डॉ.आर.बी.अंबादे, डॉ.पी.पी.घोरपडे, डॉ.एच.वाय.पालमपल्ले
खनिजे हे जनावरांच्या आहारात (Mineral In Animal Diet) अजैविक घटक आहेत जे शरीरातील उत्तम वाढीसाठी आणि शारीरिक कार्ये आणि चयापचय प्रक्रियांसाठी (Digestion Process) आवश्यक असतात. शरीरात ऑस्मॉटिक प्रेशर राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे शरीरातील पाणी आणि विद्रव्यांच्या देवाणघेवाणीचे नियमन करतात. खनिजे मऊ उतीचे सौरचनात्मक घटक म्हणून कार्य करतात. शरीरातील स्नायूंच्या आकुंचनासाठी खनिज आवश्यक आहेत. जनावरांच्या आहारात या खनिजाचे उणीव असल्यास सामान्यतः जनावर कमी आहार घेणे, हाडांचा ठिसूळपणा, केसांचे खडबडीत आवरण तयार होणे , द्रव साचणे, रातांधळेपणा, मंद वाढ होणे, अतिसार, कमी गर्भधारणेचे दर, मृत जन्म होणे, अंध वासरे जन्मास येणे इत्यादी संक्रमणे दिसून येतात.
जनावरांच्या शरीर वाढीसाठी मुख्यत्वे करून कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, क्लोराईड आणि सल्फर हे आहेत. शरीर वाढीसाठी मुख्यत्वे करून क्रोमियम, कोबाल्ट,कॉपर,फ्लोरिन,आयोडीन,आयर्न, मॅगनीज, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक हे आहेत. शरीरात ऑस्मॉटिक प्रेशर राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शरीरातील पाणी आणि विद्राव्यांच्या देवाणघेवाणीचे नियमन करतात. खनिजे मऊ उतीचे सौरचनात्मक घटक म्हणून कार्य करतात. शरीरातील स्नायूंच्या आकुंचनासाठी खनिजे आवश्यक आहेत.
कॅल्शिअमचे महत्त्व :
१) पशुआहारात कॅल्शिअम दूध उत्पादन व हाडांची व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी मदत करतात, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. लहान वासरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे रिकेट्स (मुडदूस ) हा आजार होऊ शकतो. मोठ्या जनावरात या खनिजांच्या कमतरतेमुळे ऑस्टिओमलेसिआ हा आजार होतो.
२) शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी उपयुक्त ठरते.
३) मांस पेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करते. शरीरामध्ये विविध प्रकारचे विकर तयार होण्यासाठी मदत करते. स्नायूंच्या आकुंचन प्रसारणासाठी आवश्यकता असते.
फॉस्फरसचे महत्त्व :
१) दुग्धउत्पादन, शरीरातील चयापचय क्रिया आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. यांच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन चक्र अनियमित होते.
२) गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. जनावरांच्या शरीरातील ऑस्मोटिक प्रेशर आणि आम्ल-अल्कली संतुलन राखणे, ऑस्मोटिक प्रेशर राखणे, बफर क्षमता राखणे इत्यादी कार्य करते.
सोडियमचे महत्त्व:
१) मज्जासंस्था, स्नायू, रक्त कार्यांसाठी आवश्यक आहे. शरीरातील अभिसरणाच्या समतोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
पोटॅशियमचे महत्व:
१) शरीरातील सर्वात महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्सपैकी एक आहे. पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
२) शरीरातील चयापचय, स्नायूचा क्रियाकलाप आणि मज्जातंतूंच्या कार्यामध्ये अनेक कार्ये करते.
३) पाळीव प्राण्यांसाठी विशेषतः महत्त्वाचे आहे. हे खनिज संतुलित आहार प्रदान करते.
४) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार टाळण्यास मदत करते.
मॅग्नेशियमचे महत्त्व :
१) हाडे व दात मजबूत होतात. मॅग्नेशिअम हे घटक प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकांवरील क्रियेसाठी आवश्यक आहे. २) पूरक आहाराची पचनक्षमता लक्षणीयरीत्या सुधारते. गायी आणि वराहामध्ये पुनरुत्पादन सुधारते.
३) ब्रॉयलर कोंबड्यामध्ये वजन आणि अंडी उत्पादन वाढते.
क्लोराईडचे महत्त्व :
१) मीठ हे सोडियम आणि क्लोराईड या दोन महत्त्वाच्या पोषक घटकांपासून बनलेले असते.
२) शरीरातील द्रवांचे योग्य संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. शरीरातील रक्त आणि पचनास मदत करतात.
सल्फरचे महत्त्व :
१) प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकांवरील क्रियेसाठी उपयोगी आहे.
२) ‘ब' जीवनसत्त्व थायमिन आणि बायोटिन यांचा घटक म्हणून कार्य करते.
कोबाल्टचे महत्त्व :
१) हे खनिज रक्तातील हिमोग्लोबीन उत्पादन करतात. पेशी समूहाच्या रक्तछटासाठी आवश्यक असते. कोबाल्ट हे घटक बऱ्याचशा धातूजन्य औषधीमध्ये असते.
२) प्राण्यांच्या प्रजोत्पादन क्रियेसाठी महत्त्वाचे. या खनिजांच्या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये वांझपणा दिसून येतो.
क्रोमियमचे महत्त्व :
१) आहारात क्रोमियम सप्लिमेंटेशन केल्यास प्राण्यांचा वाढीव दीर्घायुष्यासह लाभ होतो.
२) शरीरातील चयापचय विकार कमी होऊन पुनरुत्पादन वाढते.
३) पशू आहारात क्रोमियम वापरल्यास तणावाचे परिणाम कमी होऊन आजाराच्या घटना कमी होतात.
लोहाचे महत्त्व :
१) आहारात लोहाचे प्रमाण योग्य ठेवल्यास जनावरांमधील बहुतेक लोह त्यांच्या हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिनमध्ये साठवले जाते.
हिमोग्लोबिन:
- लाल रक्तपेशींमधील प्रथिने जे फुफ्फुसातून संपूर्ण शरीरातील ऊतींमध्ये ऑक्सिजन वाहतूक करतात.
मायोग्लोबिन:
- स्नायूंच्या पेशींमध्ये प्रथिने जे आवश्यकतेनुसार ऑक्सिजन साठवतात आणि वितरित करतात. रक्तामध्ये लोहाची कमतरता असल्यास शरीरात रक्त कमी होणे आणि ऍनिमिया सारखे आजार उद्भवतात.
आयोडीनचे महत्त्व :
१) आयोडीन हा थायरॉईड ग्रंथीद्वारे निर्मित प्रथिनांचा एक आवश्यक घटक आहे. म्हणून थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य राखण्यासाठी आयोडीन महत्त्वाचे आहे.
२) आयोडीन तरुण प्राण्यांच्या निरोगी वाढ आणि विकासास प्रोत्साहन देते. दीर्घकाळपर्यंत आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढलेली थायरॉईड ग्रंथी (गलगंड) हा आजार होतो.
कॉपर (तांबे) चे महत्त्व :
१) कॉपर हे खनिज वापरल्यास प्रतिकारक शक्ती वाढते. अँटिऑक्सिडेंट एन्झाइम उत्पादनाव्यतिरिक्त अँटीबॉडीज आणि पांढऱ्या रक्त पेशींच्या योग्य विकासासाठी तांबे आवश्यक आहे.
२) तांब्याची कमतरता असलेल्या जनावरांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.
सेलेनियमचे महत्त्व :
१) सेलेनियम हे घटक त्यांच्या अँटी-प्रोलिफेरेटिव्ह आणि अँटी-इंफ्लॅमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. सेलेनियम रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते.
२) सेलेनियमची भूमिका जीवनसत्त्व ई आणि सल्फरयुक्त अमिनो ॲसिडद्वारे मदत केली जाते. सेलेनियमची कमतरता असल्यास जनावरांमध्ये पॅथॉलॉजिकल बदल घडून येतो, ज्यामुळे दरवर्षी मोठे आर्थिक नुकसान होते.
झिंकचे महत्त्व:
१) शुक्रजंतूंच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवांची प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी महत्त्वाचे आहे.
२) शरीरात "अ " जीवनसत्वे कार्यान्वित, वळूची प्रजनन क्षमता टिकवून ठेवणे आणि वळूकडून चांगल्या वीर्याची निर्मिती करण्यासाठी आवश्यक आहे.
खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम:
१) पशुआहारात खनिजांच्या अभावामुळे जनावरांमध्ये अनियमित कृतूचक्र व अकार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येतो.
२) क्षारांच्या कमतरतेमुळे गाई माजावर येत नाही, माज सुप्त स्वरूपात राहतो. गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होऊन गर्भपात होतो.
३) क्षारांच्या कमतरतेमुळे कालवडीच्या पहिल्या वेताचे वय वाढते. जनावरांत गर्भ धारणा झालीच तर गर्भपात होतो. किंवा अशक्त वासरू जन्माला येतो, प्रसूती सुलभ होत नाही. गाईचा भाकड काळ वाढतो. दोन सलग वितातील अंतर वाढते. उत्पादन उपयुक्त आयुष्य कमी होते.
४) नर वासरांच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ समाधानकारक होत नाही.
खनिजे मिळण्याची आवश्यकता :
जनावरांच्या खाद्यातून आणि वैरणीतून पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेली खनिजे जनावरांना खनिज मिश्रणातून पुरविणे गरजेचे असते.
खनिजे मिश्रण देण्याचे प्रमाण :
१) सर्वसाधारणपणे खुराकमध्ये १ टक्के मीठ , १ ते २ टक्के क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते.
२) दुभत्या गाई - म्हशी : ६० ते ७० ग्रॅम/जनावर/दिवस
मोठी वासरे , कालवडी आणि भाकड जनावरे ः ४० ते ५० ग्रॅम /जनावर/दिवस
लहान वासरे : २० ते २५ ग्रॅम /जनावर/दिवस
खनिज मिश्रणाचे फायदे :
१) जनावराच्या खाद्याची उपयुक्तता वाढते. खनिज मिश्रणामुळे मज्जातंतूंच्या उत्तेजिततेचे नियमन योग्य प्रमाणात होते. शुक्राणूंची गतिशीलता, ओव्याचे फलन, पेशींचे पुनरुत्पादन इत्यादी योग्य प्रमाणात होते.
२) काही खनिजे जसे कॅल्शिअम व फॉस्फरसमुळे हाडे व दातांची उत्तम वाढ होते. रक्त गोठवण्यासाठी शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करणे इत्यादीसाठी हे खनिजे उपयुक्त ठरतात.
३) वासरू आणि कालवडीची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात. गाईची प्रजोत्पादनाची कार्यक्षमता वाढते.
४) वेताचा काळ वाढून दोन वेतातील अंतर कमी होते.
५) दुग्धोउत्पादनात वृद्धी होते. प्रतिकारक शक्ती वाढते.
खनिज मिश्रण देण्याची पद्धत:
१) बाजारात उपलब्ध असलेल्या खुराकामध्ये निरनिराळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते परंतु खनिजाचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे योग्य ठरते.
२) क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.
------------------------------------------------
संपर्क ः डॉ.आर.बी.अंबादे,८३५५९४२५४६, ९१६७६८२१३४
(पशू जीवरसायनशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.