Dairy Business : इमडे यांचा दीडशे गायींचा आदर्शवत दुग्ध व्यवसाय

इमडेवाडी-सावे (जि. सोलापूर) येथील इमडे कुटुंबाने चोवीस वर्षांपूर्वी एका गायीपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज अवघ्या चार मजुरांकरवी दीडशे संकरित गायींचे आदर्श व्यवस्थापन व उल्लेखनीय अर्थकारण तयार करण्यापर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे. मुक्त गोठा, ‘काऊ मॉनिटरिंग सिस्टिम’, भ्रूण हस्तांतर तंत्र, जातिवंत वळू व अन्य नियोजनातून उच्च दूध उत्पादन क्षमता देणाऱ्या गायी गोठ्यात तयार केल्या आहेत. राज्याला आदर्श व पथदर्शक ठरणारीच ही यशकथा म्हणावी लागेल.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका भागातील दुष्काळी (Drought) भागात सावे या छोट्या गावच्या माळावर इमडेवाडी आहे. येथील इमडे कुटुंबाने संपूर्ण राज्याला आदर्श व पथदर्शक ठरावे असा दुग्ध व्यवसाय (Dairy Business) साकारला आहे. सन १९९८ मध्ये एका संकरित गायीपासून (Hybrid Cow) सुरू केलेला हा व्यवसाय तब्बल १५० गायींपर्यंत (होलस्टिन फ्रिजियन-एचएफ) पोहोचला आहे. विजय इमडे यांची १६ एकर शेती आहे. प्रत्येकी पाच एकर डाळिंब व मका आहे.

Dairy Business
Dairy Business : पूरक नव्हे तर दुग्धव्यवसाय झाला मुख्य अन शाश्‍वत

उर्वरित क्षेत्रावर गाईंचा गोठा, घर आहे. विजय यांचे वडील प्रकाशबापू हाडाचे शेतकरी आहेत, जेमतेम चौथी शिकलेले. पण दूरदृष्टी, केलेले परिश्रम, अनुभव वल कौशल्य यातून त्यांनी प्रगती केली. वयाची साठी ओलांडली तरी ते शेतात राबतात. विजय यांच्या आई सौ. सिंधूताई, पत्नी मेघाराणी, मुलगा हर्षद आणि मुलगी हर्षदा असे कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या परीने शेती व व्यवसायात हातभार लावतात. त्यामुळेच व्यवसाय वाढण्यास मदत झाली.

व्यवसायाची वाटचाल

सन १९९८ च्या सुमारास अडीच हजारांत गाय घेतली. तिने चांगले उत्पन्न मिळवून दिले. पुढे सलग सात वर्षे कालवडी दिल्या. एकेक करीत गोठ्यातील जनावरांची संख्या वाढत गेली. आज दीडशेच्या संख्येतील जवळपास सर्व जनावरे गोठ्याच पैदास झालेलीच आहेत. पूर्णपणे मुक्तसंचार पद्धतीनेच संगोपन केले जाते. तिथेच रवंथ केले जाते.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसायातून तुजारपूर गावाने साधली प्रगती

फक्त धारा काढण्यासाठी सकाळ-संध्याकाळ गायी गोठ्यात आणल्या जातात. चार मजुरांकरवी गोठ्याचे व्यवस्थापन होते. चारा-पाण्यासह यंत्राद्वारे धारा काढण्याची कामे ते करतात. सध्या ५५ गायी दूध देतात. बाकी प्रसूत होण्याच्या मार्गावर आहेत. इमडे यांच्याकडील गायी दिवसाला १५ ते सर्वाधिक २० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या आहेत. प्रतिदिन संकलन एक हजार लिटरचे आहे. वर्षभर ही सरासरी पाळली जाते.

व्यवसायाचे अर्थकारण

दिवसाला सुमारे एक हजार लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. राज्यातील एका खासगी कंपनीला त्याचा पुरवठा होतो. फॅट ४ पर्यंत, तर ‘एसएनएफ’ ८.७ ते ८.५ मिळतो. त्या हिशेबाने प्रति लिटर ३५ ते ४० रुपये दर मिळतो. महिन्याला सुमारे १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. ओला, सुका चारा, पशुखाद्य, गायींचे आरोग्य, मजुरी व अन्य खर्च धरून साडेसहा लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. अर्थात, व्यवसायातील काही घटकांच्या किमती वाढत असल्याने, दरांत चढउतार व सरकारी धोरणांचा परिणाम यामुळे नफ्याचे अर्थकारण कायम स्थिर नसते. अनेकवे ळा उत्पन्नाची आकडेवारी खालीही घसरते.

Dairy Business
Dairy Product : प्रक्रियेसाठी वापरा गुणवत्तापूर्ण दूध

शेणाच्या विक्रीतून लाखांचे उत्पन्न

मुक्त गोठ्यात जागेवरच शेण पडते. ते थोडेसे वाळल्यानंतर एके ठिकाणी संकलित केले जाते. दीडशे गायींच्या गोठ्यातून वर्षाकाठी सुमारे ७५० टनांपर्यंत शेण उपलब्ध होते. त्याची प्रति टन २००० रुपये दराने विक्री होते. त्याचा हिशेब करता केवळ कच्च्या शेणामधून वर्षाकाठी दहा लाख रुपयांहून अधिक रुपयांचे उत्पन्न हाती येते. येत्या काळात या शेणापासून गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याचे योजना आहे. त्यातून उत्पन्नात अजून काहीपटींनी भर पडू शकते.

दररोज दोन टन मुरघास

गायींची संख्या जास्त असल्याने खाद्यही मोठ्या प्रमाणात लागते. पाच एकरांत वैरणीसाठी मका घेण्यात येतो. शिवाय शेतकऱ्यांकडून मका, कडवळाची खरेदी होते. त्यासाठी ठेकेदार नेमला आहे. दरमहा किमान शंभर टनांपर्यंत मुरघास बनवावा लागतो. रोजच्या खाद्याचा विचार करता आजमितीला दिवसाला दोन टन मुरघास, ओला चारा एक टन, सुका चारा सहाशे किलो तर सुमारे चारशे ते पाचशे किलोपर्यंत पशुखाद्य लागते.

Dairy Business
Dairy Production : दुग्धप्रक्रिया उद्योगामध्ये तयार केला ब्रॅण्ड

विविध पुरस्कारांची मोहोर

प्रकाश आण विजय या इमडे पितापुत्रांनी मिळून दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रत्रानासह आदर्श व्यवस्थापन कसे असावे याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. या कामगिरीमुळेच त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा २००५ चा आदर्श गोपालक पुरस्कार मिळाला. गुरुदत्त संस्थेचा मिल्कमॅन, सूर्योदय परिवाराचा आदर्श गोपालक, या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडून उत्कृष्ट गोठा व्यवस्थापनासह माणगंगा परिवाराच्या आदर्श गोपालक यासारख्या पुरस्कारांची मोहोर त्यांच्या कामावर उमटली आहे.

‘काऊ मॉनिटरिंग सिस्टिम’

इस्राईल तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या ‘काऊ मॅानिटरिंग सिस्टिम’चा वापर केला आहे. त्यासाठीचा विशिष्ट ‘बेल्ट’ असून, तो २० गायींच्या गळ्यात बसवला आहे. ‘ॲन्टेना’ व ‘सेन्सर’ आधारे त्याचे कार्य चालते. या बेल्टमुळे गायीची संपूर्ण हालचाल टिपली जाते. त्याची जोड ‘मोबाईल’ला देता येऊन प्रत्येक हालचालींची नोंद ‘एसएमएस’द्वारे मिळू शकते. गायीने चारा किती खाल्ला, ती किती काळ रवंथ करते, आजारी आहे का, माजावर आली आहे का, दूध किती दिले, गर्भधारणेचा काळ किती महिन्यांचा आहे ही सगळी इत्थंभूत माहिती त्याद्वारे मिळते.

‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच वापर

गाईंची उत्तम पैदास व उच्च वंशावळ यासाठी भ्रूण हस्तांतर तंत्रज्ञान (एम्ब्रीओ ट्रान्स्फर टेक्नॅालॅाजी- आयव्हीएफ) या तंत्रज्ञानाचा वापर इमडे यांनी केला आहे. मानवात ज्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी पद्धतीचे तंत्रज्ञान वापरले जाते तशाच प्रकारचे हे तंत्रज्ञान आहे. यात उच्चप्रतीच्या आणि दर्जेदार वंशावळ असलेल्या जर्सी तसेच ‘एचएफ’ गायीच्या स्त्रीबीजांचे ‘डब्ल्यूडब्ल्यूएस’ वळूच्या शुक्राणूसोबत फलितीकरण केले जाते.

प्रयोगशाळेत हा भ्रूण सात दिवस वाढवून तो ऋतुचक्रनियमन केलेल्या गायीत प्रत्योरोपीत केला जातो. यात लिंगनिश्‍चित वीर्यमात्रेचा वापर केल्यास ९० टक्के कालवड होण्याची शक्यता असते. इमडे यांच्याकडील २० गायींमध्ये हा प्रयोग केला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रत्येकवेळी प्रति गाय १० ते १५ हजार रुपये खर्च येतो. हे तंत्रज्ञान ऋतुचक्रनियमन केलेल्या आणि ३०० किलो वजन असणाऱ्या गायीत वापरता येते. त्यातून दिवसाला (दर आठ तासांनी असे तीन वेळा मिळून) सर्वाधिक ५० ते ६० लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असलेल्या गायी तयार होऊ शकतात. सध्या २० पैकी १० गायी व्यायल्या आहेत.

उच्चवंशावळीचा देखणा वळू

इमडे यांच्याकडे अमेरिकन ‘ब्रीड’ असलेला वळू आहे. चार वर्षे वयाचा आणि सुमारे १३०० किलो वजनाचा हा धिप्पाड आणि देखणा वळू गोठ्यातील उच्च वंशावळीची ओळख करून देतो. इमडे यांनी बंगळूरहून सुमारे दोन लाख रुपये किमतीची गाय खरेदी केली होती. तिच्यापासून झालेला हा वळू आहे. आतापर्यंत कृत्रीम रेतनाचा प्रयोग ८० गायींमध्ये केला आहे. पैकी ६५ गायींना ६५ कालवडी, तर १५ गायींना १५ खोंड झाले. ६५ पैकी ४९ कालवडी सध्या गोठ्यात आहेत. उर्वरित विक्री झाली आहे. शेतकऱ्यांकडून कालवडींना मोठी मागणी आहे. एक महिन्याच्या कालवडीला दहा हजार रुपये, दोन महिन्यांच्या कालवडीला २० हजार रुपये या दराने विक्री होते. अनेक शेतकरी मागणीसाठी ‘वेटिंग’वर असल्याचे इमडे यांनी सांगितले. ४९ कालवडीपैकी १५ कालवडींनी पहिल्या वेताला प्रति दिन २५ ते ३२ लिटरपर्यंत दूध दिले आहे.

प्रशस्त बंगल्यावर प्रतिकृती

केवळ एका गायीपासून सुरुवात केलेल्या या व्यवसायातून इमडे कुटुंबाने कुटुंब व शेतीचे अर्थकारण उंचावले. प्रशस्त बंगला शेतात उभारला. आपल्या आयुष्याला अर्थ, बळ देणाऱ्या या गायी व व्यवसायाप्रती कृतज्ञता म्हणून बंगल्यावर गाय व दुधाच्या कॅनची भव्य प्रतिकृती साकारली आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

पहाटे चारच्या दरम्यान दुभत्या गाईंना गोठ्यात घेतले जाते.

गव्हाणीत प्रति गाय सहा किलो पशुखाद्य दिले जाते.

यंत्राद्वारे धारा काढण्यात येतात.

पशुखाद्य दिल्यानंतर दहा किलो ओला आणि पाच किलो सुका चारा दिला जातो.

धारा काढल्यानंतर गायींना मुक्त गोठ्यात सोडले जाते.

त्यानंतर गोठ्याची संपूर्ण स्वच्छता होते.

दुपारी तीन वाजता गायी पुन्हा गोठ्यात घेतल्या जातात.

त्यानंतर गव्हाणीत प्रति गाय किमान सहा किलो पशुखाद्य दिले जाते.

पुढे धारा काढल्या जातात. त्यानंतर दहा किलो ओला आणि पाच किलो सुका चारा दिला जातो.

गायी पुन्हा मुक्त गोठ्यात जातात.

गायींचे पाय घसरू नयेत यासाठी गोठ्यात रबरी मॅट अंथरल्या आहेत.

दुभत्या, खाड्या, गाभण, वासरे अशी मुक्त गोठ्यात विभागणी.

आपण दीड लाखाची गाय विकत घेतो, पण तिच्याबाबतचे ‘रेकॉर्ड’ आपल्याला माहीत असतेच असे नाही. माझे सांगणे आहे की शेतकऱ्यांनी शुध्द वंशावळ व जातिवंत गायींचे संगोपन व पैदास आपल्याच गोठ्यावर करावी. केवळ दुधावर अवलंबून न राहता त्यापासून विविध पदार्थ, मूल्यवर्धन आदींचाही प्रयत्न करावा. त्यातूनच हा व्यवसाय किफायतशीर होतो. भविष्यात शेणापासून विटांचे उत्पादन घेण्याचा विचार आहे. तसेच आमच्याकडील वळूच्या वीर्यकांड्याही माफक दरात शेतकऱ्यांना देणार आहोत. पंजाब राज्याने ज्याप्रमाणे या व्यवसायात प्रगती केली आहे तशीच ती आपल्या राज्यात होऊ शकते. आम्हाला कोरोना काळात मोठे नुकसान झाले. पण केवळ भांडवल व आर्थिक नियोजनावर आम्ही टिकून राहिलो.

विजय इमडे ८६६८९८५९६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com