Animal Care : जनावरांच्या आजारावर औषधी उपचार

Medicinal treatment : वातावराणातील अचानक बदलांमुळे (खूप पाऊस व आर्द्रता, थंड हवा इ.) किंवा संसर्गामुळे (जिवाणू, विषाणू किंवा बुरशी) जनावरांना खोकला व सर्दी होते.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. संदीप ढेंगे, डॉ. मंगेश वैद्य

Animal Disease Control :

श्‍वसनाचे आजार:
१) वातावराणातील अचानक बदलांमुळे (खूप पाऊस व आर्द्रता, थंड हवा इ.) किंवा संसर्गामुळे (जिवाणू, विषाणू किंवा बुरशी) जनावरांना खोकला व सर्दी होते. जनावरे श्वास घेताना आवाज करतात. नाकपुडयांतून चिकट स्त्राव वाहत असतो.
उपचार ः
१) १०० ग्रॅम तुळशीचे पाने, अडुळसा पाने १०० ग्रॅम, अद्रक ५० ग्रॅम, काळी मिरी १० ग्रॅम व १०० ग्रॅम गूळ १ लिटर पाण्यात उकडून काढा तयार करावा. दिवसातून ३ वेळा २५० मिलि काढा ३ दिवस पाजावा.

पचनसंस्थेचे आजार ः
१) जनावरांनी खाल्लेले खाद्य योग्य रीतीने न पचल्यास पचन संस्थेचे आजार होतात. भूक मंदावणे, चारा न खाणे, रवंथ न करणे, कधी-कधी पोट गच्च होणे आणि मलावरोध आजार होतात.
२) पचनक्रिया सुरळीतपणे कार्यान्वित राहण्यासाठी आणि पचनक्रियेच्या विकारांना कायम प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.


उपचार ः
पाच गाई,म्हशींकरीता वनौषधी गोळयांचे घटक ः
१) काळी मिरी १० ग्रॅम, जीरा १० ग्रॅम, धने २० ग्रॅम, मेथी २० ग्रॅम, ओवा १० ग्रॅम, आले ५० ग्रॅम, लसूण ५० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, गुळवेल १०० ग्रॅम, कोरफड १०० ग्रॅम, लाल तिखट ५० ग्रॅम, विडा पाने १०, कढी पत्ता १०० ग्रॅम, तुळस पाने १०० ग्रॅम, सुका नारळ १०० ग्रॅम, गूळ १०० ग्रॅम, शेदे मीठ १०० ग्रॅम आणि खाण्याचा सोडा १०० ग्रॅम.
२) प्रथम सुके घटक दळून बारीक पूड तयार करावी. त्यानंतर ओले घटक बारीक करून त्यामध्ये गूळ व शेदे मीठ मिसळावे.
३) १०० ग्रॅम वजनाच्या लिंबू आकाराच्या गोळ्या तयार कराव्यात. गाई,म्हशींना १ गोळी, वासरे, शेळी-मेंढ्यांना अर्धी गोळी किंवा लहान जनावरांच्या वजनानुसार दर महिन्याला तोंडावाटे उपाशीपोटी द्यावी.

Animal Care
Animal Care : पावसाळ्यात जनावरांच्या आजारावर कसं नियंत्रण ठेवाल?

पोटफुगी आजार ः
१) दैनंदिन खाद्यात अचानकपणे बदल झाल्यास जसे की, कोवळे गवत, जनावर मोकाट सुटून खूप खुराक खाणे, निकृष्ट चारा इत्यादी मुळे जनावरांना पोटफुगी आजार होतो. पोट खूप फुगल्यास श्‍वास घ्यायला त्रास होतो. लगेचच योग्य उपचार न मिळाल्यास जनावरांचा मृत्यू होतो.
उपचार ः
१) प्रथम २०० मिलि एरंडी तेल २०० मिलि कोमट पाण्यात मिसळून पोटफुगीग्रस्त जनावरांना ४ तासांच्या फरकाने तोंडावाटे पाजावे.
२) १० विड्याची पाने, २० ग्रॅम आले, १० ग्रॅम लसूण, १० ग्रॅम काळी मिरी, ५० ग्रॅम सेंदे मीठ यांचे कोमट पाण्यात मिश्रण तयार करून मोठया आणि लहान जनावरांना वजनाप्रमाणे ६ तासांच्या अंतराने पाजावे.

Animal Care
Animal Care : जनावरांच्या आजारावर उपयुक्त वनौषधी

अतीसार आजार ः
१) निकृष्ट किंवा खराब, बुरशीजन्य चारा किंवा खाद्य जनावरांनी खाल्ल्यास पोटात अपचन होऊन जनावरांना हगवण लागते. हगवण ३ दिवसांपेक्षा अधिक दिवस असल्यास शरीरातील पाणी आणि इतर शारीरिक पोषके कमी होऊन जनावरे अशक्त व कमजोर होतात.
उपचार ः
१) एक ओंजळ चांगले बारीक दळलेले कोवळे डाळिंब, पेरू, कडुनिंबाची पाने, ५० ग्रॅम सुंठ पावडर आणि १०० ग्रॅम गूळ या मिश्रणाच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या तयार कराव्यात.
२) ३ गोळ्या एकावेळेस याप्रमाणे दिवसातून ३ वेळा हगवण बरी होईपर्यंत जनावरांना खायला द्यावेत. ३) जनावराच्या शरीरातील पाणी कमी झाले असल्यास पाणी, साखर व मीठ यांचे द्रावण पाजावे.


गोचीड नियंत्रण:
१) जनावरांना गोचीड ताप येतो. शारीरिक वाढ खुंटून जनावर बारीक दिसते. दुधाळ जनावरांच्या दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट होते.

उपचार ः
१) प्रत्येकी २० ग्रॅम आले, तुळस, कडुनिबांची पाने, हळद पावडर आणि सीताफळाच्या बिया एकत्रितपणे चांगली बारीक करून २५० मिलि. कडुनिबांच्या तेलात उकळावे आणि थंड झाल्यावर तयार मिश्रण जनावरांच्या शरीराला लावावे.

दुग्धज्वर किंवा कॅल्शिअमची कमतरता:
१) नुकत्याच व्यालेल्या आणि जास्त दूध देण्याऱ्या गाई-म्हशींना कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे दुग्धज्वर होतो. यावर तातडीने उपचार महत्त्वाचे आहेत.
उपचार ः
१) मातीच्या मडक्यात २० लिटर पाण्यात १ किलो चुना रात्रभर भिजत ठेवावा. २०० मिलि वरवरची चुन्याची निवळी २०० मिलि ताज्या पाण्यात मिसळून रोज जनावरांना पाजावी. दर २० दिवसांनी नवीन चुन्याचे मिश्रण तयार करावेत.

कासदाह ः
१) कासेला सूज येते, कास दुखते, दुधाचा रंग बदलतो किंवा सडातून रक्त मिश्रित दूध निघते. कासदाहावर उपचार केले नाही तर दगडासारखी कडक होते. सडातून दूध येणे कायमचे बंद होते. उपचार ः
१) प्रथम कोरफडीचे ३ पाने, ५० ग्रॅम हळद पावडर आणि १० ग्रॅम ओला चुना यांचे मलम तयार करावे.
२) कोमट पाण्याने कास धुवून मलम दिवसातून ३ वेळा कासेला ५ दिवस लावावे.
३) ५० ग्रॅम खाण्याचा सोडा आणि ४ ते ५ लिंबांचा रस २०० मिलि पाण्यात मिसळून कासदाह ग्रस्त जनावरांना पाच दिवस पाजावे.
------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. संदीप अमृत ढेंगे, ९९६०८६७५३६
(सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुशरिरक्रियाशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com