत. पाण्यात लागवड करताना गड्डे खोलवर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • गड्डे खोल लावले गेले तर उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असते. रुंद वरंबा पद्धतीने ३० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • लागवडीपासून २१ ते २६ दिवसांत संपूर्ण उगवण होते.
  • सरी वरंबा पद्धतीत सरीच्या दोन्ही बाजूंस ३७.५० बाय ३० सेंमी अंतरावर वरंब्यामध्ये लागवड करावी.
  • रुंद वरंबा पद्धतीत ३० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • खत व्यवस्थापन 

  • लागवडीपूर्वी हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
  • पिकास हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे. स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा तसेच १० किलो हिराकस लागवडीच्यावेळी द्यावे.
  • नत्राची मात्रा २ समान हप्त्यात विभागून द्यावी. नत्राचा पहिला हप्ता (१०० किलो नत्र) लागवडीनंतर ४५ दिवसांनी तर उरलेली मात्रा (१०० किलो) भरणीच्यावेळी (लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी) द्यावी.
  • पाणी व्यवस्थापन 

  • लागवडीच्या सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पिकास पाण्याची गरज जास्त असते.
  • सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची आवश्‍यकता असते. याकाळात मुळांकडून स्थिरता प्राप्त होत असल्याने हा कालावधी महत्त्वाचा असतो. म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे.
  • पिकाची एकूण पाण्याची गरज १५० ते १६५ सेंमी इतकी असते.
  • रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतींचा उपयोग करावा.
  • तण नियंत्रण 

  • लागवडीनंतर जमीन ओलसर असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारावे.
  • फवारणी करताना उलट दिशेने चालावे.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी हळद बियाणे (गड्डे) उघडे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
  • तणनाशक फवारणीनंतर २० ते २५ दिवस कोणत्याही आंतरपिकाची लागवड करू नये.
  • हळदीची उगवण १५ दिवसांनी सुरू होते. त्यानंतर कोणतेही तणनाशक वापरू नये.
  • - डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४ (०२३३) २४३७२७४ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com