Dairy Production : दुग्धप्रक्रिया उद्योगामध्ये तयार केला ब्रॅण्ड

उरुळीकांचन (ता. हवेली, जि. पुणे) येथील शारदा दादासाहेब कुंजीर यांनी कष्ट, जिद्द व विश्‍वासाच्या जोरावर दुग्धप्रक्रिया उद्योग यशस्वी केला आहे. एकेकाळी कोरडवाहू शेतीमध्ये खुरपणी, श्रमाची कामे करणाऱ्या अल्प शिक्षित शारदाताईंनी गावशिवारात दूध प्रक्रिया उद्योगाचा ‘कुंजीर प्रॉडक्ट्‍स’ हा ब्रॅण्ड नावारूपास आणला आहे. याचबरोबरीने अनेकांना प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत.
Dairy Production
Dairy ProductionAgrowon

पुणे- सोलापूर रस्त्यावरील उरुळीकांचन हे साधारणपणे तीस हजार लोकसंख्येचे गाव. या गावामध्ये साधारणपणे १७ वर्षांपूर्वी कुंजीर कुटुंबीय रोजगार (Employment) आणि मुलांच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झाले. या कुटुंबाची दैठणे खामगाव (ता. दौंड, जि. पुणे) या गावी पाच एकर कोरडवाहू शेती आहे. तेथे त्यांनी गोपालन (Cow Rearing) करून दूध प्रक्रिया उद्योग (Dairy Processing Industry) सुरू केला होता. परंतु त्यातून फारसे आर्थिक यश मिळाले नाही.

Dairy Production
Jalgaon Dairy Election : अखेर निवडणुकीचा आखाडा तापला

कोरडवाहू शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हक्काचा आर्थिक स्रोत असावा, यासाठी त्यांनी स्थलांतर केले. उरुळीकांचन येथे आल्यानंतर रोजगाराचा मोठा प्रश्‍न होता. त्यामुळे दादासाहेब कुंजीर यांनी शाळेच्या बसवर ड्रायव्हर म्हणून नोकरीस सुरुवात केली आणि शारदाताई अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून जाऊ लागल्या. परंतु स्वतःचा हक्काचा रोजगार असावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

या दरम्यान ग्रामीण भागातील महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार सक्षम बनविण्यासाठी बाएफ संस्थेकडून २००५ मध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत एक महिन्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शारदाताई या प्रशिक्षणात सहभागी झाल्या. यामध्ये त्यांनी दुधापासून विविध पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर बाएफ संस्थेतील अधिकारी सुरेश शिवतरे यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत शारदाताई यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून त्यांना प्रक्रिया उद्योगाची नवीन दिशा मिळाली.

Dairy Production
Dairy Product : प्रक्रियेसाठी असावे गुणवत्तापूर्ण दूध

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात

दूध प्रक्रिया प्रशिक्षण घेतल्यानंतर शारदाताईंनी संकल्प स्त्रीवादी सहकारी संस्था येथे तीन वर्षे दूध प्रक्रियेचे काम करून अनुभव घेतला. त्यानंतर छोट्या स्वरूपामध्ये दुग्धजन्य उत्पादने विक्रीसाठी उरुळीकांचन गावात आश्रम रोडवर छोटीशी टपरी सुरू केली. परिसरातील शेतकऱ्यांकडून त्यांनी दूध खरेदी सुरू केली. त्याच वेळी आर्थिक अडचण आल्याने दत्तात्रय गव्हाणे यांनी मोलाची मदत केली. दूध प्रक्रिया व्यवसाय करताना उधारी वाढत गेल्याने तोटा वाढत गेला. मोठी आर्थिक अडचण आल्याने त्यांना गावाकडील एक एकर शेती विकावी लागली. त्यातून काही प्रमाणात पूर्वीचे असलेले कर्ज फेडले. शिल्लक रकमेतून दुसऱ्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन मोठ्या स्वरूपात व्यवसाय करण्याचे ठरवले.

विविध उत्पादनांची निर्मिती

सुरुवातीच्या काळात शारदाताईंनी खवा तयार करण्यासाठी अतिशय छोटी यंत्रणा खरेदी केले. त्यानंतर जसा व्यवसाय वाढेल त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने विविध यंत्रांची खरेदी करून प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. पहिल्या टप्यात दूध, दही, पनीर, खवा, चक्का, लोणी, तूपनिर्मिती आणि विक्रीवर भर दिला. त्यातून बऱ्यापैकी नफा मिळत गेल्याने २०११ मध्ये पेढे, बर्फी, ड्रायफ्रूटपासून तयार होणारे पदार्थ, मिठाईनिर्मितीस सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, लस्सी, ताक निर्मितीला देखील सुरुवात केली.

योग्य गुणवत्तेमुळे हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले. यातून आर्थिक उत्पन्न समाधानकारक मिळू लागले. मागील वर्षांपासून शारदाताईंनी ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्किटे, पिझ्झा बेस ही बेकरी उत्पादने बनविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना कालावधीमध्ये दुग्ध व्यवसायाला चांगलाच आर्थिक फटका बसला. परंतु कष्टाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. याचबरोबरीने गावाकडील शेतीमध्ये विहीर पाडून बागायती पिकांच्या लागवडीस त्यांनी सुरुवात केली आहे.

दर महिन्याला प्रक्रिया उद्योगामध्ये श्रीखंड व आम्रखंड ३०० किलो, बासुंदी १०० किलो, लस्सी ३०० लिटर, दही ८०० किलो, ताक ५०० लिटर, खवा ६०० किलो एवढे उत्पादन होते. या सर्व पदार्थांची प्रति किलो ४५ रुपयांपासून ते ६०० रुपये या दराने विक्री होते. या व्यवसायातून कुंजीर यांची चांगली आर्थिक उलाढाल होत आहे. उत्पादनांची बाजारपेठेत ओळख होण्यासाठी त्यांनी ‘कुंजीर प्रॉडक्ट’ हा ब्रॅण्ड तयार केला. दुग्ध प्रक्रिया उद्योगातून कुंजीर यांनी २०० शेतकरी आणि सुमारे दोन हजार ग्राहक जोडले आहेत.

दररोज पाच हजार लिटर दुधाचे संकलन

‘कुंजीर प्रॉडक्ट’च्या उत्पादनांना दिवसेंदिवस मागणी वाढू लागल्याने शारदाताईंनी दूध खरेदी-विक्री केंद्राचा विस्तार केला. सध्या दूध संकलन केंद्रात दररोज गाईचे ३५०० लिटर आणि म्हशीचे १५०० लिटर दुधाची खरेदी होते. अतिशय पारदर्शक पद्धतीने दुधाची खरेदी-विक्री केली जाते. शेतकऱ्यांना दुधाची रक्कम दर दहा दिवसांनी बँक खात्यामध्ये जमा केली जाते. कुंजीर यांच्या डेअरी आणि बेकरी उद्योगामध्ये सुमारे पंचवीसहून अधिक स्त्री-पुरुषांना रोजगार मिळाला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पुरवठ्यातील सातत्य, उत्तम दर्जा आणि नैसर्गिक चव या बळावर `कुंजीर’ ब्रॅण्डने दुधाच्या बाजारपेठेत अल्पावधीत वेगळी ओळख तयार केली आहे.

कुटुंबाची मिळाली साथ

शारदा कुंजीर यांना पती, सासरे, मुलगा, मुलगी तसेच स्टाफ यांच्या बरोबरीने दूध उत्पादक, ग्राहक, बँक, शासकीय अधिकाऱ्यांची चांगली साथ मिळाली आहे. शारदा आणि दादा कुंजीर हे पहिल्या दिवसापासून ‘ॲग्रोवन' चे वाचक आहेत. सकाळ दैनिकाच्या एसआयएलसी या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकांना दुग्ध प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले आहे. यातून काही जणांनी प्रक्रिया उद्योगांना सुरवात केली आहे.

- शारदा कुंजीर ९४०३१३१००१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com