
Agricultural Planning : भौगोलिक माहिती प्रणालीचा पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे फायदा होतो, हे आपण पाहत आहोत. मागील भागामध्ये नाला वर्गीकरणाची माहिती घेतली. त्यानंतर एखाद्या निवडलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी सर्वसाधारण गावाची सीमारेषा, गावातील जमिनीचे उतारानुसार वर्गीकरण,
भूमी उपयोगिता वर्गीकरण, भूमी वापर, मातीची खोली, मातीचा प्रकार, जमिनीची धूप, भूगर्भाची सद्यःस्थिती इ. प्रकारची माहिती जल व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची ठरते. याबाबत उदाहरण म्हणून २५१४ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) या गावातील या घटकाची माहिती व नकाशे पाहू.
उताराचे नकाशे
तडसर गावाच्या एकूण भौगोलिक २५१४ हे. क्षेत्रापैकी केवळ २१ हेक्टर (म्हणजेच १टक्के) जमिनीचा उतार हा ० ते १ टक्के या वर्गवारीत येतो. ६७४ हेक्टर (२७टक्के) क्षेत्राचा उतार हा १ ते ३ टक्के वर्गवारीत येतो. सर्वाधिक ११०४ हेक्टर (४४टक्के) क्षेत्राचा उतार तीन ते पाच टक्के या दरम्यान आहे. (अधिक माहितीसाठी तक्ता क्र. १) या माहितीवरून तडसर मधील जमिनीचा उतार एकसंध नसल्याचे लक्षात येते.
जल व मृदा संधारणासाठी जमिनीची बांध-बंदिस्ती आवश्यक आहे. येथील १५ ते ३५ टक्के उतार असणाऱ्या ३६१ हेक्टर क्षेत्रावर जंगल निर्मितीसाठी खूप मोठा वाव आहे. या ठिकाणी वन निर्मिती केल्यास त्यातून अडला जाणारा अपधाव येथील ओढ्यांना दीर्घकालीन पाणीपुरवठा करू शकतो. राज्यातील अन्य गावांचे अशा प्रकारचे
नकाशे सहजपणे तालुकास्तरीय कृषी कार्यालयामध्ये उपलब्ध असून, त्यांचा वापर गावकरी जल नियोजनासाठी करता येतो. मात्र त्याबाबत गावकऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणीच न झाल्यामुळे अडचणी आहेत.
भूमी क्षमता वर्गीकरण
पाणलोट क्षेत्र विकासाच्या प्रक्रियेत काही प्रात्यक्षिकांद्वारे आपण मातीशी निगडित प्रयोग करून भूमी क्षमता वर्गीकरण ( Land Capability Classification) करता येते. शक्यतो ही प्रात्यक्षिके मार्च महिन्यात कोणतेही पीक अस्तित्वात नसलेल्या शेतामध्ये शास्त्रीय नियमावलीनुसार करावी लागतात.
देशामध्ये भूमी क्षमता वर्गीकरण वर्ग एक ते आठ या दरम्यान केले जाते. देशामध्ये वर्ग एकच्या जमिनी अत्यल्प असून, त्यात प्रामुख्याने गंगा नदीच्या सपाटीच्या प्रदेशाचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व ठिकाणी वर्ग दोन किंवा वर्ग तीन या वर्गवारीतील जमिनीचा वापर आपण शेतीसाठी करतो. भूमी क्षमता वर्गीकरणाबाबत जाणून घेण्यासाठी पुन्हा तडसर गावाचे उदाहरण घेऊ.
तडसर गावाच्या एकूण २५१४ हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ९१६ हेक्टर (३६ टक्के ) जमीन ही भूमी क्षमता वर्गीकरण तीन मध्ये आहे. अशा जमिनीची जलधारण क्षमता नैसर्गिकरीत्या अत्यल्प असते. या ठिकाणी अस्तित्वात असणारे मातीचे प्रकार हे दगड मिश्रित, अत्यल्प सेंद्रिय कर्ब, कमी ओलाव्याच्या व अत्यंत कमी उत्पादक आहेत. याचबरोबर ७६४ हेक्टर जमीन (३० टक्के) वर्ग सहा या प्रकारातील असून, हे क्षेत्र शेतीसाठी वापरल्यास फारशी उत्पादकता मिळणार नाही. मात्र अशी जमीन वनशेती किंवा फळबाग शेतीसाठी काहीशी फायदेशीर ठरते.
वरील दोन्ही प्रकारातील जमिनीवरून मोठ्या प्रमाणात मातीची धूप होत असल्याबाबतचे संकेतांक (es) तक्ता क्र. दोन मध्ये दिलेले आहेत. तडसरमधील ३०६ हेक्टर (१२ टक्के) क्षेत्र वर्ग दोन मधील असून, दोन प्रकारांमध्ये विभागलेले आहे. यातील जवळपास १७३ हेक्टर क्षेत्रामध्ये पिकांच्या मुळांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. तर उर्वरित १३३ हेक्टर क्षेत्रावरील जमीन पिकांच्या मुळांच्या वाढीबरोबर धुपेने प्रभावित असल्याचे नकाशा दर्शवितो. एकूणच तडसर या गावी भूमीक्षमता वर्गीकरणाचा अभ्यास करून या पाणलोटामध्ये योग्य पद्धतीने उपचार राबविल्यास येथील जमिनी उत्पादक बनू शकतील.
नकाशा २ मध्ये दिसणाऱ्या तडसर या गावातील भूमी क्षमता वर्गीकरणांनुसार, एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २१७४ हेक्टर (८६ टक्के) जमीन ही वर्ग ३, वर्ग ६ व वर्ग ७ या क्षमता वर्गवारीतील असून, ती नकाशा क्र. दोनमध्ये पिवळा व तांबडा रंगाने दर्शविलेली आहे. ही बहुतांश जमीन उत्पादक बनविण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाणलोटाचे योग्य ते क्षेत्रोपचार करावे लागतील.
सद्यःस्थितीत गावामध्ये उपलब्ध सिंचनामुळे ऊस लागवड अधिक आहे. मात्र, ऊस उत्पादकता सरासरी ४० ते ५० टनापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ऊस या पिकासाठी अमर्यादित पाण्याचा वापर केला जात आहे. पाणलोट क्षेत्राचे सर्व उपचार पूर्ण होऊन मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला होता.
मात्र उसासारखे नगदी पीक वाढून, त्यासाठी होत असलेल्या अमर्याद पाणी वापरामुळे पुन्हा पाणीटंचाईची स्थिती उद्भवू लागली आहे. जमिनीच्या क्षमता वर्गवारीनुसार, पीक पद्धती ठरवून, त्यात सातत्य राखल्यास शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित पुरून उत्पादनातही बऱ्यापैकी शाश्वत वाढ मिळू शकेल. अन्यथा पाणलोटाच्या कामांचे फायदे हे तत्कालीन व कमी काळापुरतेच मिळतील.
तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध असलेल्या नकाश्यांचा व उपग्रहाद्वारे प्राप्त भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर केल्यास आपल्याला गावातील जमिनीचे उतार, भूमी क्षमता यांची माहिती मिळू शकते. राज्यातील प्रत्येक गावाने त्या बाबत पुढाकार घेऊन पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन केल्यास आपल्या क्षेत्रातील जमिनीची पीक क्षमता वृद्धी हे उद्दिष्ट गाठता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.