Interview with Dr. Manish Das : अर्क औषधी, सुगंधी वनस्पती संशोधनाचा!

Dr. Manish Das, Director, National Medicinal and Aromatic Plants, Directorate of Research, Anand, Gujarat : गुजरात राज्यामध्ये बोरीआवी (जि. आणंद) येथे राष्ट्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालय असून, संशोधनासाठी कार्यरत या संचालनालयाचे संचालक डॉ. मनीष दास यांच्याशी बातचित...
Dr. Manish Das, Director, National Medicinal and Aromatic Plants, Directorate of Research, Anand, Gujarat
Dr. Manish Das, Director, National Medicinal and Aromatic Plants, Directorate of Research, Anand, GujaratAgrowon
Published on
Updated on

A conversation with Dr. Manish Das, Director, National Medicinal and Aromatic Plants, Directorate of Research, Anand, Gujarat :

औषधी वनस्पती संचालनालयाचा थोडक्यात इतिहास आणि ते नेमके कोणत्या विषयावर काम करते, ते सांगा.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने १९९२ मध्ये गुजरात राज्यातील बोरीआवी (जि. आणंद) येथे राष्ट्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन केंद्राची स्थापना केली. २०.२ हेक्टर जमिनीवर वसलेल्या या केंद्राचा लाम्भवेल येथे १९.१८ हेक्टर क्षेत्रावर दुसरा फार्म आहे. त्यातील २ हेक्टरमध्ये औषधी वनस्पतींच्या सुमारे २२० प्रजाती जोपासलेल्या आहेत, तर ६ हेक्टर क्षेत्रामध्ये औषधी झाडांच्या सुमारे ११० प्रजाती जपलेल्या आहेत. या संशोधन केंद्राचे रूपांतर २००९ मध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचलनालयामध्ये करण्यात आले. या संचलनालयाअंतर्गंत देशभरामध्ये काश्मीरपासून कोईमतूरपर्यंत, तर गुजरातपासून भुवनेश्‍वरपर्यंत २६ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रामध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पतीवर मूलभूत, धोरणात्मक आणि उपयोजित संशोधन केले जाते. त्यात मूलभूत जनुकीय पातळीवरील संशोधनापासून उत्तम अधिक औषधी गुणधर्म असलेल्या जातींच्या विकास आणि उत्पादकता वाढीसाठी आवश्यक उत्तम कृषी पद्धतींच्या विकास अशा अनेकविध घटकांचा समावेश आहे.

पारंपरिक औषधे म्हटले की आपल्याला आयुर्वेद आठवतो. त्या संदर्भात सध्या आपल्या केंद्रामध्ये काय काम सुरू आहे?

देशभरातील आजीच्या बटव्यामध्ये घरगुती औषधे म्हणून वापरल्या जाणाऱ्या अनेक वनस्पतींची जर आपण नुसती मोजदाद करायची ठरवली, तर ती संख्या जाते ७० हजार वनस्पतींच्या घरात. कारण त्या पैकी प्रत्येक वनस्पतींचा एक किंवा अनेक अवयवांचा वापर आयुष्यामध्ये किमान एकदा ते अनेकदा वारंवार करत असतो. मात्र त्यांचा शास्त्रीय पातळीवर सुव्यवस्थित अभ्यास आपल्या आयुर्वेदामध्ये केला गेला आहे. त्यामुळे आयुर्वेद हा आपल्या प्राचीन भारताची जगासाठी असलेली मोठी देणगीच आहे. भारतीय औषध शास्त्रातील सर्वात अलीकडचा ग्रंथ चरक संहितेमध्ये वनस्पतींपासून मिळवलेल्या ३४० औषधांचा उल्लेख येतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वनस्पती आपल्या गावात, शेतात किंवा जवळच असलेल्या जंगलात किंवा वनात भेटत असल्यामुळे गरिबातील गरिबाला निदान प्राथमिक उपचार मिळण्याची खात्री देतात. या आपल्या अवतीभवती असलेल्या वनस्पतीचे जतन आपण करू शकलेलो नाही, त्यामुळे त्यांच्या लागवडीकडे, त्यांचे व्यावसायिक उत्पादन घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी त्यातील महत्त्वाच्या व व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांनाही चांगले उत्पादन देऊ शकणाऱ्या वनस्पतींची निवड करून त्यांच्या अधिक उत्पादनक्षम जातींच्या विकासावर आम्ही भर देत आहोत. त्याच सोबत प्रत्येक वनस्पती व त्यांच्या घटकांमध्ये सर्वोच्च पातळीमध्ये औषधी गुणधर्म असताना योग्य वेळी त्यांची काढणी करणे, त्यातील तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणे अशा बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आमच्या केंद्रामध्ये फळबागशास्त्र, मृदाशास्त्र, वनस्पती जैवतंत्रज्ञान, कार्बनी रसायनशास्त्र, वनस्पती शरीरशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र कीटकशास्त्र आणि काढणीपश्‍चात तंत्रज्ञान यांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनपत्रिका (जर्नल्स), पुस्तके यांनी समृद्ध असे ग्रंथालय आहे.

Dr. Manish Das, Director, National Medicinal and Aromatic Plants, Directorate of Research, Anand, Gujarat
Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

आपल्या संचालनालयाच्या माध्यमातून देशभर कार्यरत विविध केंद्राकडून औषधी वनस्पती उत्पादक शेतकरी, उद्योग आणि संबंधितासाठी कोणत्या सेवा पुरविल्या जातात?

आपल्या संस्थांमध्ये शेतकऱ्यांसाठी नियमितपणे प्रशिक्षणे घेतली जातात. त्याचा शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसह औषधी वनस्पतींसंदर्भात कार्य करणाऱ्या व्यावसायिक, उद्योगापर्यंत कोणत्याही संबंधितांनी मागणी केल्यास त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. शेतकऱ्यांसाठी सर्वांत महत्त्वाचे असते, ते म्हणजे गुणवत्तापूर्ण व शुद्ध अशी रोपे किंवा बियांची उपलब्धता. त्यासाठी आमच्या संस्थेमध्ये आधुनिक रोपवाटिका उभारण्यात आलेली आहे. या संपूर्ण वातावरण नियंत्रित रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या पैदास पद्धतींवर सातत्याने संशोधन व अभ्यास सुरू असतो. आम्ही प्रमाणित केलेल्या पद्धतींचा फायदा प्रत्यक्ष उत्पादकांना आणि रोपवाटिकाधारक व्यावसायिकांनाही होऊ शकतो. औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीपासून काढणीपर्यंत आणि काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामध्ये औषधी घटकांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आवश्यक ती सल्लासेवा नक्कीच पुरवली जाते. आम्ही योग्य ती परवाना फी घेऊन नव्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानही उद्योजकांना देत असतो. त्यांच्या मागणीनुसार मातीच्या तपासणीपासून वनस्पतींच्या विश्‍लेषणापर्यंत सर्व सेवा नाममात्र किमतीमध्ये पुरवल्या जातात. त्यातून संबंधितांच्या फायद्यामध्ये वाढ होऊ शकतो.

आपण विकसित केलेल्या नव्या जातींसंदर्भात थोडी माहिती द्या.

आम्ही आजवर औषधी वनस्पतीच्या ४२ जाती आणि सुगंधी वनस्पतीच्या ८ जाती विकसित केल्या आहेत. त्यातील बोरीआवी (आणंद) येथील संशोधनातून नुकत्याच प्रसारित केलेल्या जाती पुढील प्रमाणे...

१) अश्‍वगंधाची (शा. नाव - Withania somnifera L., Dunal) वल्लभ अश्‍वगंधा १ या वाणापासून सर्वाधिक ५८९.४ किलो प्रति हेक्टर इतके कोरड्या मुळांचे उत्पादन मिळते. त्याच्या बेरीज केशरी रंगाच्या असून, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाना या राज्यांमध्ये उत्पादन घेता येऊ शकते.

२) इसबगोल (शा. नाव - Plantago ovata) याच्या दोन जाती वल्लभ इसबगोल १ आणि २ प्रसारित केल्या आहेत. वल्लभ १ ही जात मध्यम कालावधी (१२० ते १२५ दिवसांची) असून, त्याचे उत्पादन १०.३ क्विंटल प्रति हेक्टर इतके मिळते. पूर्वीचे वाण जीआय २ (८.३ क्विंटल प्रति हेक्टर) पेक्षा ते अधिक आहे. वल्लभ २ हे वाण लवकर पक्व होणारे (१०० दिवस) असून, उत्पादनही ११०४.४७ किलो प्रति हेक्टर (पारंपरिक वाणाच्या तुलनेत ९.९४ टक्के) इतके अधिक आहे. हे वाण डाऊनी मिल्ड्यू रोगासाठी प्रतिकारक आहे.

३) कालमेघ (शा. नाव - Andrographis paniculata (Burm.f.) Nees ) याची वल्लभ कालमेघ १ हे वाण विकसित केले असून, त्यात अॅन्ड्रोग्राफोलाइडचे प्रमाण ९२ किलो प्रति हेक्टर (म्हणजेच पारंपरिक वाणाच्या तुलनेत २४ टक्के अधिक) आहे. त्याच्या पानाचे उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टर असून, अन्य वाणांच्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. हे वाण गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,, हरियाना, केरळ आणि पश्‍चिम बंगाल येथे लागवडयोग्य आहे.

४) मधुकापर्णी (शा.नाव - Centela aciatica) - याची वल्लभ मेधा हे वाण विकसित केले असून, त्यांच्या पानांचा आकार स्थानिक वाणापेक्षा ४.५ पटीने मोठा आहे. त्यामुळे त्याच्या ताज्या पानांचे उत्पादन १२३३१ किलो तर वाळलेल्या पानांचे उत्पादन २११३ किलो प्रति हेक्टर मिळते. तुलनेसाठी स्थानिक वाणाचे उत्पादन अनुक्रमे २०५० किलो आणि ३९२ किलो प्रति हेक्टर इतकेच मिळते. त्यातून कार्यरत औषधी घटक उदा. असियाटिकोसाइड, मॅडेसिसिस अॅसिड आणि आसियाटीक अॅसिड यांचेही प्रमाण अधिक मिळते. या देशी वनस्पतीसोबत परदेशी औषधी वनस्पतींच्या भारतातील लागवडीसंदर्भात काम सुरू आहे.

Dr. Manish Das, Director, National Medicinal and Aromatic Plants, Directorate of Research, Anand, Gujarat
Interview with Abhishek Govilkar : वायदे बाजारात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न

आपल्या संचालनालयांतर्गत झालेले महत्त्वाचे संशोधन आणि उपलब्धी काय सांगता येईल?

उत्तर ः आम्ही आणंद येथील प्रक्षेत्र जनुक बॅंक बनवली असून, त्यात १५ महत्त्वाच्या औषधी, सुगंधी वनस्पतीच्या २३१३ प्रजाती जोपासल्या आहेत. त्याच प्रमाणे संचालनालयांतर्गत देशभरातील २६ केंद्रांमध्ये ५४ औषधी व सुगंधी वनस्पती व वेलींच्या ५०६० प्रजाती जोपासलेल्या आहेत. संचालनालयाने आजवर ९ प्रजातींचे ३५ वैशिष्ट्यपूर्ण जर्मप्लाझ्म नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जनुकीय स्रोत ब्युरो मध्ये नोंदवलेले आहेत. संस्थेने २१ हेक्टर क्षेत्रामध्ये जैवविविधता बाग बनवली असून, त्यात देशभरातून मिळवून खास ११० औषधी झाडे, ६४ झुडपे, ३५० औषधी प्रजाती आणि ५० वेली प्रजाती लावलेल्या आहेत. संस्थेने शेतकऱ्यांसाठी उद्योजकांना सल्ला सेवा पुरविण्यासाठी वेबसाइट (www.herbalgardenindia.org) तयार केली आहे. ती अभ्यास आणि संशोधनानुसार सातत्याने अपडेट ठेवली जाते. संचालनालयाने विविध विषयांवरील १४ पेटंट फाईल केलेली आहेत. संस्थेने ३१ औषधी वनस्पतीच्या उत्तम उत्पादन व गोळा करण्याच्या पद्धती (GACP) विकसित केल्या आहेत. या पद्धतीचे आवश्यक ते ट्रेनिंग टूलकिट जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या साह्याने तयार केले आहे. तंत्रज्ञानामध्ये सुगंधी वनस्पतीच्या डिस्टिलेशन प्रक्रियेनंतर शिल्लक अवशेषांपासून बायोचार निर्मिती आणि इसबगोलच्या भुश्शामध्ये रॉक फॉस्फेट मिसळून उच्च स्फुरदयुक्त कंपोस्ट खत निर्मिती यांचे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अश्‍वगंधा, कालमेघ, इसबगोल आणि सेन्ना यामधील ११ मल्टिक्लास पेस्टिसाइडचे अंश शोधण्यासाठी ‘जीसी - एमसी’ आधारित पद्धत विकसित केली आहे. ही सुधारित पद्धत वेगवान, सोपी, स्वस्त, कार्यक्षम आणि त्याच वेळी सुरक्षित आहे. अश्‍वगंधाच्या मुळापासून औषधी घटक वेगळे करण्याची पद्धत प्रमाणित केली आहे. पाण्यातील रंगविषयक अशुद्धी दूर करण्यासाठी सुगंधी वनस्पतीच्या शिल्लक अवशेषांच्या वापराचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संस्थेमध्ये विकसित करण्यात आले आहे. कालमेघ व अन्य अत्यंत कडू वनस्पती घटकांपासून कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. २० औषधी वनस्पतींच्या किमान प्रमाणित बियाण्यांसाठी आणि त्यांच्या तपासणीसाठीचे प्रोटोकॉल तयार केले आहेत. भारतीय औषधी वनस्पतींमध्ये विविध कारणांमध्ये वाढणाऱ्या ९ प्रकारच्या मायकोटॉक्सिनचे (सूक्ष्म विषारी घटक) विश्‍लेषण करण्यात यश आले आहे.

आंतरपीक म्हणून औषधी वनस्पतीबाबत झालेले संशोधन असे...

अन्य फळबागांमध्ये त्रासदायक ठरणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी नर फळमाशींना आकर्षित करणारे सापळा व आंतरपीक म्हणून तुळस पिकावर संशोधन केले आहे. तुळसेमध्ये ८२.८१ टक्के मिथिल युजेनॉल असून, त्याकडे नर फळमाश्या आकर्षित होतात. फळबागामध्ये शतावरी हे आंतरपीक दुहेरी फायद्याचे ठरते. त्यातून मुळांचे व त्यातील शताव्रीन ४ चे चांगले उत्पादन मिळते.

नुकतेच मिळालेले पेटंट...

१) कोरपडीपासून (शा. नाव - Aloe barbadence) अॅलोवीन काढण्याची नावीन्यपूर्ण पद्धतीसाठी - पेटंट क्र. २७७५०१

२) मूल्यवर्धित पदार्थाच्या निर्मितीमध्ये अश्‍वगंधा, तुळशी, कालमेघ, अर्जून, अर्डूसा यांच्यापासून चूर्ण तयार केले असून, माणसांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. इसबगोलच्या भुश्शापासून कुकीज, केक, ब्राऊनी यासारखे खाद्यपदार्थ तयार केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com