
डॉ. सचिन राऊत, डॉ. शरद चेपटे
भाग ः १
Animal Heat Stroke Management : उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्याने जनावरे चारा कमी खातात. दूध उत्पादनात घट, दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते, प्रजनन क्षमता कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. उन्हाळ्यात, जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन सामान्य पातळीवर ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
उष्माघातामुळे दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या घटते. वातावरणातील तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले तर दूध उत्पादनात १० ते १५ टक्के घट होते. उष्णतेच्या ताणामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान सामान्यापेक्षा ४ ते ५ अंश फॅरेनहाइटने वाढते, त्यामुळे जनावरांना शरीराचे तापमान सामान्य राखण्यात खूप अडचणी येतात. शरीराचे तापमान वाढल्याने जनावरे चारा कमी खातात, दूध उत्पादनात घट, दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते, प्रजनन क्षमता कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. उन्हाळ्यात, जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन सामान्य पातळीवर ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
१) उष्ण वाऱ्यामुळे जनावरे आजारी पडतात. उष्माघाताने त्रस्त असलेल्या जनावरांना निर्जलीकरणाचा त्रास होतो. यापासून रक्षण करण्यासाठी, जनावरांना शिरेवाटे ग्लुकोज द्यावे लागते, ताप कमी करण्यासाठी इंजेक्शन आणि नाकातून होणाऱ्या रक्तस्रावावर उपचार करावेत.
२) उन्हाळ्यात जनावरांना भूक कमी आणि तहान जास्त लागत असल्याने त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. पशुपालकांनी त्यांच्या जनावरांना दिवसातून किमान तीन वेळा पाणी द्यावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय जनावराला थोडे मीठ मिसळून पाणी द्यावे. उष्णतेच्या ताणामुळे दुग्धजन्य जनावरांच्या दुग्धोत्पादनात घट होणे, वेळेवर माज न येणे, मुका माज दिसणे आणि गर्भधारणा न होणे या गोष्टी दिसतात.
३) तापमान वाढत राहिल्यास मुका माज, गर्भधारणा होण्याचे कमी प्रमाण आणि जनावरांच्या प्रजनन क्षमतेत घट होते. हवामान बदलामुळे जनावरांचे आजार वाढतात. जनावरांच्या गोठ्यात वातावरणानुसार बदल करून, गोठ्यात व छतावर पाणी शिंपडून आणि गोठ्यात पंखे, फॉगर इत्यादी लावून तपमानावर नियंत्रण राखता येते.
४) जनावरांच्या गोठ्यात नैसर्गिक प्रकाश आणि हवा येण्यासाठी योग्य प्रकारे रचना करावी.
आहार व्यवस्थापन :
- उष्णतेच्या ताणामुळे उत्पादनावर होणारा नकारात्मक परिणाम कमी व्हावा म्हणून जनावरांना पोषक आहार द्यावा. उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा द्यावा, हिरवा चारा उपलब्ध नसल्यास आंब्याची पाने, बाभळीची पाने, जांभळीची पाने द्यावीत.
- उन्हाळ्यात जनावरे खाण्याचे प्रमाण कमी करतात. उत्पादन क्षमता टिकून राहावी यासाठी संतुलित आहार द्यावा. या काळात पीठ, पोळ्या किंवा उसाचे वाढे देऊ नयेत, हे जनावरांसाठी हानिकारक ठरू शकतात.
उष्णतेच्या तणावाची लक्षणे :
• अस्वस्थता, जनावरे सावलीत किंवा पाण्याच्या स्रोताजवळ एकत्र येतात.
• धडधडणे, लाळ जास्त प्रमाणात सुटते.
• श्वसन दरात वाढ,पोट आणि आतड्यांची हालचाल कमी होते.
• सुस्ती वाढते. जनावरांची हालचाल कमी होते. खाण्याचे प्रमाण कमी होते.
• शरीराचे तापमान वाढते (ताप येतो), हृदयाचे ठोके कमी होतात.
• पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. दूध उत्पादन कमी होते.
उष्णता वाढली, की शरीरात पाण्याबरोबरच इतर खनिजांची कमतरता निर्माण होते. उष्णतेमुळे जनावर शारीरिकदृष्ट्या कमकुवत होतात. उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी
जनावरांच्या शारीरिक हालचालींमध्ये काही बदल दिसून येतात. उन्हाळ्यात जनावरांच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो, जनावरे धडधडू लागतात, तोंडातून लाळ गळू लागते. श्वासोच्छ्वास वाढल्याने आणि जास्त घाम येणे यामुळे शरीरात पाणी आणि खनिजाची कमतरता होते, त्यामुळे जनावरांची पाण्याची गरज वाढते. जनावराच्या कोठीपोटाच्या किण्वन प्रक्रियेत बदल होतो, ज्यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. अन्न सेवन सुमारे ५० टक्के कमी होते, ज्यामुळे उत्पादन क्षमता आणि कार्य क्षमता कमी होते.
शारीरिक परिणाम ः
१) आम्ल –अल्कली, संप्रेरक यांच्यात असंतुलन, आहारात घट आणि इतर अनेक प्रकारचे बदल पचनसंस्थेत उष्णतेच्या ताणामुळे होतात.
२) तापमानाप्रति संवेदनशील असलेल्या चेतापेशी जनावरांच्या संपूर्ण शरीरात पसरलेल्या असतात ज्या हायपोथालेमस ग्रंथीला संदेश पाठवतात. त्यामुळे संतुलन राखण्यासाठी जनावरांच्या शरीरात शारीरिक, संरचनात्मक आणि वर्तनात्मक बदल होतात.
३) उष्णतेच्या तणावाच्या काळात जनावरांचे अन्न सेवन कमी होते. त्यांच्या हालचाली कमी होतात, मंदावतात. या वेळी त्यांच्या श्वासोच्छ्वासाची गती आणि रक्त प्रवाह वाढतो. या सर्व प्रतिक्रियांमुळे जनावरांचे उत्पादन आणि शारीरिक क्षमता कमी होते.
गाभण जनावरांवर परिणाम ः
- उच्च उष्णतेच्या तणावाच्या काळात गाभण जनावरांमध्ये गर्भाशयाच्या रक्ताचा प्रवाह कमी होतो, परिणामी गर्भाची वाढ आणि विकास खुंटतो. या काळात गर्भात वाढणाऱ्या वासराच्या वाढीचा वेग जन्मानंतर कमी होतो.
- देशी/स्थानिक जनावरांच्या तुलनेत उच्च उष्णतेच्या तणावाचा परिणाम विदेशी जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याप्रमाणे जास्त दूध देणाऱ्या दुभत्या जनावरांना याचा जास्त फटका बसतो.
चयापचयावर होणारा परिणाम ः
- उष्णतेच्या ताणामुळे चारा खाण्याचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी कमी होते. उष्णतेच्या तणावाखाली, चयापचय कमी होते, ज्यामुळे थायरॉइड संप्रेरक स्रावणे कमी होते. आतड्यांसंबंधी हालचाल कमी होते, परिणामी आतडे भरणे वाढते.
- जसजसे तापमान वाढते, वाढीसाठी संप्रेरकाची तीव्रता आणि स्रावण्याचा दर कमी होतो. उष्णतेचा ताण सहन करणाऱ्या जनावरांमध्ये कोठी पोटातील आम्लता कमी होते. उष्णतेच्या तणावादरम्यान, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स (सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोरीन) आणि बायकार्बोनेट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात.
पुनरुत्पादनावर परिणाम ः
- उच्च उष्णतेच्या तणावात दुग्धजन्य जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते. उन्हाळ्यात, दुग्धजन्य जनावरांच्या माजाचा कालावधी आणि तीव्रता, गर्भधारणा, गर्भाशय आणि अंडाशयांची कार्ये आणि गर्भाचा विकास दर कमी होतो.
- अति उष्णतेमुळे गर्भमृत्यूचे प्रमाण वाढल्याने गर्भपात होण्याची दाट शक्यता आहे. त्याप्रमाणे नराची प्रजनन क्षमता कमी होते.
बाधित जनावरांमध्ये ऊर्जा संतुलन ः
शरीरातील तापमान राखणे ः
- शरीराचे तापमान बाष्पीभवनाद्वारे संरक्षित केले जाते, ज्यामध्ये त्वचेच्या बाह्यथरामध्ये वाढलेला रक्त प्रवाह, श्वसन दर वाढणे, लाळेचे प्रमाण वाढणे इत्यादींचा समावेश होतो. यामुळे जनावरांच्या देखभालीसाठी लागणारी ऊर्जेची गरज सुमारे २० टक्क्यांनी वाढते. दुभत्या जनावरांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा ही शारीरिक ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते.
शरीरात कमी उष्णता निर्माण करणे ः
- जनावरांच्या हालचाली कमी होतात. त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्याच्या शरीरात कमी उष्णता निर्माण होते. दुभत्या जनावरांच्या कोठीपोटामध्ये किण्वन झाल्यामुळे उष्णता वाढते. याव्यतिरिक्त, कोठीपोटाची गतिशीलतेमुळे उष्णता देखील कमी होते.
आम्लता वाढण्याचा धोका ः
उष्णतेच्या तणावादरम्यान आम्लता वाढण्याचा धोका असतो. कोठीपोटामध्ये खालील घटक आम्लता वाढवतात.
• जास्त कोरडे पदार्थ आणि कमी हिरवा चारा खाणे.
• मोठ्या प्रमाणात कर्बोदके खाणे जसे की धान्य.
• कमी रवंथ करणे.
• कोठीपोटामध्ये लाळ कमी झाल्यामुळे.
• मोठ्या प्रमाणात श्वसन दर वाढल्यामुळे (ज्यामुळे शरीरातून कार्बन डायऑक्साइड नष्ट होतो)
• कोठीपोटातील आम्लता (सामू) कमी झाल्याने तंतुमय चाऱ्याचे पचन कमी होते.
पशुखाद्यातील इलेक्ट्रोलाइट संतुलनावरील उष्णतेच्या ताणाचा परिणाम ः
- जनावरांची भूक कमी होते. जनावराला अपचन होते, आतड्यांमध्ये स्तब्धता येते.
- दुधाची गुणवत्ता कमी होते. स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने कमी होतात.
- शरीराचे वजन कमी होते, दुग्धज्वर होण्याची शक्यता वाढते.
- गर्भाशयाचा शोथ, मायांग बाहेर पडणे आणि गर्भाशयाच्या संसर्गामध्ये वाढ होते.
- कासेवर सूज येणे आणि सडातील ग्रंथीमध्ये संसर्ग वाढतो.
- केटोसिस ः रक्तातील आम्लतेचे प्रमाण वारंवार वाढणे
- घटलेली प्रजनन क्षमता ः गर्भधारणा कमी होणे, भ्रूण मृत्यूचे प्रमाण वाढते.
- अवेळी प्रसूती, वाढीस असणाऱ्या वासरांच्या वाढीच्या दरात घट होते.
- पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, जास्त प्रमाणात तहान लागते.
तरल चयापचय ः
- दुभत्या जनावरांच्या शरीरात ७५ ते ८१ टक्के पाणी असते. दुग्धजन्य जनावरांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित करणारा तापमान हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
- उष्णतेचा ताण एकाच वेळी ऊर्जा आणि पाणी चयापचय दोन्ही प्रभावित करते. उष्णतेच्या तणावात जनावर जास्त पाणी पितात.
- शरीरातून पाणी कमी होणे ही एक सतत प्रक्रिया आहे जी शरीरात सतत होत असते आणि ही प्रक्रिया उष्णतेच्या तणावाच्या काळात जास्त बाष्पीभवनामुळे वाढते.
--------
संपर्क ः डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११
(पशू शल्य चिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग, पशू वैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.